मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
पॅशन पासून सक्सेसकडे..
वयाच्या पंचेचाळीनंतर बॉलिवूडमध्ये अजित यांनी एन्ट्री घेतली. उरी द सर्जिकल स्ट्राईक, पानीपत, वॉर, साहू, दरबार, दबंग 3, बॉईज 2 या सारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटामधून अजित शिधये यांनी भूमिका केल्या आहेत. अभिनयाचा अनुभव नाही, आणि कोणी गॉडफादर नाही. तरीही केवळ जिद्दीच्या जोरावर अजित यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटाबरोबर बर्ड ऑफ ब्लड, सिलेक्शन डे, गोल सारख्या वेबसिरीजमध्येही अजित झळकले आहेत. कुठलीही गोष्ट करण्यासाठी वय हा फॅक्टर त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. तर जिद्द आणि परिश्रम या दोन गोष्टी मह्त्त्वाच्या आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्थिरावलेले अजित शिधये नेमके बॉलिवूडमध्ये आले कसे…..
वयाच्या पंचेचाळीशीपर्यंत असलेले सुखासीन आयुष्य सोडून एका नव्या वाटेचा शोध कोणी घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय म्हणाल…वेडेपणा…नक्कीच…काही मोजकी माणसं असा वेडेपणा करतात. कारण वय त्यांच्यासाठी अडसर म्हणून नसते. तर यशाचा नवा मार्ग असतो. मग भलेही त्याला जग काहीही म्हणो…वयाच्या पंचेचाळीत रग्गड पगाराची नोकरी सोडून असाच वेगळा मार्ग चोखंदाळाचा प्रयत्न एकानं केला. या नव्या वाटेवर थोडे कष्ट झाले…पण ते कधी त्रासदायक वाटले नाहीत…कारण त्यात समाधान होतं, ते आपण आपल्या मनातील गोष्ट सत्यात उतरवल्याचं…समाजाला वाटणा-या वेडेपणातून ही समाधानाची वाट शोधणारे व्यक्तीमत्व म्हणजे अजित शिधये…हे नाव गेल्या काही वर्षात हिंदी सिनेमात रुजू पहातंय…लहानपणीची अभिनयाची आवड त्यांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर सत्यात उतरवली आहे.
अजित यांची ही अनोखी गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. मुळ डोंबिवलीकर असलेल्या अजित यांचे शिक्षण मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. शाळेतल्या कंपूमध्ये अजित उत्तम नकला करायचे. किंबहुना सर्व ग्रुपचा होल्ड त्यांच्याकडे होता. दहावीनंतर त्यांचे आई वडील, आनंद आणि आनंदी शिधये हे पुण्याला आले. तिथे अजित यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर एफसीआय कॉलेजमधून हॉटेल मॅनेंजमेंट केलं. कॉलेजमध्ये असतांना अजित यांनी नाटकात काम केलं. अभिनयाची गोडी तेव्हा होती…पण करिअर म्हणून या क्षेत्राचा कधी विचार केला नाही. पण तेव्हा अभिनयात करिअर करायचंय हे घरी सांगण्याचं डेअरिंग नव्हतं. शिवाय या क्षेत्रात करिअर होईल की नाही याची अजित यांनाही खात्री नव्हती. त्यामुळे अजित यांनी अभिनयाची निर्माण झालेली आवड बाजुला ठेवली. कधी ना कधी हा बंद केलेला कप्पा उघडणार याचा अजित यांना विश्वास होता.
हॉटेल मॅनेजमेंट झाल्यावर अजित यांनी ओपनिंग टीम म्हणून अनेक पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम केलं. पुढे अजित क्रुझवर जॉईन झाले. क्रुझवर अधिकारी म्हणून रुजू झाले. दहा वर्ष अजित क्रुझवर होते. त्यांनी ट्रेनिंग ऑफीसर म्हणूनही काम केलं. 114 देश पाहिलेल्या अजित यांनी स्किल मॅनेजमेंट या विषयावर अजित व्याख्यान देतात. स्कील मॅनेजमेंटवरही अजित ट्रेनिंग घेत आहेत. शिवाय ते उत्तम तबला वादक आहेत. त्यामुळे क्रुझवर असतांना त्यांचा तबला वादनाचा कार्यक्रमही होत असे. एकूण अजित यांचे जीवन सुरुळीत होते. त्याचवेळी अजित यांनी आपल्या जुन्या छंदाला पुन्हा उजाळा देण्याचा निर्णय घेतला.
नोकरी सोडून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये करिअर करण्याचा निर्णय अजित यांनी घेतला. वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी अजित यांनी हा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय कुटुंबियांसाठीही थोडा धक्कादायक होता. त्यावेळी त्यांचा मुलगा 18 वर्षाचा होता. या वयात सेटल होऊन मुलाचं करिअर प्लॅन करायचं की आपलं करिअर करायचं, असा प्रश्न त्यांना अनेकांनी केला. काहीजणं वेडा म्हणाले. अनेकांनी हा चुकीचा निर्णय आहे, मागे फीर म्हणूनच सल्ला दिला. अजित सांगतात, यात त्यांचा दोष नव्हता. कारण आपल्या समाजात ठराविक वयात शिक्षण, लग्न, करिअर या गोष्टी झाल्याच पाहिजेत, असा नियम जणू झालाच आहे. अजित सांगतात, आपण पठडीबद्ध, एका साच्यातल्या अशा वातावरणात वाढतो. अशावेळी असा प्रवाहाच्या विरुद्धचा निर्णय घेतला की सर्वांनाच धक्का बसतो. अजित यांनी मात्र अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता.
फिल्म इंडस्ट्रीमधल्या काही लोकांनाही या निर्णयाचे आर्श्चय वाटले. पण त्यापैकी काहींनी अमरीश पुरी, बोम्मन इराणी यांची उदाहरणं देऊन अजित यांच्या निर्णयाचे स्वागत केले. अर्थात, अमरीश पुरी आणि बोम्मन इराणी यांनी बॉलिवूडमध्ये उशिरा प्रवेश केला असला तरी त्यांच्याकडे रंगभूमीचा प्रचंड अनुभव होता. त्याबाबतीत अजित यांची पाटी मात्र कोरी होती. त्यांनी अगदी अ, आ ,इ अशी सुरुवात करायची होती. त्यामुळे प्राथमिक पातळीवर संघर्ष करायची त्यांची तयारी होती. अजित यांची फिल्म इंडस्ड्रीमध्ये कोणाचीही ओळख नव्हती. त्यामुळे जो संघर्ष करायचाय तो आपल्याला एकट्याला, आपल्याच जीवावर करायला लागणार याची त्यांना जाणीव होती. साधारण सुरुवातीचे आठ ते दहा महिने अजित पुणे ते मुंबई असा रोज प्रवास करायचे. जिथे ऑडीशनला बोलावले असेल तिथे ते वेळेत पोहचायचे. मात्र त्या ठिकाणी गेल्यावर समजायचे, त्या भूमिकेसाठी त्यांचे व्यक्तीमत्व फिट होत नाही. त्यामुळे रिजेक्ट व्हायचे. मग पुन्हा पुण्याला….अशावेळी पहिल्यांदा चिडचिड व्हायची. पण नंतर सवय झाली. अशा तब्बल 131 ऑडीशनच्या फे-या अजित यांनी केल्या. सुरुवातीला जाहीरातीमध्ये काम करण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यामुळे जाहीरातीमध्ये काम करण्यासाठी केलेले त्यांचे हे प्रयत्न वाया गेले. जाहीरातीमध्ये अजित यांना संधी मिळत नव्हती. आता आपल्याला यात संधी मिळणारच नाही, अशी त्यांनी समजूत करुन घेतली. योगायोगाने नेमकं त्याच दिवसापासून त्यांच्याकडे जाहीरातींचा ओघ सुरु झाला. त्यापैकी काही जाहीराती तर ऑडीशन न करताही अजित यांना मिळाल्या.
दरम्यान अजित GHOUL या नेटफ्लिक्सवरील बेवसिरीजमध्ये त्यांनी पहिला ब्रेक मिळाला. मात्र या मालिकेचे प्रक्षेपण उशीरा झाले. त्यानंतर अजित यांनी केलेले प्रोजक्ट आधी रिलीज झाले. याचवेळी अजित यांना दिलिप प्रभावळकर असलेली चूकभल द्यावी घ्यावी ही मालिका मिळाली. परदेशात स्थायिक झालेल्या मुलाच्या भूमिकेत अजित होते. अजित यांची भूमिका छोटी होती. पण यातून अजित शिधये यांची ओळख झाली. तसेच मालिकांमध्ये शुटींग कसं होतं याचा अनुभव मिळाला. चुकभूल द्यावी घ्यावी ही मालिका मिळाली आणि अजित यांच्या कुटुंबियांचाही दृष्टीकोन बदलला. छोट्या पडद्यावरची ताकद समजली. जिंदगी नॉटआऊट या मालिकेत एका कोचची भूमिका त्यांनी केली. त्यानंतर सीआयडी मालिकेच्या काही भागांमध्ये अजित यांना संधी मिळाली…एकूण अजित यांचा अभिनय प्रवास सुरु झाला.
अजित यांना चित्रपट किंवा मालिकांमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या असल्या तरी त्यांनी ज्या बॅनर खाली काम केलं आहे त्यांची नावं मोठी आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे. यशराज फिल्मच्या वॉरमध्ये त्यांची भूमिका होती. उरी द सर्जीकल स्ट्राईक हा चित्रपट त्यांच्या करिअरमधला मोठा ब्रेक ठरला. प्रभासबरोबर त्यांनी साहो मध्ये भूमिका केली. या भूमिका छोट्या असल्या तरी चित्रपटाचे बॅनर मोठे होते. त्यामुळे अजित शिधये या नावाला ओळख मिळायला सुरुवात झाली. अजित आपल्या मर्यादाहा जाणून आहेत. ते सांगतात, मी भूमिकेची निवड करण्याऐवजी त्या भूमिकेसाठी माझी निवड होणं महत्त्वाचं ठरलं.
अजित यांची इमेज पोलीस अधिकारी, आर्मी ऑफीसर, अफगाणी व्यक्ती, दहशतवादी म्हणून पडद्यावर परिचित झाली. त्यामुळे त्यांना याच स्वरुपाच्या भूमिकांची ऑफर यायला लागली. पहिल्यांदा त्यांनी अशा भूमिकांना नकार दिला. त्यातील बहुतेक भूमिका या अतिरेकी, पाकिस्तानी अधिका-याच्या धर्तीवर होत्या. पण नंतर अजित यांनी भूमिका कुठली आहे, यापेक्षा तिचे चित्रपटात किती महत्त्व आहे, यावर भर दिला.
अशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत मध्येही असाच प्रकार झाला. अजित यांनी पहिल्यांदा वेगळी भूमिका देण्यात आली होती. मात्र पानिपतचं शूट खूप दिवस चालणार होतं. त्यामुळे त्यातील लूक कायम ठेवावा लागणार होता. त्यामुळे गोवारीकर यांनी दिलेला रोल अजित यांनी नाकारला. पण त्यानंतरही शहावली खानची भूमिका त्यांच्यापर्यंत आली. याला अजित लक म्हणतात. अजित यांचे पानिपत मध्ये अकरा सीन होते. अगदी घोडेस्वारीचे सीनही होते. पण प्रत्यक्ष चित्रपटात त्यातले काही सीन कापण्यात आले. अर्थात अजित या सर्वांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघतात. या चित्रपटादरम्यान आपल्याला काय शिकायला मिळालं यावर त्यांनी भर दिला. अशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या दिग्दर्शकाबरोबर काम मिळालं हिच अजित यांच्यासाठी मोठी गोष्ट होती.
अजित गोवारीकर यांचा उल्लेख अजित विद्यापीठ असा करतात. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्याचं ते सांगतात. अगदी सेटवर वागायचं कसं, बोलायचं कसं, सेटवरच्या दोन हजार लोकांना मॅनेज करायची त्यांची शैली, तंत्रज्ञानातील त्यांना माहीत असलेले बारकावे हे सर्व पानिपतच्या सेटवर शिकता आलं. अशुतोष गोवारीकर हे खूप मोठं नाव असलं तरी हा माणूस अत्यंत विनयशील आहे. अभिनयाचं शिक्षण अजित यांनी कुठंही घेतंल नाही, पण पानीपतच्या सेटवर अनेक गोष्टी शिकता आल्याचं ते सांगतात.
अजित यांना स्ट्रगलर हा शब्दच आवडत नाही. अजित या इंडस्ट्रीमध्ये येणापूर्वी त्यांचं आयुष्य सेट होतं. भरभक्कम पगाराची नोकरी होती. चोवीस वर्षांचा हॉटेल इंडस्ट्रीचा अनुभव त्यांच्या पाठी होता. 114 देश पाहिलेल्या अजित यांनी स्किल मॅनेजमेंट या विषयावर व्याख्यानंही दिली आहेत. आणि अदयापही देतात. याशिवाय व्यक्तिमत्व विकास या विषायवर ते व्याख्यानंही देतात. कार्पोरेट ट्रेनर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. एमबीए करणा-या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. ट्रेनिंग प्रोग्रॅमही ते करायचे. पण नंतर अशा ट्रेनिंग प्रोग्रॅमला गेल्यावर त्यांना चित्रपटातील कामासाठी फोन यायचे. मग अशावेळी नेमकं काय करायचं हा प्रश्न पडायचा. त्यामुळे काही वर्ष तरी पूर्णवेळ अभिनयासाठी देण्याचा निर्णय अजित यांनी घेतला. त्यासाठी सोयीस्कर म्हणून ते मुंबईला रहायला आले. इथे काही दिवस त्यांनी रुम शेअर केली होती. हिंदी चांगलं होण्यासाठी पंजाबी मुलांसोबत अजित रहायचे. पुण्याला अजित यांचं मोठं घर आहे. कुटुंब आहे.
अशा घराला सोडून मुंबईला छोट्या फ्लॅटमध्ये रहाणं कठीण होतं. पण अभिनयाच्या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून त्यांनी या सर्वांकडे पाहिलं.हा निर्णय घेतल्यावर घरच्यांना सांगितलं की मला फक्त दोन वर्ष हवीत. मनात काही आलं आणि ते आपण केलं नाही यापेक्षा आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी काहीही प्रयत्नच केले नाही याची बोच त्यांना नको होती. जी गोष्ट करायची ती शंभर टक्के करायची नाहीतर नाहीच. अजित यांची ही जिद्द इथे कामी आली.
ते जेव्हा ऑडीशनला जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर आलेल्या मुलांबरोबर बोलणं व्हायचं. अगदी पंधरा-वीस ऑडीशन दिलेले तरुण खचून गेलेले असायचे. त्यांना अजित आपला अनुभव सांगायचे. त्यांना 131 वेळा नकार मिळाला. पण अजित या नकाराकडे कॅमे-यासमोर किती वेळा उभं रहाण्याची संधी मिळाली म्हणून बघतात. पहिल्यांदा ऑडीशनला जावं लागलं तेव्हा त्यांना मोठ्या रांगांमध्ये थांबावं लागायचं. अगदी दोन ते चार तास आपला नंबर येण्याची वाट बघावी लागे. पण त्यानंतर ऑडीशनला एक ठराविक स्लॉट अजित यांना मिळायचा. त्यानंतर मात्र ऑडीशनला स्टुडीओत जाण्यापेक्षा ऑडीशन घरुनच करुन पाठवायची संधी त्यांना मिळाली. अजित सांगतात, सर्वांना या स्टेजमधून जावं लागतं.
अभिनयाव्यतिरिक्त अजित यांना ड्रायव्हींगची प्रचंड आवड आहे. दरवर्षी पुणे ते केदारनाथ हा कारने ते प्रवास करतात. जाऊन येऊन पाच हजार चारशे किलोमिटरचा हा प्रवास आहे. अभिनयाच्या या प्रवासात नवीन असले तरी अजित सांगतात तुमची पॅशन काय आहे, हे महत्त्वाचं असतं. त्यावर तुम्ही लक्ष दिलंत तर त्यामागून प्रसिद्धी , पैसा हे सर्व येतच….अजित शिधये यांची ही सकारात्मक विचारशैलीच त्यांच्या यशाचा पाया ठरली आहे. कलाकृती मिडीयातर्फे त्यांनी शुभेच्छा…
सई बने