‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बॉलिवूडमध्ये चमकलेल्या या १० अभिनेत्री आहेत सौंदर्यस्पर्धेतील विजेत्या
सौंदर्यस्पर्धा आणि बॉलिवूड यांचं खूप जवळचं नातं आहे. 2017 साली मिस वर्ल्ड झालेली ‘मानुषी छिल्लर’ हिने देखील ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला तरी मानुषीकडे अजूनही काही चित्रपट आहेत. तसंच तिच्या बॉलिवूडच्या भविष्याबद्दल आत्ताच काही सांगणं कठीण आहे. मानुषीच्या आधीही सौंदर्यस्पर्धा जिंकलेल्या कित्येक तरुणी (Beauty Queens) बॉलिवूडमध्ये आल्या आहेत. त्यामधील काहींची कारकीर्द बहरली, तर काही उरल्या केवळ आठवणीत. अशाच काही अभिनेत्रींबद्दल (Beauty Queens Who Turned Bollywood Actresses) –
१. झीनत अमान
सत्तरच्या दशकातली बोल्ड अभिनेत्री समजली जाणारी झीनत अमान १९७० साली ‘फेमिना मिस इंडिया’ आणि ‘मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल’ या दोन्ही स्पर्धांची विजेती होती. ‘द एव्हिल विदिन’ या चित्रपटामधून तिने आपली अभिनय कारकीर्द सुरु केली. परंतु तिला खरी ओळख मिळाली ती ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटामुळे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर अनेक चित्रपटांमधून तिने आपली अभिनयक्षमता दाखवली.
२. मीनाक्षी शेषाद्री
बॉलिवूडच्या ऐशीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हीने १९८१ साली वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘मिस इंडिया’ हा किताब जिंकला होता. हा किताब जिंकणारी ती आजवरची सर्वात लहान स्पर्धक ठरली आहे. मीनाक्षीने ‘पेंटर बाबू’ या चित्रपटातून आपली अभिनय कारकीर्द सुरु केली. हा चित्रपट काही विशेष चालला नाही. पण त्यांनतर आलेल्या ‘हिरो’ या चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. सध्या ही अभिनेत्री अमेरिकेत असून तिने बॉलीवूडला कायमचा रामराम ठोकला आहे.
३. जुही चावला
नव्वदच्या दशकातील यशस्वी अभिनेत्री असणारी जुही आजही अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. १९८४ साली जुहीने ‘मिस इंडिया’ स्पर्धा जिंकली. त्यांनतर १९८६ सालच्या सल्तनत या चित्रपटामधून तिने बॉलिवूडच्या रुपेरी दुनियेत पाऊल ठेवलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती १९८८ साली आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामुळे. बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यावर तिने शाहरुख खानसोबत ‘ड्रीम्स अनलिमिटेड’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली. (Beauty Queens Who Turned Bollywood Actresses)
४. ऐश्वर्या राय
१९६६ साली ‘रीता फारिया’ हिने मिस वर्ल्डचा ‘किताब जिंकला होता त्यानंतर तब्ब्ल २८ वर्षांनी म्हणजेच १९९४ साली हा मुकुट एका भारतीय स्पर्धकाच्या डोक्यावर विराजमान झाला; ती स्पर्धक होती ऐश्वर्या राय. ऐश्वर्याने ‘इरुवर’ या तामिळ चित्रपटापासून अभिनय क्षेत्रातील कारकीर्द सुरु केली, तर बॉलिवूडमध्ये तिचा पहिला चित्रपट होता ‘और प्यार हो गया’, पण अभिनेत्री म्हणून तिला खरी ओळख मिळाली ती १९९९ सालच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटामुळे. यांनतर मात्र तिने मागे वळून बघितलं नाही आणि बॉलिवूडमध्ये आपली यशस्वी कारकीर्द घडवली.
५. सुश्मिता सेन
१९९४ हे वर्ष भारतासाठी खास ठरलं कारण मिस वर्ल्ड सोबतच ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुटही एका भारतीय स्पर्धकाच्या डोक्यावर विराजमान झाला. ही स्पर्धक होती सुश्मिता सेन. हा ‘किताब जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. १९९६ सालच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण बॉलिवूडमध्ये तिला विशेष यश मिळालं नाही. मात्र अलीकडेच तिने ‘आर्या’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात पाऊल टाकलं आणि तिथे मात्र तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. या वेबसीरिजच्या दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. (Beauty Queens Who Turned Bollywood Actresses)
६. डायना हेडन
१९९४ सालानंतर लगेचच ३ वर्षांनी १९९७ साली पुन्हा एकदा ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट एका भारतीय स्पर्धकाने जिंकला, ती स्पर्धक होती, डायना हेडन. डायनाने २००३ सालच्या ‘तेजाब’ या चित्रपटापासून आपली अभिनय कारकीर्द सुरु केली मात्र ना तिला फारसं यश मिळालं ना ती इथे रमली. सध्या डायना आपल्या संसारात रमली आहे.
७. युक्ता मुखी
१९९७ नंतर अवघ्या २ वर्षांत १९९९ साली पुन्हा एकदा युक्ता मुखीने मिस वर्ल्डच्या मुकुटावर आपलं नाव कोरलं. युक्ताने २००२ सालच्या ‘प्यासा’ या चित्रपटातून आपली बॉलिवूडमधली अभिनय कारकीर्द सुरु केली. परंतु बॉलिवूडमध्ये तिला म्हणावं तसं यश लाभलं नाही. (Beauty Queens Who Turned Bollywood Actresses)
८. प्रियांका चोप्रा
युक्तानंतर लगेचच पुढच्या वर्षी २००० साली प्रियांका चोप्राने ‘मिस वर्ल्ड’ च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं. प्रियांकाने तामीझान (Thamizhan) या तामिळ चित्रपटापासून आपली अभिनय क्षेत्रातील कारकीर्द सुरु केली, तर ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटापासून तिची बॉलिवूड कारकीर्द सुरु झाली. बॉलिवूडमध्ये यशस्वी झाल्यावर तिने हॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
९. लारा दत्ता
लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून १९९४ सालची पुनरावृत्ती केली. हा ‘किताब जिंकणारी ती दुसरी भारतीय ठरली. या सौंदर्यवतीने २००० साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातून आपली अभिनय कारकीर्द सुरु केली. आश्चर्य म्हणजे या चित्रपटात तिच्यासोबत होती २००० सालची मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा. लाराला बॉलिवूडमध्ये लक्षणीय यश मिळालं नाही. २०२० साली तिने ‘हंड्रेड’ या वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. (Beauty Queens Who Turned Bollywood Actresses)
===================
हे ही वाचा: इंजिनिअर मुलांनी बनवला रोमँटिक चित्रपट, कोणतंही मोठं नाव नसताना चित्रपट झाला सुपरहिट!
‘या’ अभिनेत्रीच्या ‘टॉपलेस’ फोटोने देशात उडाली होती मोठी खळबळ!
=================
१०. दिया मिर्झा
२००० हे साल देखील भारतासाठी विशेष ठरलं कारण मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स नंतर ‘मिस एशिया पॅसिफिक’चा मुकुटाची भारतीय सौंदर्यवतीच्या डोक्यावर विराजमान झाला; ती सौंदर्यवती होती दिया मिर्झा. दियाने २००१ सालच्या ‘रहना है तेरे दिल मे’ या चित्रपटापासून आपली अभिनय कारकीर्द सुरु केली. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला तरीही बॉलिवूडमध्ये मात्र तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. दियानेही २०१९ सालच्या ‘काफिर’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.