अशोक सराफ…. एक आदर्शवत कलाकार!
तुमचं वय काय. हा प्रश्न कोणाला आवडतो. बहुधा कोणालाच नाही. पण मराठी चित्रपटसृष्टीत असं एक व्यक्तीमत्व आहे, जे सदाबहार आहे. ज्यांचं वाढतं वय त्यांच्या आड कधी आलंच नाही. उलट वाढत्या वयाबरोबर त्यांच्यातला अभिनेता अधिक सक्षम झाला. संपन्न झाला. या संपन्नेतून अभिनयाचा उत्कृष्ठ अविष्कार घडत गेलाय. या अविष्कारात समस्त मराठी जन रममाण आहेत… हे दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ 4 जून रोजी वयाच्या 73 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 4 जून 1947 रोजी मुंबईमध्ये जन्मलेले अशोक सराफ अवघ्या मराठी रसीकांचे मामा म्हणून ओळखले जातात. या चरित्र अभिनेत्याचा सर्व प्रवास रंजक आहे. आणि आदर्शवतही.
अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईतील चिखलवाडीत झाला. त्यांचे वडील इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करायचे. आपल्या मुलाकडून त्यांच्या काही साध्या अपेक्षा होत्या. शिक्षण पूर्ण करुन नोकरी करावी एवढीच ती अपेक्षा. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेमधून व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. अशोकजींना नोकरीपेक्षा अभिनयात गोडी होती. पण वडिलांच्या पुढे त्यांचे काही चालले नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर स्टेट बॅंक ऑफ इंडीयामध्ये नोकरी केली. तब्बल दहा वर्ष नोकरी केली. या दरम्यान त्यांनी काही नाटकातही कामं करायला सुरुवात केली. सुरुवातीला अगदी थोड्या भूमिका त्यांच्या वाट्याला येत असत. नंतर अशोकजी नाटकात जास्त व्यस्त रहायला लागले. त्यामुळे नोकरीचेही खाडे व्हायला लागले. मग दहा वर्षाच्या नोकरीला रामराम करुन अशोकजी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात आले.
गजानन जहागिरदार यांनी एकदा त्यांना पाहिलं. अशोकजींचा स्वभाव आणि अभिनय दोन्ही त्यांना आवडलं. त्यांनी अशोकजींना चित्रपटात भूमिका दिली. १९७१ मध्ये आलेल्या हा चित्रपट म्हणजे ‘दोन्ही घरचा पाहुणा’ होय. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी, म्हणजे १९७५ मध्ये दादा कोंडकेच्या ‘पांडु हवालदार’मध्ये ख-या अर्थानं अशोक सराफ या नावाची नोंद प्रेक्षक आणि दिग्दर्शकांनी घेतली. या भूमिकेपासून सुरु झालेला या चतुरस्त्र अभिनेत्याचा प्रवास विविध छटांमधून साकार झाला. आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच, आत्मविश्वास, नवरी मिळे नव-याला, गंमत जंमत, भुताचा भाऊ, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा, एक डाव धोबीपछाड, एक उनाड दिवस, सगळीकडे बोंबाबोंब, साडे माडे तीन, कुंकू, बळीराजाचं राज्य येऊ दे, घनचक्कर, फुकट चंबू बाबूरा, तू सुखकर्ता, नवरा माझा नवसाचा, वजीर, अनपेक्षीत, एकापेकशा एक, चंगू मंगू, अफलातून, सुशीला, वाजवा रे वाजवा, शुभमंगल सावधान, जमलं हो जमलं, लपंडाव, चौकट राजा, नवरा माझा ब्रह्मचारी, गोडीगुलाबी, गडबड घोटाळा, मुंबई ते मॉरिशस, धमाल बाबल्या गणप्याची, बाळाचे बाप ब्रह्मचारी, प्रेम करु या खुल्लम खुल्ला, गुपचूप गुपचूप, गोष्ट धमाल नाम्याची, हेच माझं माहेर, गोंधळात गोंधळ, चोरावर मोर, जवळ ये लाजू नको, पांडू हावलदार, दोन्ही घरचा पाहुणा, राम राम गंगारा, अरे संसार संसार, वाट पाहते पुनवेची, भस्म, खरा वारसदार, कळत नकळत, आपली माणसं, पैजेचा विडा, बहुरुपी, धुमधडाका, माया ममता, सखी, बाबा लगीन, आयडीयाची कल्पना, झुंज तुझी माझी, टोपी वर टोपी ही त्यांची मराठी चित्रपटसृष्टीतील अफाट कामगिरी. यातल्या प्रत्येक पात्रांनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यांनी साकारलेली बाळासाहेब, फाल्गुन, बंडू, दिनेश लुकतुके, धनंजय माने, खंडूजी फर्जंद, सखाराम हवालदार ही पात्र प्रत्यक्षात जरी असती तरी ती अशीच असती. इतका अशोकजींचा अभिनय सजग आणि सहजही.
सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे हे त्यांचे जिवलग मित्र. या मित्रांच्या साथीने त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. अशोक, सचिन, महेश आणि लक्ष्मीकांत ही चौकडी असली की यश नक्की आणि मनोरंजनही भरपूर. त्यामुळे त्यांचे चित्रपट असले की सिनेमागृहाबाहेर हाऊसफ्फूलचा बोर्ड अभिमाने लागायचा. अशोकजींचा धूमधडाका म्हणजे एव्हरग्रीन कॉमेडी. अजूनही हा चित्रपट टीव्हीवर लागला की ते चॅनेल बदलावंस वाटत नाही. एवढी त्या चित्रपटाची गोड हुकमत मराठी मनावर आहे.
अशोक सराफ म्हणजे चतुरस्त्र अभिनेता. विनोदी भूमिका त्यांनी जेवढ्या सहजपणे साकारली तेवढ्याच गंभीरपणे खलनायकालाही उभं केलं. एकीकडे मिनिटा मिनिटाला आपल्या शाब्दीक चिमट्यांनी घायाळ करणारे. बडबड करणारे. तर दुसरीकडे फक्त नजरेतून समोरच्याला धडकी भरवणारे. कुठलीही भूमिका असू दे, त्या भूमिकेमधील पात्राला त्यांनी पूर्णपणे न्याय दिला.
अभिनेत्री रंजना आणि अशोक सराफ ही जोडीही खूप गाजली. रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात असल्याचीही चर्चा होती. पण एका अपघातात रंजना जखमी झाल्या. त्यांचा चित्रपट प्रवास थांबला. आणि काही वर्षात त्यांचा मृत्यू झाला. पडद्याआड असलेली प्रेमकहाणी तिथेच थांबली.
अशोकजी मराठीत सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. चित्रपट, नाटक यात ते व्यस्त होते. मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटातही त्यांना भूमिका मिळाल्या. पण या मराठी नटाला हिंदीमध्ये तेवढ्या ताकदीची भूमिका मिळाली नाही ही सल कायम राहीली. कुछ तुम कहो कुछ हम कहें, बेटी नं. वन, कोयला, गुप्त, ऐसी भी क्या जल्दी है, संगदील सनम, जोरु का गुलाम, खूबसुरत, येस बॉस, करण अर्जुन, प्यार किया तो डरना क्या या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. अलिकडे अजय देवगणबरोबर सिंघममध्येही अशोकमामा होते. पोलीसांच्या स्थितीबाबत हवाला देणारी त्यांची भूमिका डोळ्यात अंजन घालून गेली. हिंदी चित्रपटात अशोक सराफ यांना तोलामोलाच्या भूमिका मिळाल्या नसल्या तरी त्याची सल त्यांनी हम पांच या मालिकेतून भरुन काढली. पाच मुलींचा बाप म्हणून या मालिकेतून ते पुढे आले. मिस्टर माथूर हा नेहमी मुलीं आणि पत्नीच्या खोड्यांनी त्रस्त झालेला असतो. त्यात शेजारी आणि मृत पत्नीचा हस्तक्षेप. या मालिकेनं अनेक रेकॉर्ड केले. यासोबत टना टना टन, डोन्ट वरी हो जाएगा, छोटी बडी बातें या मालिकांमधूनही अशोकजींनी छोट्या पडद्यावर आपली हुकमत निर्माण केली.
हमीदाबाईची कोठी हे नाटक अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीतील मोलाचे नाटक म्हणावे लागेल. या नाटकासोबत हा मनस्वी कलाकार अनधिकृत, मनोमिलन, हे राम कार्डिओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय या नाटकांमधून रंगभूमीबरोबर कायम जोडला गेला.
तब्बल पंचेचाळीस वर्षाहून अधिक काळ हा कलाकार आपल्याला त्याच्या अभिनयामधून कधी हसवतो. कधी डोळ्यातून पाणी काढतो तर कधी स्तब्ध करतो. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे अशोकजी नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहीले. जे जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करावे. प्रसिद्धी आपोआप मिळेल हा त्यांचा स्वभाव. त्यांचा स्वभाव हा अत्यंत हळवा. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर त्यांनी एका लहान भावाप्रमाणे प्रेम केलं होतं. पण लक्ष्मीकांत यांच्या अकाली मृत्यूचा धक्का अशोकजींना बसला. अगदी संघर्षाच्या काळापासूनची या दोघांची मैत्री. सुरुवातीला ही दोघं गिरगावमध्ये रहायची. चित्रपटात भूमिका करायला लागल्यावर त्यांनी मग एकाच बिल्डींगमध्ये फ्लॅट खरेदी केले. आपल्या जीवलग मित्राच्या अकाली निधनानंतर अशोकजींनी त्याच्या कुटुंबाला मोठ्या भावाप्रमाणे आधार दिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि मुलाने त्याचा अनेकवेळा उल्लेख करुन अशोकजींचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची दोस्ती जशी होती तशीच त्यांच्या मुलांचीही आहे.
अशोक सराफ आपल्या सुखी आयुष्याचे सर्व श्रेय आपली पत्नी निवेदीता सराफ यांना देतात. पूर्वाश्रमीच्या निवेदीता जोशी या तेवढ्याच सक्षम अभिनेत्री. या पती पत्नींमध्ये अठरा वर्षाचे अंतर आहे. मात्र त्यांच्यामधील प्रेमानं या अंतरावर मात केली. खरतर अशोकजी आणि निवेदीता यांचे वडील गजानन जोशी हे दोघं मित्र. हे दोघं डार्लिंग डार्लिंग नावाचं नाटक एकत्र करीत होते. तेव्हा लहानगी निवेदीता अशोकजींना सेटवर भेटलीही होती. त्यावेळी हीच निवेदीता पुढे आपली सहचारीणी होईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. नवरी मिळे नव-याला या चित्रपटात त्यांनी प्रथम एकत्र भूमिका केली. त्यात त्या दोघांचीही जोडी वेगवेगळ्या कलाकारांबरोबर होती. अशोकजी निवेदीताला गजानन जोशी यांची मुलगी म्हणून ओळखत होते. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान ते एकही शब्द बोलले नाहीत. पुढे असाच एक चित्रपट या दोघांनी केला. नंतर केलेल्या धुमधडाका या चित्रपटात गाडी चालविण्याचे दृष्य होते. निवेदीता यांना गाडी चालवता येत नव्हती. अशोकजींनी तेव्हा पुढाकार घेऊन त्यांना गाडी शिकवली. नंतर याच चित्रपटाचे शुटींग नरसोबाच्या वाडीला झालं. तेव्हा एका शुट नंतर निवेदीता एकट्याच गर्दीत अडकल्या. तेव्हा अशोकजींनी त्यांना मदत केली. येथूनच या जोडीच्या प्रेमाला सुरुवात झाली. मामला पोरीचा या चित्रपटाच्या वेळी मात्र या जोडप्याच्या भावना व्यक्त झाल्या. या चित्रपटाआधी अशोकजींना मोठा अपघात झाला होता. अगदी सहा महिने त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. पण निर्मात्याचं नुकसान नको म्हणून त्यांनी मामला पोरीचा या चित्रपटाचं शुटींग सुरु केलं. तेव्हा त्यांना मान हलवायला सुद्धा त्रास होत होता. या वेदना बाजुला सारुन त्यांनी चित्रपट पूर्ण केला. निवेदीता यांना अशोकजींची ही वृत्ती खूप आवडली. आपल्यामुळे इतरांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या वेदना बाजुला ठेवल्या होत्या. या वेदनेतून एक नातं जोडलं गेलं. आता त्यांच्या लग्नाला चाळीस वर्ष होत आलीत. निवेदीता म्हणतात की अशोक हे मोठे अभिनेते आहेत, पण त्याआधी मी त्यांना माणूस म्हणून पसंत केलंय. ते सच्चे आहेत. कुटुंब त्यांना अधिक आवडतं. ते कुटुंबातील प्रत्येकाला जपतात. काळजी घेतात. या त्यांच्या स्वभावामुळे खूप माणसं जोडली गेली. आणि अर्थातच निवेदीताही याच स्वभावावर भाळल्या. निवेदीता यांनी लग्नाचा विचार बोलून दाखवल्यावर वयाचा विचार प्रथम आला. अशोकजींनीही त्यांना कल्पना दिली. विचार कर म्हणून सल्ला दिला होता. पण त्या ठाम राहील्या. निवेदीता यांच्या आईलाही हे लग्न मंजूर नव्हते. त्यांची आई आणि बहिण यांनी अभिनेता जावई नको होता. पण पुढे अशोकजींच्या स्वभावामुळे हा विरोध मावळला. गोव्याला मंगेशीच्या मंदिरात अगदी साध्या सोहळ्यात या दोघांचा विवाह झाला. विवाहाच्या वेळी अशोक हे सुपरस्टार होते. निवेदीता यांनी नुकतीच आपली कारर्किद सुरु केली होती. पण लग्नानंतर त्यांनी घराला प्राधान्य दिलं. जवळपास 14 वर्ष त्या पडद्यापासून दूर राहील्या. आपल्या मुलाला, अनिकेतला वेळ दिला. आज या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा प्रसिद्ध शेफ आहे. फ्रान्समध्ये त्याचं शिक्षण झालंय. युट्युबवर ‘निक सराफ’ या नावानं त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध आहेत.
आता अवघ्या चित्रसृष्टीत अशोकजी अशोक मामा म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान प्रकाश शिंदे नावाचे कॅमेरामन आपल्या लहान मुलीला घेऊन यायचे. या मुलीला अशोकजींची ओळख करुन देतांना या शिंदे नावाच्या कॅमेरामननं त्यांना मामा म्हणं, असं सांगितलं. त्या दिवसापासून ती मुलगी अशोकमामा म्हणून अशोकजींना हाक मारायला लागली. काही दिवसातच शुटींगचं अख्ख युनिट त्यांना अशोक मामा म्हणायला लागलं. आणि इथून त्यांचं हे नाव कायम पडलं.
अशोकजींना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांच्यासाठी प्रेक्षकांकडून मिळणारे भरभरून प्रेम हाच खरा पुरस्कार आहे. आज आपल्या मुलांनी आपला वारसा चालवावा म्हणून साधा कलाकारही मुलांसाठी चित्रपट काढतो. निर्मात्यापुढे जी जी करतो. पण अशोकजींचा स्वभावच वेगळा. आपल्या मुलांनी निवडलेली स्वतंत्र वाट त्यांना आवडते. आता फार क्वचित ते पडद्यावर येतात. पण आपल्या पत्नीने सुरु केलेल्या सेकंड इनिंगला त्यांनी भरपूर पाठिंबा दिला आहे. यालाच कलाकार म्हणतात. एका कलाकाराचे मन जाणून वागणारा. अशोकजींबद्दल काय सांगावे. ते तर या सच्चेपणाच्या बाबतीत एक पाऊल पुढेच आहेत. अशोकजी तुम्ही असेच रहा. सदाबहार. अशोकाच्या छान फुलांनी बहरलेल्या झाडासारखे. प्रसन्न आणि दुस-याला आनंद देणारे.