हे आणणार जगातील सर्वात पहिला एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म
निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक घेऊन येत आहेत मराठी भाषेचा अभिमान जपणारा, भारताचा पहिला-वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म.
ओटीटी या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्या पूर्णरूपी बदलली आहे. भारतात विविध निर्मितिगृहांनी व व्यावसायिकांनी ओटीटीचा क्षेत्रात झेप घेतली आहे. परंतु मराठी भाषेला जो दर्जा मिळायला हवा तो या ओटीटी वर मिळताना दिसत नाही. प्लॅनेट मराठी ओटीटी हे भारतातले पहिले असे माध्यम असेल जे मराठी भाषेतील मनोरंजनास प्राधान्य देईल. निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक घेऊन येत आहेत मराठी भाषेचा अभिमान जपणारा, भारताचा पहिला-वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म.
‘म मनाचा, म मराठीचा’ ही टॅगलाईन दर्शवते की मराठी कलेला प्राधान्य मिळावे व मराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतिल मनोरंजन एका क्लिकवर उपलब्ध व्हावे हेच प्लॅनेट मराठी ओटीटीचे ध्येय. चित्रपट, नाटकं, सत्य घटनांवर आधारित व काल्पनिक कलाकृती, वेब सिरीज, डोकमेंटरी, या साऱ्यांची सांगड घालणारा हा एकमेव मराठी ओटीटी असणार आहे. मनोरंजनच नव्हे तर पाककला, व्यायाम, लहानमुलाचे माहितीपर कार्यक्रम हे सारेच या ओटीटीवर उपलब्ध असेल. अँड्रॉइड व आयओएस धारकांसाठी मनोरंजनाची नवी परिभाषा आखणाऱ्या या ओटीटी ने प्रत्येक मराठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काहीतरी खास प्रयोजन केलेले आहे तेही अगदी माफक अश्या दरात. आता खऱ्या अर्थाने मराठी भाषेतील मनोरंजनाला मानाचे स्थान मिळणार आहे असे म्हणायला हरकत नाही.
प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. चे सीएमडी व मराठी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीविषयी केलेले हे वक्तव्य, “मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील”.
प्लॅनेट मराठी बाबत बोलताना अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतात, “प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहत आहे”. पुष्कर सेलर प्लॅनेट मराठी सर्व्हिसेस प्रा. लि. चे सीईओ देखील आहेत.
संगीत संयोजक आदित्य ओक हे प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि.चे सीओओ आहेत. या आगळ्या-वेगळ्या ओटीटी माध्यमाच्या भाग होण्याविषयी व्यक्तं होताना ते म्हणाले, “प्लॅनेट मराठी ओटीटी हे पहिला-वहिला संपूर्णतः मराठीपण जपणारं माध्यम आहे. मराठी भाषा मराठी माणसांनी जोडणाऱ्या या ओटीटी टीमचा मी भाग आहे हे माझे सौभाग्य. प्रेक्षकांही आमचा हा प्रयत्न नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते”.