पौराणिक पात्रांतून ब्रिटीशसत्तेला आव्हान देणारा नाटककार- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
आज २६ ऑगस्ट. मराठी संगीत रंगभूमीला आपल्या भरजरी नाटकांच्या अलंकारांनी सजवणारे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या मराठी रंगभूमीवरील कार्याचा परिचय करुन घेणं अगत्याचं ठरेल.
१८७२ साली खाडीलकरांचा जन्म सांगली इथे झाला. असं म्हटलं जातं की वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी कादंबरी लेखन केलं. आणि १६ व्या वर्षी नाटक लिहिलं. डेक्कन कॉलेज इथून त्यांनी तत्वज्ञान विषयात बी.ए.ची पदवी घेतली.मात्र तत्वज्ञान विषय असूनही महाविद्यालयात त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी नाटकांचा अभ्यास केला.
खाडीलकरांवर टिळकांच्या विचारांचा विलक्षण पगडा होता. त्यामुळे त्यांनी टिळकांसह वृत्तपत्रीय कामात स्वत:ला झोकून दिले. ‘केसरी’ची धुरा त्यांनी काही काळ सांभाळली. ‘लोकमान्य’ या वृत्तपत्राचे संपादन त्यांनी काही काळ केले. पण टिळकांच्या मृत्युनंतर ते गांधी विचारांशी जोडले गेले. त्यानंतर आजचा अग्रलेखांचा बादशहा म्हणवला गेलेल्या ‘नवाकाळ’ वृत्तपत्राची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली.
वर्तमानपत्रातील या संस्मरणीय कामगिरीसह मराठी रंगभूमीवरील त्यांचे योगदानही मोलाचे आहे. ‘सवाई माधवरावाचा मृत्यू’ या त्यांच्या नाटकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर किचकवध मानापमान,स्वयंवर, भाऊबंदकी,विद्याहरण,द्रौपदी, सवतीमत्सर, सत्वपरिक्षा अशा अनेकविध नाटकांनी मराठी रंगभूमी अक्षरशः गाजवली.
या नाटकांपैकी ‘किचकवध’ नाटकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. खाडिलकरांनी नाट्यलेखनात पौराणिक कथांची गुंफण केली असली तरी त्यांच्यातील हाडाचा संपादक जागा होता. किचकवध नाटकात किचक ह्या खलपात्राचे चित्रण त्यांनी पारतंत्र्य काळातील इंग्रज व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनला समोर ठेवून रंगवले होते. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेचं वर्णन किचकाच्या वर्तनातून खाडिलकारांनी केले. आणि या जुलमी सत्ताधिशाला उलथवून टाकणे कसे आवश्यक आहे याचे वर्णन ते भीम आणि द्रौपदीच्या संवादातून करत. हे नाटक पाहणे म्हणजे तत्कालीन प्रेक्षकांसाठी एक अनुभव होता.
हे नाटक प्रेक्षकांना अक्षरशः ब्रिटिशसत्तेविरोधात धगधगवत असे. द्रौपदीच्या संवादातून स्त्रियांमध्येही ती विद्रोही भावना चेतवली जाई. मराठी जाणणा-या काही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हे नाटक पाहिल्यावर त्यातला आशय त्यांच्या ध्यानात आला आणि त्यानंतर १९१० साली या नाटकावर बंदी आली.पण पौराणिक पात्रांच्या माध्यमातून ब्रिटीश वसाहतवादावरचा खाडिलकरांचा हा घणाघात भारतीय रंगभूमीच्या इतिहासात अजरामर झाला.
आज राहुल देशपांडे किंवा अन्य तरुण मंडळी संगीत मानापमान वा संगीत स्वयंवर नाटकाचं शिवधनुष्य पेलत नव्याने खाडिलकरी नाटकांचे प्रयोग करताना दिसतात तेव्हा खाडिलकरांच्या नाटकांची जादू काळाच्या ओघात टिकून असल्याचे निश्चित होते.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या नाट्याचार्यांच्या तसेच साक्षेपी संपादकाच्या स्मृतींना सादर प्रणाम.