कॅप्टन अमेरिका….
अव्हेंजर्स असेंबल हे जादुई शब्द आहेत हे शब्द म्हणत जेव्हा त्याची एन्ट्री पडद्यावर होते, तेव्हा संपूर्ण थेटरमध्ये एकच गोंधळ होतो शिट्ट्या मारल्या जातात मग तो येतो त्याच्यासोबत त्याचं ते फेमस शिल्ड असतं. आपल्या सारख्या ढालीसारखं. आल्याआल्या तो शत्रूंवर तुटून पडतो. त्यांना मारत सुटतो. आणि त्याचे चाहते पुन्हा आनंदात शिट्ट्या मारत आपल्या हिरोचे कौतुक करण्यात मग्न होतात.
हा हिरो आहे, क्रिस्टोफर रॉबर्ट क्रिस इवांस म्हणजेच अव्हेंजर्स चित्रपटांच्या मालिकांमधील कॅप्टन अमेरिका. क्रिस इवांस याचा हा कॅप्टन अमेरिकेचा प्रवास म्हणजे त्याच्या भूमिकेसारखाच आहे. जादुई. भन्नाट. एका साध्या मुलाचे हिरोमध्ये नव्हे तर सुपर हिरोमध्ये रुपांतर करणारा.
क्रिसचा जन्म अमेरिकेच्या बोस्टन या शहरातला. त्याचे वडील रॉबर्ट डेन्टीस्ट तर आई लीसा ही रंगभूमीवर नाट्यदिग्दर्शिका म्हणून काम करायची. क्रिसनं शालेय जीवनात नाटकात भाग घेतला. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर क्रिस अभिनय क्षेत्रात पुढचे शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला गेला. तिथे त्याने थेअटर आणि फिल्म इन्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. येथील पदवीनंतर क्रिसनं चित्रपटांच्या ऑडीशन द्यायला सुरुवात केली. तिथे त्याला नकार आला. नाराज झालेला क्रिस निराश झाला होता. आपला मार्ग चुकला की काय असा विचार तो करु लागला होता. पण त्याच्या मित्रांनी समजवलं. पाठिंबा दिला. क्रिसला व्हिडीओगेम बनविणा-या कंपनीची जाहीरात करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यानं मॉडेलिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर क्रिसला टीव्हीवरील मालिकांमध्ये भूमिका मिळाली. यानंतर मात्र क्रिसचा चित्रपटातला मार्ग मोकळा झाला. फँटॅस्टिक फोर मध्ये क्रिसनं जॉनी स्टॉर्म म्हणजेच ह्युमन टॉर्च ची भूमिका केली. फँटॅस्टिक फोरचे सिक्वलसारखे आणखी दोन चित्रपट आले. त्यात क्रिस याच ह्युमन टॉर्चच्या भूमिकेत चमकला. त्यानंतर त्याला त्याचा ड्रीम रोल मिळाला. मार्रव्हल मु्व्हीच्या अव्हेंजर चित्रपटातील कॅप्टन अमेरिका ही भूमिका त्याला मिळाली. पहिल्यांदा क्रिसनं या भूमिकेला नकार दिला होता. पण नंतर त्याने होकार दिला. आणि जगभरात त्याला कॅप्टन अमेरिका म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर दि विंटर सोल्जर, कॅप्टन अमेरिका-दि विंटर सोल्जर, कॅप्टन अमेरिका-सिव्हिल वॉर, दि अव्हेंजर्स-एज ऑफ अल्ट्रॉन, अव्हेजर्स-इंन्फीडीटी वॉर, अव्हेंजर्स-एन्डगेम या हॉलिवूडपटांमधून क्रिस इवांस हे नाव नाव जगभर कॅप्टन अमेरिका म्हणून प्रसिद्ध झाले. जगभरातले तरुण-तरुणी या कॅप्टनच्या प्रेमात पडले. या मार्रलव्ह पटांना अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. हजारो डॉलरचा फायदा या चित्रपटांना झाला.
क्रिस इवांस तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. कुठलंही संकट असो. परग्रहावरुन आलेले कोणी असो की कोणी हिंसक प्राणी असो. कॅप्टन अमेरिका सगळ्या संकटावर मात करेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. आता या कोरोनाच्या संकटावर क्रिस सारखाच एखादा हिरो कधी येईल याच्या प्रतिक्षेत हे चाहते असणार हे नक्की…