‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
एक सुंदर कलाकृती आणि बेहतरीन गाणी देणाऱ्या पाकिजा आणि मीना कुमारीचा 15 वर्षांचा रोमहर्षक प्रवास!
आज इतकी वर्षे लोटली तरी ३१ मार्च हा दिवस सिने रसिक विसरू शकत नाहीत. कारण याच दिवशी अभिनेत्री मीनाकुमारीने अखेरचा श्वास घेत रसिकांना ’अलविदा’ म्हटले; ते वर्ष होतं १९७२. तिच्या मृत्यु पूर्वी काही दिवस अगोदर म्हणजे ४ फ़ेब्रुवारी १९७२ ला तिचा ’पाकीजा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा ’मुहूर्त’ झाला होता १९५६ साली! म्हणजे तब्बल १५ वर्षे तो निर्मिती अवस्थेत होता याचं कारण मीना कुमारी आणि तिचे पती कमाल अमरोही यांच्यातील वितुष्ट. सुरूवातीला या सिनेमात तिचा नायक अशोककुमार होता. संगीतकार गुलाम महंमद यांनी काही गाणी रेकॉर्ड देखील केली. सिनेमाचं शूटींग सुरू झालं. बॉम्बे टॉकीजचे छायाचित्रकार जोसेफ होते. अमरोहींना सिनेमा भव्य दिव्य करावयाचा होता. पण त्याच वेळी पती पत्नीतील मतभेदांनी उचल खाल्ली व सप्टेंबर १९६४ पासून ते वेगळे राहू लागले.
’पाकीजा’चे चित्रीकरण थांबले. दरम्यानच्या काळात संगीतकार गुलाम महंमद, छायाचित्रकार जोसेफ यांचे निधन झाले. मीना देखील आयुष्यातील दु:खाचे सोल्युशन ’एकच प्याल्यात’ शोधू लागली. प्रतिभावान दिग्दर्शक अमरोही देखील आयुष्यातील ताण तणावांनी त्रस्त होते. साठच्या दशकाच्या अखेरीस सुनील दत्त व नर्गीस यांनी ही कॊंडी फोडली. त्यांनी अमरोही कडे या सिनेमाच्या रशेस बघितल्या व इतकी अप्रतिम कलाकृती मातीमोल होवू नये म्हणून ती पुरी करण्याचा हट्ट धरला. मीना व अमरोही दोघांना भेटून त्यांनी त्यांच्यातील दुरावा कमी केला व ’पाकीजा’ चं १६ मार्च १९६९ ला पुन्हा शूटींग कमलीस्तान स्टुडीओत सुरू झालं. आता कथानकात थोडा बदल करून अशोक कुमार च्या जागी राज कुमार आला. संगीतकार नौशाद अली यांनी सिनेमाचं पार्श्वसंगीत व उरलेली गाणी केली. छायाचित्रण व्ही के मूर्तींनी केलं पण आता मीनाची तब्येत तिला साथ देत नव्हती. तिच्या कथ्थक नृत्याच्या वेळी क्लोज अप्स फक्त मीनाचे घेतले; लॉंग शॉटमध्ये पद्मा खन्ना होती. कमरोही यांना यातील ’चलो दिलदार चलो चांद के पार चलो’ हे संपूर्ण युगल गीत मीना कुमारीचा चेहरा न दाखवता शूट करावं लागल! अप्रतिम संगीताने नटलेल्या पाकीजा ची गाणी अप्रतिम बनली होती. इन्ही लोगोने इन्ही लोगोने, चलते चलते यूं ही कोई मिल गया था, मौसम है आशिकाना, थाडे रहियो, नजरिया की मारी, आज हम अपनी दुआंओंका असर देखेंगे…
मीनाकुमारीने आयुष्यभर समाजासाठी/कुटुंबासाठी हुतात्मा होणारी स्त्री अशा भूमिका केल्याने तिच्यावर ट्रजिडी क्वीन असा शिक्का बसला. पण वास्तव जीवनात ती तशी दु:खीच होती. तिच्या अडीचशे डायर्यांमधून तिचं हे दु:ख शायरीच्या माध्यमातून उमटत राहिलं. अवघं ४० वर्षाचं आयुष्य लाभलेली मीना रूपेरी पडद्यावरील अभिजात नायिका होती!