प्रज्ञा गोपाळे: आंतरराष्ट्रीय पातळीवर झेपावलेली सहृदयी कलावंत
छोट्या वयात प्रज्ञाला (Pradnya Gopale) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘किलबिल’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथलं वातावरण पाहून ती कमालीची भारावली. एवढे मोठे लाइट्स, आपल्यावर पडणारा फोकस ती पहिल्यांदाच अनुभवत होती. तिथंच तिनं ठरवलं, यापुढं आपल्यावर असेच फोकस पडायला हवेत. जगासमोर चमकण्याची महत्त्वाकांक्षा तिथंच जागृत झाली.
प्रज्ञा गोपाळे! “नाम तो ठीक, उस का काम ज्यादा बोलता हैं.” एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हिंदी चित्रपट, ‘येरे येरे पावसा’ चित्रपटासह सात चित्रपट, भरपूर शॉर्टफिल्म्स, वेबसीरिज, काही नाटकं तिच्या नावावर आहेत. ती चांगली कवयित्रीही आहे. अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करून तिनं मनोरंजनक्षेत्रात स्वत:ला सिद्ध केलंय. तिचा संघर्ष, मेहनत तिच्यासारख्या महत्त्वाकांक्षी मुलींसाठी प्रेरणादायी आहे.
नाशिकला निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात प्रज्ञाचा जन्म झाला. वडील सुरेश खासगी नोकरीतून निवृत्त झालेले, तर आई अलका गृहिणी. मेस या कुटुंबाचा सध्याचा व्यवसाय. प्रज्ञा बालपणापासूनच कमालीची गुणी. नाशिकच्याच वनिता विकास मंदिर शाळेत तिच्यातील कलागुणांना वाव मिळाला. शाळेतील सर्वच कार्यक्रमांमध्ये ती पुढं असायची. तिथूनच ‘किलबिल’मध्ये कला सादर करण्याची संधी तिला मिळाली. (Success story of Pradnya Gopale)
कालिदास कलामंदिरातील कार्यक्रमातही ती झळकली. प्रत्येक सादरीकरणात ती लीडला असायची. पारितोषिक ठरलेलंच असायचं. हस्ताक्षर, वक्तृत्व, चित्रकला या स्पर्धांतही ती टॉपच राहायची. दिवाळी होमवर्कमध्ये पहिला नंबर घ्यायची. एवढंच काय, तिची टापटिप वही शिक्षकांकडून पूर्ण वर्गात फिरायची. वर्गशिक्षिका हेमलता कुळकर्णी यांनी तिच्यातील कलांना सतत प्रोत्साहन दिलं. संस्कृत स्तोत्रं, श्लोक, अथर्वशीर्ष हे छान पद्धतीनं शिकवलं. त्याचाच तिला पुढं कला सादरीकरणात उपयोग होत गेला. नंतर नाशिकरोडवरील र. ज. चव्हाण बिटको शाळेतही तिच्या कलागुणांना वाट मिळत गेली. गाणं, नृत्यस्पर्धेत जिल्हा पातळीवर तिचं नाव गाजत होतं. “आता मनोरंजनक्षेत्र खुणावत होतं. मात्र, या क्षेत्रात यायचं कसं, याबाबत काहीही माहिती नव्हती. अन्यथा, नाट्यशास्त्रात पदवी घेतली असती. आई-बाबांनी पूर्ण पाठिंबा दिला. आई एकदम ॲक्टिव्ह, तिच्याकडून बरंच काही शिकता आलं, प्रोत्साहन मिळालं”, असं प्रज्ञा सांगते.
पारले कंपनीत तिनं चार वर्षे नोकरी केली. मात्र, कलामन स्वस्थ बसू देत नव्हतं. तिनं नोकरी सोडली. नाट्यपरिषदेच्या रवींद्र कदम यांनी नाट्यवाचनाची संधी दिली. ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर अध्यक्षस्थानी होते. त्यांनी प्रज्ञाची तारीफ केली. ‘पुढे जा’, असा आशीर्वाद दिला. त्याचदरम्यान फिरोज नावाच्या मित्रानं नाना देवरे यांच्याशी भेट करवून दिली. तेव्हा ते राज्य नाट्यस्पर्धेसाठी ‘का वाचवलंस मला’ हे नाटक बसवत होते. त्यांनी प्रज्ञाला एक छोटीशी भूमिका देऊ केली. भूमिकेच्या लांबीपेक्षा तिनं संधी पाहिली अन् भूमिकेच्या रीडिंगसाठी गेली. प्रमुख भूमिका करणारी कलावंत अद्याप आलेली नसल्याचं सांगून देवरेंनी तिला त्या भूमिकेचं रीडिंग करायला लावलं. प्रज्ञानं ते केलं. त्यानंतर ती जायला निघाली, तेव्हा देवरेंनी सांगितलं, “ही भूमिका तूच करणार आहेस.”
प्रज्ञाला आश्चर्य वाटलं. नंतर कळलं, ही तिची ‘परीक्षा’ होती. याआधी केलेल्या नाट्यवाचनाचा अनुभव गाठीशी होताच. प्रज्ञाची या नाटकातील भूमिका गाजली. नंतर लगेच कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धा सुरू झाल्या. त्यात एक विनोदी भूमिका मिळाली. आतापर्यंत गंभीरच भूमिका साकारलेल्या प्रज्ञासमोर हे आव्हान होतं. मात्र, ते तिनं पेललं. नंतर नाटके, एकांकिकांचा प्रवास सुरू झाला. ‘साईबाबा’ हे महानाट्यही केलं.
प्रथमेश जाधव यांच्या ‘भूक: लढाई अस्तित्वाची’ या शॉर्टफिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा कॅमेऱ्याशी अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा संबंध आला. नंतर ‘स्थलांतरण’ हा चित्रपट मिळाला. आता चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला होता. ‘रेती’, ‘ट्रक नंबर ००७’, ‘नियती: एक सत्यघटना’, ‘एक संघर्ष मास्तरचा’, ‘टिपऱ्या द मिस्ट्री’, ‘येरे येरे पावसा’ आदींसह ‘वॉरपाथ बियाँड द लाइफ’ हा हिंदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट केला. सर्वच भूमिका आव्हानात्मक होत्या. (Success story of Pradnya Gopale)
कुष्ठरोग्यांचं जीवन पाहिलं, अन्…
‘वॉरपाथ बियाँड द लाइफ’ या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले. यात प्रज्ञाची कुष्ठरोग्याची भूमिका होती. झडलेली बोटं दाखविण्यासाठी विशेष मेकअपच्या साहाय्यानं ते बारा बारा तास बांधलेले राहायचे. त्या मेकअप मटेरियलचा एवढा दुर्गंध यायचा की जेवायचीही इच्छा होत नव्हती. अशावेळी मेकअप आर्टिस्ट सहकार्य करायचे. चमच्याने तिला जेवण भरवायचे.
एकेदिवशी खऱ्या कुष्ठरुग्णांना शूटमध्ये समाविष्ट करण्यात आलं. शूट संपल्यावर ते जेवायला बसले. त्यावेळी प्रज्ञा त्यांच्याजवळ गेली. तिनं त्यांचं आयुष्य पाहिलं. बोटं नाहीत, शरीरात वेदनाही. तरी ते काहीही तक्रार न करता जीवनाला सामोरे जात होते. छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधत होते. आपण तर त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं सुखात आहोत. तरी तक्रारी करीत राहतो, बहाणे शोधत बसतो, याची जाणीव तिला झाली. डोळ्यांत टचकन पाणी आलं. तिनं चमचा बाजूला टाकला. त्यांच्याजवळ बसली अन् हातानं जेवण करू लागली. जीवनात या गोष्टी तुम्हाला खूप शिकवणाऱ्या असतात, असं ती सांगते. नंतर खेडोपाडी शूटला जाताना कॅमेऱ्याच्या मागे ती कधी कलाकार म्हणून वावरली नाही. सामान्य लोकांत मिसळू लागली.
‘टिपऱ्या: द मिस्ट्री’ करताना भरपूर ज्युनिअर आर्टिस्ट्स आले होते. सीनियर कलावंत त्यांना जवळ करत नव्हते. खरंतर या सीनियर्सनी ज्युनिअर्सना शिकवायला हवं, असं प्रज्ञाचं मत आहे. प्रज्ञासह अन्य कलावंतांच्या राहण्याची सोय एका बंगल्यात करण्यात आली होती. मात्र, ती त्या ज्युनिअर आर्टिस्ट्ससोबत राहायची. कित्येकजण विचारायचे, ‘तू बंगला सोडून या ज्युनियर्ससोबत का राहतेस?’ तेव्हा तिचं उत्तर असायचं, “तीही माणसंच आहेत. मी माणसांत राहते.” (Success story of Pradnya Gopale)
अंगात ताप, तरी काम
भरपूर पारितोषिकं प्राप्त ‘येरे येरे पावसा’चं शूट रणरणत्या उन्हात होतं. नियोजन उत्तम होतं. तरी ऊन कुणाला ऐकणार? कथाच मुळात दुष्काळग्रस्त गावाची. स्टार्टिंगला प्रज्ञाचाच सीन होता. सुरुवातीला पाच पावलं चालायचं होतं. दिग्दर्शिका शफक खान यांनी तिला चप्पल काढायला लावली. प्रज्ञानं एक पाऊल टाकलं अन् झटकन मागं वळली. पाय चांगलाच पोळला होता. तिला उष्माघात झाला. दवाखान्यात नेण्यात आलं.
डॉक्टरांनी सलाइनवर सलाइनी सुरू केल्या. चारेक दिवस ती तापानं फणफणत होती. थोडं बरं वाटलं अन् पुन्हा शूटला हजर झाली. थोडं कामही केलं. मात्र, शफक खान यांनी तिला आरामाचा सल्ला दिला. निवासाची व्यवस्था असलेल्या बंगल्यात पुन्हा तिच्यावर उपचार सुरू झाले. ताप, अशक्तपणा होता.
एकदा शफक खान तिला भेटायला बंगल्यावर गेल्या असता प्रज्ञा हातात सलाइन घेऊन अंगणात फेऱ्या मारत होती. शफक चाटच पडल्या. “आता ठीक वाटतंय, शूटला यावं लागेल मला उद्या”, असं प्रज्ञा त्यांना म्हणाली. तेव्हा शफक यांनी सांगितलं, “तुझं शूट नंतर करू, आधी नीट आराम कर आणि बरी हो.” या चित्रपटाचा अनुभव भन्नाट होता. मिलिंद शिंदे, छाया कदम, संदेश जाधव या मातब्बरांकडून भरपूर काही शिकायला मिळालं, असं प्रज्ञा सांगते.(Success story of Pradnya Gopale)
नुसता बोल्डनेस म्हणजे अभिनय नव्हे
“सध्या या क्षेत्रात बोल्डनेसला अधिक महत्त्व दिलं जातं. कित्येक मुली बोल्ड अवतारात वावरत असतात. खरंतर त्यांच्यात अभिनयकला आहे का, हा प्रश्न आहे. म्हणूनच त्या बोल्डनेसचा आधार घेत असाव्यात. इन्स्टाग्रामवर तुमचे फॉलोअर्स किती आहेत, हेही काम देताना पाहिलं जातं.
ऑडिशनच्या वेळी या फॉलोअर्सचा एक सेक्शन असतो. मग फॉलोअर्स वाढविण्यासाठी काय काय केलं जातं. यातील अनेकींना अभिनयातला ‘अ’ सुद्धा कळत नसतो. त्यांना डायलॉग द्या, अभिनय करायला लावा, मग ठरवा. त्यांच्यामुळे प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या मुलींचं नुकसान होतं”, अशी खंत प्रज्ञा व्यक्त करते. शिवाय, मोठ्या कलावंतांच्या तुलनेत इतर कलावंतांना किमान पुरेल एवढं तरी मानधन द्यायला हवं, अशी अपेक्षाही ती व्यक्त करते. (Success story of Pradnya Gopale)
‘अंकुश’कडून मोठ्या आशा
चित्रपटांसह ‘भूक’, ‘ती तेव्हा तशी’, ‘एनजीओ’, ‘ईश्वर म्हणतो, पाणी कुठे आहे’, ‘कॉइन’, ‘वनश्री’, ‘निवास’ या शॉर्टफिल्म्समधील तिच्या प्रमुख भूमिका गाजलेल्या आहेत. प्रत्येक शॉर्टफिल्मला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘स्ट्रेंजर’, ‘डेंजर लोग अपकमिंग’ या वेबसीरिजमधील भूमिकाही सरस आहेत. आता निशांत ढापसे दिग्दर्शित आगामी ‘अंकुश’ चित्रपटाकडून तिला मोठ्या आशा आहेत. हा साउथ इंडियन बेस्ड मराठी चित्रपट असून, तिची यात चांगली भूमिका आहे. ‘केजीएफ’ फेम ॲक्शन डायरेक्टर विक्रम मोर, ‘सिंघम’चे ॲक्शन डायरेक्टर शरद शेट्टी यांच्यासोबत काम करताना मजा आली. त्यांच्यासाठी घरचं जेवण घेऊन गेले होते, अशी आठवण प्रज्ञानं सांगितली.
==================
हे ही वाचा: वेबसिरीजला LGBT बोल्ड सीन्सचा तडका खरंच आवश्यक आहे का?
मीना कुमारी: बॉलिवूडच्या ट्रॅजिडी क्वीनची एक सुखद आठवण
==================
भविष्यात प्रज्ञाला उत्तमोत्तम भूमिका साकारायच्या आहेत. लिखाण, दिग्दर्शनाचीही इच्छा आहे. साधेपणावर विश्वास ठेवणारी, आपलं काम प्रामाणिकपणे करणारी प्रज्ञा प्रत्येकाला आपलंसं करणारी आहे. या क्षेत्रात पाय खेचणारं कुणी भेटलं नाही, प्रोत्साहन देणारेच वाट्याला आले, असं ती आवर्जून नमूद करते. “आपण आपल्या कामावर श्रद्धा ठेवली, इतरांचा सन्मान केला, तर सगळं सुकर होतं”, असं तिचं म्हणणं आहे. मेहनत, कलागुण अन् चांगूलपणाच्या भरवशावर या क्षेत्रात वाटचाल करीत असलेल्या, प्रत्येक कलेत ‘टॉप’ राहिलेल्या प्रज्ञाचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे.