‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बंदिश बँडीट्स: सुरमयी कौटुंबिक ड्रामा
कलाकार: नसिरुद्दीन शहा, अतुल कुलकर्णी, श्रेय चौधरी, रित्विक भौमिक, शिबा चड्डा, राजेश तैलंग, अमित मिस्त्री, कुणाल रॉय कपूर आणि इतर
सारांश: शास्त्रीय आणि पॉप संगीताच्या सानिध्यातील ही कौटुंबिक बैठक प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.
—
खरतर या सिरीजबद्दल बोलायचं तर कलाकार, कथानक यांपेक्षा त्याची गाणी, संगीत याबद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे. शंकर एहसान रॉय यांचे चाहते असाल, तर ही सिरीज म्हणजे लॉकडाऊनच्या काळात तुमच्यासाठी पर्वणीच असेल. या त्रिफळीने हिंदी चित्रपटसृष्टीतील विसावे दशक गाजवले आहे. वेबसिरीजच्या दुनियेत प्रवेश करताना त्यांची या सिरीजची निवड ही त्यांच्या लौकीकाला साजेशीच आहे. पण ‘बंदिश बँडीट्स’ ही सिरीज संगितासोबतच कथानक, अभिनय, दिग्दर्शन, कॅमेराच नियोजन अशा सगळ्याच बाबतीत उजवी ठरते. अगदी उत्तम भारतीय सिरीजच्या यादीमध्ये अग्रगण्य स्थान निश्चित करते. हिंदी सिनेमाचा ड्रामा, शास्त्रीय आणि पॉप संगीताचा मिलाप, वेबसिरीजविश्वाला अपेक्षित दहा भागांपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं कथानक, जुन्या आणि नव्या फळीतील कलाकारांचा सशक्त अभिनय आणि या सगळ्यांच्या जोडीला जोधपुरचा नयनरम्य परिसर हे सगळंच प्रेक्षक म्हणून एका बैठकीमध्ये आत्मसात करण कठीण जातं. त्यामुळे तुम्हाला या सिरीजची तीन-चार आवर्तन करावी लागली तर त्यात काही विशेष नसेल.
शास्त्रीय संगीतविश्वात घराण्यांना महत्त्व असतं. प्रत्येक घराण्याची त्यांची खास सांगितिक शैली असते. जोधपुरच्या गल्ल्यांमध्ये असचं एक घराणं फुलत असतं. पंडीत राधेमोहन राठोड यांच्या नेतृत्वाखाली ‘राठोड घराणं’ संगीत सम्राट’ बिरूद मिरवत त्यांच्या घराण्याची शान राखत असतं. सतत कित्येक वर्षे जोधपुर राजघराण्यातर्फे दिला जाणारा ‘संगीत सम्राट’ हा बहुमान मिळविणारे राधेमोह्न आपला नातू राधेमध्ये घराण्याच्या संगीताचा वारस म्हणून पाहत असतात. राधेही पंडीतजींच्या पावलावर पाऊल ठेवत घराण्यातील संगीत शिकण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो. त्याला साथ असते त्याचे आई-वडील आणि काकांची.
पण जिथे सरस्वती आनंदाने वास करत असते, तिथे लक्ष्मी वास करेलच असं नाही, असं म्हटलं जातं. तशीच काहीशी परिस्थिती राठोड कुटुंबाची असते. सरकारकडून पंडीतजींना दिली जाणारी पेन्शन हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन पण एकेदिवशी अचानकपणे तेही बंद होतं. त्यात पंडीतजींच्या परवानगीशिवाय संगीताचा वापर करून पैसे कमविणे त्यांची दोन्ही मुले राजेंद्र आणि देवेंद्र यांना शक्य नसतं. अशावेळी राधेने संगीताचा ध्यास सोडून नोकरी करून कुटुंबासाठी चार पैसे कमवावेत अशी राजेंद्र म्हणजेच त्याच्या वडिलांची इच्छा असते.
संगीत की आर्थिक जबाबदारी या कात्रीमध्ये सापडलेल्या राधेच्या आयुष्यात याचं दरम्यान तमन्नाचा प्रवेश होतो. प्रख्यात पॉपस्टार असेलल्या तमन्ना तिच्या नव्या अल्बमसाठी गाण्यांच्या शोधात असते. तो शोध राधेपर्यंत येऊन पोहचतो. पण पंडीतजींच्या परवानगीशिवाय बाहेर गाणे विशेषतः पैशासाठी गाणे राधेला शक्य नसते. अशावेळी राधे या सगळ्या समस्यांमधून कसा मार्ग काढतो, राठोड कुटुंब आलेल्या संकांतांचा कसा सामना करत, याचा प्रवास म्हणजे बंदिश बँडीट्स.
सिरीजच्या कथानकाविषयी बोलायचं झाल्यास दोन भिन्न प्रकृत्तीचं आमनेसामने येणं आणि त्यातील दंव्द हा विषय सिनेमा किंवा मालिकेसाठी नवा नाही. अगदी श्रीमंत विरुद्ध गरीब घराणं, भारतीय आणि परदेशी घराणं या विषयांवर कितीतरी सिनेमे आले आहेत. अगदी नव्या आणि जुन्या सांगीतिक शैलीवर ‘हम दिल दे चुके सनम’सारखे सिनेमेही आले आहेत. त्यामुळे या सिरीजच्या कथानकामध्ये पूर्णपणे नाविन्य नाही. पण वाखाण्याची गोष्ट म्हणजे कथानकाची मांडणी. सिरीजच्या प्रत्येक भागामध्ये एक नवीन धक्कातंत्र वापरले गेले आहे.
त्यामुळे प्रत्येक भागाच्या शेवटाला पुढच्या कथानकाची उत्सुकता ताणली जाते. मग ते राधेच्या आयुष्यात तमन्नाचं येणं असो, तिची आणि राधेची जुगलबंदी असो, दिग्विजयच्या रूपाने उभं राहिलेलं आव्हानं असो, इथंपासून ताणलेलं कथानकाच धक्कातंत्र राधेची आई मोहिनीच्या भूतकाळापर्यंत शिगेला पोहचत. आनंद तिवेरीची विनोदी अभिनेता म्हणून असलेली ओळख प्रेक्षकांना ठावूक आहेच.
पण या सिरीजमध्ये दिग्दर्शक म्हणून त्याने बारकाव्यांना दिलेला भर वाखण्याजोगा आहे. त्याच्यासह अधिर भट, अम्रित्पाल सिंग बिंद्रा, लारा चांदनी यांनी संवादामध्ये भरलेले बारकावे कलाकारांनी अचूक टिपलेले आहेत. विशेषतः अतुल कुलकर्णी आणि नसिरुद्दीन शाह आमनेसामने आल्यावर त्यांच्या अभिनयातील जुगलबंदी, डोळ्यातील इर्षेचे हावभाव थक्क करतात.
शंकर एहसान रॉय यांच्या संगीताला जावेद अली, जोनिता गांधी, अरमान मलिक, शंकर महादेवन आणि शिवम महादेवन यांचा आवाज लाभला आहे. शास्त्रीय आणि पॉप या दोन्ही पध्दतींच्या गाण्यांचा सिरीजमध्ये समावेश असल्यामुळे प्रत्येक गाण्याला बिन्न पद्धतीने सादर केलं आहे. त्यात पंडीतजींच्या आवाजातील अनुभव आणि रियाजाचा ठेहराव, दिग्विजयच्या आवाजातील प्रयोगशीलता, राधे आणि तमन्नाच्या आवाजातील तारुण्यातील नाविन्यता असे पिढीनुसार संगीतात होणारे बदलही सुरेख टिपलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गाण्याचा वेगळ बाज जाणवतो.
भारतीय वेबसिरीजविश्वात विशिष्ट प्रकारची कथानके लोकप्रिय झाल्यावर त्याचं साच्यात अडकून पडण्याचा फॉर्म्युला गेले काही काळ पहायला मिळत होता. बंदिश बँडीट्सच्या निमित्ताने एक वेगळं विषय आणि एक वेगळा प्रयोग या विश्वात पहायला मिळतोय. जिथे वेबसिरीजचं विश्व जलद गतीच्या कथानकावर अवलंबून असल्याचं म्हटलं जायचं तिथे अशी सांगीतिक आणि वैचारिक ठहराव असलेली सिरीज लोकप्रिय होणं ही नव्या प्रयोगांसाठी सुखद सुरवात आहे. गेले काही दिवस या सिरीजमधील गाणी सगळ्यांच्याच तोंडावर आणि प्लेलिस्टमध्ये आहेत. तुम्हाला यातलं कुठलं गाणं सर्वाधिक आवडलं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.