मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
आठवणी गिरगावच्या बाप्पाच्या
सध्या ‘स्वामिनी ‘ मालिका खूप लोकप्रिय होत आहे. त्यामध्ये ‘आनंदीबाईंची’ भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे कुंजिका काळविंट. तिने याआधी ‘एक निर्णय-स्वतःचा स्वतःसाठी’ या चित्रपटात काम केले होते. तसेच तिला ‘श्रावण क्वीन’ सन्मान देखील मिळाला होता. कुंजिका गिरगावकर आहे आणि गिरगावातील उत्सव परंपरेचा तिला अभिमान आहे.
कुंजिका म्हणते, “गिरगाव हे माझे माहेर आणि सासर सुद्धा. माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी गौरी गणपती असतात. माहेरी खड्याच्या गौरी तर सासरी उभ्या गौरी असतात. मला सजावट करायला खूप आवडते. माहेरी मी आणि माझी बहीण नेहमी गणपतीसाठी सजावट करण्यात पुढे असायचो. माझ्या आईकडून मी उकडीचे मोदक शिकले आहे. तर माझ्या सासरी पुरणपोळी आणि शिरा असा नैवेद्यदेखील मी आणि आई (सासूबाई) मिळून करतो. घरी खूप पाहुणे असतात. रोज वेगळा गोड पदार्थ नैवेद्याला असतो.
यावर्षी मात्र लॉकडाऊन असल्यामुळे या गोष्टी मिस करते आहे. गणपती गौरी आहेत, पण सगळ्यांच्या घरी दर्शनाला जाणे येणे किंवा घरच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर नातेवाईकांसोबत गिरगावातील सार्वजनिक गणपती पाहायला जाणे या गोष्टी मिस करणार. आमचा गिरगाव ध्वज पथक असा ग्रुप आहे. त्यात माझा सक्रिय सहभाग असतो. मला आठवतंय की दरवर्षी आम्ही गिरगावातील प्रसिद्ध मूर्तिकार मादुस्कर यांच्या गणपतीपुढे आमच्या पथकाची ढोल वादनाची कला सादर करतो. तसेच वांद्रे येथे देखील आमच्या पथकातर्फे आम्ही शंभर ढोल वादनाचे सादरीकरण केले होते. या सगळ्या गोष्टी खूप आठवत आहेत.
‘स्वामिनी’ च्या निमित्ताने त्यात आनंदीबाईंची भूमिका करताना सेटवर पेशव्यांचा गणपती अनुभवता आला, ही आणखी एक आठवण आहे. लवकरच हे कोरोनाचे संकट दूर होवो, अशी आपण सर्वांनी गणपतीबाप्पा कडे प्रार्थना करूया.”