दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सेकंड मदर: प्रिया मराठे – शंतनू मोघे प्रथमच ऑनस्क्रीन एकत्र
कोरोना काळात बॉलिवूडमधले काही बहुचर्चित चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. अर्थात यापुढचा काळ ओटीटीचा असेल की नाही ही चर्चेचा मुद्दा आहे. पण आजही ओटीटीवर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. असाच एक चित्रपट काल MX प्लेअरवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे ‘सेकंड मदर (Second Mother)’.
‘सेकंड मदर (Second Mother)’ हे नाव वाचून अनेकांना वाटेल की, हा चित्रपट सरोगेट मदर किंवा तत्सम संकल्पनेवर आधारित असेल. पण प्रत्यक्षात मात्र चित्रपटाची कथा संपूर्णपणे वेगळी आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतातच. “जगी सर्व सुखी असा कोण आहे… ” या प्रश्नाचं उत्तर ‘कोणीच नाही’ असंच आहे. पैशाची कमतरता, अपयश, प्रेमभंग, गंभीर आजार अशा एक ना अनेक प्रकारची दुःख गिळून आपण आपलं आयुष्य जगत असतो. असंच सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या दोन जोडप्यांची कथा ‘सेकंड मदर’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचं विशिष्ट म्हणजे मराठीमधील ‘रियल लाईफ कपल’ प्रिया मराठे आणि शंतनू मोघे या चित्रपटात प्रथमच एकत्र आले आहेत आणि ऑनस्क्रीनही पती पत्नीच्या भूमिकेत आहेत.
दिलीप (शंतनू मोघे) त्याची पत्नी सुधा (प्रिया मराठे) आणि आपल्या दोन मुलांसोबत राहत असतो. गावात घर आहे, शेतजमीनही आहे, पण तरीही शंतनूला आर्थिक चिंतेने ग्रासलेलं असतं कारण चार महिने त्याचा पगार झालेला नसतो. सावकाराचं कर्ज, जवळच्या माणसांकडून घेतलेले उसने पैसे आणि घरामधला दैनंदिन खर्च कसा भागवायचा या चिंतेत असणारा दिलीप अत्यंत सहृदय माणूस असतो. दिलीपच्या मालकीची शेतजमीन असते आणि या जागेत शेती करायची दिलीपच्या पत्नीची इच्छाही असते. पण तिथे पाण्याची सुविधा नसल्यामुळे शेती करणं अत्यंत खर्चिक असतं. शिवाय पडीक असल्यामुळे आणि पाण्याच्या समस्येमुळे ती जमीन विकलीही जात नसते. आर्थिक कोंडीतून सुटायचा दिलीपला कुठलाच मार्ग दिसत नसतो.
दिलीपच्याच कंपनीमध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत (अमित डोलावत) आणि त्याची पत्नी राधा (आस्था चौधरी) यांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता असूनही मुलाला असणाऱ्या आजारामुळे ते व्यथित असतात. ट्रीटमेंटला तो कोणताही प्रतिसाद देत नसतो. त्यामुळे आपला मुलगा कधी बोलू शकेल का, या चिंतेने त्यांना ग्रासलेलं असतं.
ही दोन्ही कुटुंब एकमेकांचा आधार बनतात का? त्यांच्या आयुष्यातल्या समस्यां दूर होतात की अजून वाढतात. श्रीकांतचा मुलगा बोलू लागतो का? या सर्व प्रश्नाची उत्तर चित्रपटात शेवटी मिळतात. पण मुळात असे प्रश्न चित्रपट बघताना आपल्याला पडतच नाहीत. चित्रपटात कोणताही मेलोड्रामा नाही, मारामारी नाही. एक साधी, सरळ कथा ज्यामध्ये उत्कंठावर्धक, धक्कादायक असं काहीच नाही. जे काही घडणार असतं त्याचा अंदाज प्रेक्षकांना आधीच लागलेला असतो. दोन कुटुंबांच्या आयुष्याचं साधं सरळ कथानक यामध्ये दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात काही घटनांचा संदर्भच लागत नाही. श्रीकांतच्या मुलाला असलेला आजार कोणता असतो, याबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही.
चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आहेत राज्यपाल सिंग. कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत बोलायचं, तर प्रिया मराठी आणि शंतनू मोघे दोघांचाही अभिनय नैसर्गिक वाटतो. बाकी इतरांचा अभिनय काही लक्षवेधी म्हणावा असा नाही. ठीकठाक आहे. ‘सेकंड मदर (Second Mother)’ हा चित्रपट MX प्लेअरवर अगदी फ्री मध्ये बघता येईल.
चित्रपट: सेकंड मदर (हिंदी)
दिग्दर्शक: राज्यपाल सिंग
कलाकार: शंतनू मोघे, प्रिया मराठे, आस्था चौधरी, अमित डोलावत, इ.
दर्जा: २ स्टार