‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पारशी समाज आणि सिनेसृष्टी…
भारतीय संस्कृतीमध्ये दूधात साखर विरघळून जावी असा एकरूप झालेला समाज म्हणजे पारशी समाज! अतिशय शांतताप्रिय,उद्यमशील,कला,साहित्य,समाजकारण,राजकारण या सार्या क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने पुढे आलेल हा समुदाय. हे अग्नीचे पूजक.पतेती हा त्यांचा नववर्षदिन. या निमित्ताने सिनेमाच्या दुनियेत या समाजाने आपला कसा वेगळा ठसा उमटवला हे पाहणं औचित्याचे ठरेल. रंगभूमी आणि सिनेमा या दोन्ही माध्यामातून त्यांनी कलेची मोठी सेवा केली. ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट दिग्दर्शित करणारे अर्देशर इराणी पारशीच होते. मूकपटापासून या समुदायाची या क्षेत्रात मोठी चहल पहल होती. मिनर्व्हा मूव्हीटोनचे सोहराब मोदी यांचे योगदान फर मोठे आहे.
मिस्त्री, वाडीया, इराणी, डावर, नरीमन, मोदी, स्क्रूवाला या आणि अशा नावाच्या कित्येकांच्या कर्तृत्वाशिवाय बॉलीवूडचा इतिहास अधुरा आहे.या समाजाचे रूपेरी पडद्यावरील सादरीकरण मात्र खूपच टाइप्ड होते. पारशी तरूण टिपीकल गोल काळी टोपी बंद गळ्याचा कोट परीधान करून आपल्या व्हिंटाज कार मधून कुटुंबीयासोबत जात आहे;सोबतीला त्याची बायको गुलाबी रंगाची साडी भडक मेकाप करून हातात जापानी पंखा घेवून सोबतीला ढेर सारे बच्चे! हि बावा फॅमिली त्यांच ते ‘डिकरा डिकरा’ असं बोलणं याच्या पलीकडे फार काही घडत नाही. विनोद निर्मिती साठी याचा वारंवार तसाच वापर व्हायचा. दिनेश हिंगू याने स्वत: कितीदा पारशी पात्र रंगवली असतील हे त्यालाच आठवत नसेल! पण अलीकडे जरा चांगला बदल दिसून येतोय. या समाजाचे प्रश्न त्याची मांडणी भलेही विनोदी पध्दतीने होत असेल पण विस्ताराने येत आहे हे चांगले लक्षण आहे. या समाजाचे चित्रण करणारे काही ठळक सिनेमे आठवायचे म्हटले तर पहिल्यांदा आठवतो १९७८ सालचा बासुचटर्जींचा ’खट्टा मीठा’ यात अशोककुमार आणि पर्ल पदमसी यांनी मजा आणली.हि खर्या अर्थाने पारशी मूव्ही होती.१९८७ साली विजया मेहता यांनी नसिर-शबाना ला घेवून ’पेस्तनजी’ बनवला.यात साठच्या दशकातील या समाजाची कथा चित्रीत होती.गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवरील राहुल ढोलकियाच्या ’परझानिया’या चित्रपटात एका पारशी मुलाची गायब होण्याची कथा फार सुंदर रितीने घेतली होती.
होमी अडजानिया यांचा ‘बिईंग सायरस’ (२००५) हा इंग्रजी भाषेतील चित्रपटाने समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.रोहिंटन मिस्त्री यांच्या ‘सच अ लॉंग जरनी’ या सिनेमातून पारशी समाजची कहाणी पडद्यावर आणली होती.अलीकडच्या काही वर्षात ’फेरारी की सवारी’,’शिरी फरहाद की तो निकल पडी’ ’मुन्नाभाई एम बी बी एस’अशा सिनेमातून या समाजाचं चित्रण पहायला मिळतं.आपल्या मराठीत पुलंनी ’पेस्तनजी’ हि व्यक्तीरेखा त्यांच्या साहित्यातून अमर केली आहेच.आज पारशी नव वर्षाच्या निमित्ताने (पतेती च्या निमित्ताने) पारशी समाजाच्या सिनेमातील अस्तित्वाचा हा अल्प परीचय!