‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
भावविश्व साकारणारा ‘डायरी ऑफ विनायक पंडित’
एखादी कलाकृती खूप प्रतिकूल परिस्थितीतून आणि कठोर मेहनतीतून साकारली अन् ती नावाजली गेली तर त्या यशाचा आनंद काही औरच असतो. मेहनतीचे चीज वेगळंच समाधान देऊन जाते. तसंच काही ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ (Vinayak Pandit) या मराठी चित्रपटाच्या टीमचं आहे.
२१व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पिफ) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय, ‘पिफ’साठी निवडलेल्या सात मराठी चित्रपटांपैकी तीन मराठी चित्रपट तेराव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडले गेले. त्यात ‘डायरी ऑफ विनायक पंडित’चा (Vinayak Pandit) समावेश आहे. १५ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या यशवंत सेंट्रल सभागृहात या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग झालं. तिथं जाणकार रसिकांची पावती या चित्रपटाला मिळाली.
या चित्रपटाच्या निर्मितीची कथा कठोर मेहनतीची अन् रंजक आहे. काही तरुण मंडळी हा चित्रपट बनविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, बऱ्याच अडचणी होत्या. अशावेळी आदित्य देशमुख, वेदांत मुगळीकर हे निर्माते आणि व्यंकट मुळजकर, हृषिकेश जोशी, विनय देशमुख, समीर सेनापती हे सहनिर्माते पुढं आले. चित्रपटाची कथा उत्तम असल्यानं पुढाकार घेतल्याचं व्यंकट मुळजकर यांनी सांगितलं. मुळजकर हे शासनाच्या कृषिविभागात कार्यरत होते. करोनाचा भयंकर काळ त्यांनी अनुभवला. नंतर त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली अन् कलेलाच पूर्ण जीवन देण्याचं ठरविलं. मुळजकर रंगभूमीशी आधीपासून जुळलेले अन् कलासक्त आहेत. या चित्रपटाची कथा आली, तेव्हा या तरुण कलाकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा त्यांनी ठाम निश्चय केला.
असा घडला चित्रपट
एका कलाकाराचं भावविश्व साकारणारा ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ (Vinayak Pandit) हा चित्रपट आहे. जीवन कसंही असो, ते जगायला हवं, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या चित्रपटाच्या कथेवर सहा महिने नुसता अभ्यास चालला. त्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली. हे चित्रीकरण २६ दिवस चाललं. मयूर श्याम करंबळीकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या तरुण मुलांत काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. त्यांचा तांत्रिक अभ्यासही चांगला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना आमच्यातही उत्साह संचारला, असे मुळजकर यांनी सांगितलं. या चित्रपटातील कथा नायकाच्या डायरीभोवती फिरते. त्याच्या पूर्वायुष्यात त्याला काही वाईट अनुभव आलेले असतात. त्यांना कंटाळून तो आत्महत्या करायला निघतो. नंतर कथा वेगळंच वळण घेतं. हे सर्वकाही साकारताना लेखक, दिग्दर्शकानं आपलं कौशल्य पणाला लावलं आणि एक उत्तम कलाकृती जन्माला आली. त्याचीच पावती ‘पिफ’मध्ये मिळाली. सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक म्हणून कुणाल वेदपाठक तर सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनिंगसाठी मयूर पवार यांना गौरवण्यात आलं. या चित्रपटात अविनाश खेडेकर, सुहास शिरसाट, पायल जाधव, स्वाती काळे, प्रणव रत्नपारखी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत विशेष आकर्षण आहे. पद्मश्री शंकर महादेवन, अभय जोधपूरकर, मंगेश बोरगावकर, जयदीप वैद्य आणि प्रियांका बर्वे यांनी या चित्रपटात गाणी गायली आहेत तर संगीत दिग्दर्शन निरंजन पेडगावकर आणि आनंदी विकास यांचे आहे. मयूर करंबळीकर, निरंजन पेडगावकर, दुर्गेश काळे यांनी गीते लिहिली आहेत. विशेष म्हणजे, यात १९७०-१९८०चा काळ अनुभवायला मिळणार आहे.
१६०० कलाकृतींतून निवड
२१व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये जवळपास १६०० चित्रपट आले होते. त्यातील अंतिम ७ चित्रपटांमध्ये ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ची निवड झाली होती. ३ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटाचे सादरीकरण पुण्यातील पीव्हीआर आयकॉन आणि आयनॉक्स बंडगार्डन येथे झाले. दोन्ही शो मिळून पाचशेहून अधिक प्रेक्षकांनी या या चित्रपटाचा आस्वाद घेतला. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम पुण्यातील आदित्य देशमुख यांच्या मीडियावर्क्स स्टुडिओमध्ये झालं आहे. तर चित्रीकरण पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट, सातारा, रहिमतपूर, ब्रह्मपुरी अशा भागांत पार पडलं.
=======
हे देखील वाचा : नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’
=======
शाबासकीची थाप
पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ला (Vinayak Pandit) रसिकांकडून तर उत्तम दाद मिळालीच. शिवाय, प्रख्यात अभिनेत्री विद्या बालन, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीमला शाबासकीची थाप दिली. असंच मुंबईच्या यशवंत सेंट्रल सभागृहात आयोजित विशेष स्क्रीनिंगदरम्यान घडलं. प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी हा चित्रपट, त्याची संकल्पना, सादरीकरण यांबाबत कौतुक केल्याचं सहनिर्माते व्यंकट मुळजकर यांनी सांगितलं. सध्या चित्रपट महोत्सवांतूनच या चित्रपटाचं प्रदर्शन करायचं आहे. कारण, जाणत्या रसिकांची मोठी दाद या चित्रपटाला मिळते आहे, असं निर्मात्यांनी सांगितलं.