दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
राम…बोलो राम….राम…राम
रामायण पुन्हा सुरु होणार….हो हो रामायण मालीका पुन्हा सुरु होणार…रामानंद सागर यांची अनेक विक्रम केलेली ही मालीका 28 मार्चपासून पुन्हा सुरु झाली आहे. दूरदर्शनच्या नॅशनल चॅनेलवर सकाळी 9 वा. आणि रात्री 9 वा. असे या मालिकेचे दोन भाग दाखवण्यात येणार आहेत. खरं सांगू या बातमीने थोडासा दिलासा मिळाला आणि खूप काही आठवणी जाग्या झाल्या. रामायण ही मालीका १९८६ ते १९८८ दरम्यान दूररदर्शन वाहिनीवर प्रसारीत झाली. खरतंर तेव्हा आतासारख्या भरमसाठ वाहिन्या नव्हत्याच. दूरदर्शन एके दूरदर्शन…त्यामुळे त्याच्यावर जे-जे दिसे ते-ते सर्वचजण तृप्तपणे स्विकारत असत. रामायण मालिकेनं तर इतिहासच केला. प्रभू श्री राम म्हणजे तमाम भारतीयांचा आत्मा…या रामावर आधारीत असलेली रामायण मालीका सुरु होत आहे, ही बातमीसुध्दा तेव्हा मोठी झाली होती. तो ब्रेकींग न्यूजचा जमाना नव्हता. पेपर किंवा दूरदर्शनच्या बातम्यांमधून या मालिकेची माहिती आली आणि सर्व देशभर झाली.
मालीका सुरु होणार त्या दिवशी सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते. जणू राजा राम प्रत्यक्षात जनतेमध्ये येणार आहेत. तेव्हा घराघरात टीव्ही नव्हता. मला आठवतं माझ्या घरी तेव्हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही होता. रविवारी साधारण दहा वाजता मालिका सुरु होत असे. पण टीव्हीसमोरची जागा पकडण्यासाठी आमच्याकडे सकाळी नऊ पासून आजूबाजुच्यांची गर्दी व्हायची. त्यामुळे आम्हीही घरात लवकर आटपून टीव्हीसमोर बसायचो. रामायणाची वेळ जवळ यायला लागली की सर्वत्र शांतता असे…आणि रामानंद सागर दिसले की सर्वजण टाळ्या वाजवून स्वागत करायचे. मग मालिका सुरु…तेव्हा सर्व एकदम चिडीचूप…त्या मालिकेमध्येच सहभागी व्हायचे…रामाला वनवासात पाठवले तेव्हा कितीतरी जण टीव्हीसमोर हमसाहमशी रडले होते. तर रामाने जंगलात राक्षसाला मारल्यावर जय श्री राम चा घोष व्हायचा. काही भाविक महिला तर फुलं घेऊन यायच्या…का तर रामाला व्हायला…त्याची पूजा करायला…ही फूल टीव्हीसंचावर ठेऊन त्या मनोभावे नमस्कार करायच्या…मालिकेच्या ब्रेकमध्ये जाहीराती लागल्या तरी लोक तक्रार करायचे…आत्ताच लागायचं होतं का म्हणून…इतकी उत्सुकता मालिकेची प्रत्येक घराघरात असे…बरं रस्त्यावर तर विचारु नका. सर्वत्र कर्फ्यु लावल्यासारखे वातावरण…रविवार असूनही कोणीही भाजी किंवा अन्य सामन खरेदीसाठी निघत नसे. पहले राम फिर सब काम असे चित्र… 1986 ते 1988 दरम्यान दूरदर्शनवर रामायण मालिकेनं राज्य केलं. दिग्दर्शक रामानंद सागर यांनी बरीच मेहनत या मालिकेसाठी घेतली आणि त्याचं चीजही झालं. दूरदर्शनला तब्बल चाळीस लाखाचा फायदा झाल्याचं बोललं जातं.. ही मालिका 55 देशांमध्ये प्रसारीत केली जायची. 650 मिलीयन प्रेक्षक ही मालिका बघायचे. सर्वात जास्त प्रेक्षकांनी बघितलेली मालिका म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही मालिकेचे नाव नोंदवण्यात आले आहे. या मालिकेच्या कलाकारांबाबत काय बोलायचे….त्यांना प्रत्यक्ष देवाचा दर्जा देण्यात आला होता. हे कलाकार जिथे जिथे जायचे तिथे त्यांची पूजा केली जायची. जनता त्यांच्या पायावर डोकं ठेऊन रामाला नमस्कार केल्याचं समाधान मिळवत होती. रामाच्या भूमिकेत असलेल्या अरुण गोविलला याबाबत अनेकदा अनुभव आले. सीता असलेली दीपिका चिखलियाही अशा अनुभवांनी भावूक व्हायची. सुनील लाहिरी-लक्ष्मण, संजय जोग-भरत, समीर राजडा-शत्रुघ्न, दारासिंग-हनुमान, बाळ धुरी- दशरथ, जयश्री गडकर-कौशल्या, रजनी बाला-सुमित्रा, पद्मा खन्ना-कैकयी आणि अरविंद त्रिवेदी-रावण या प्रमुख कलाकारांना मालिका संपल्यावरही प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. आता हिच मालिका पुन्हा आपल्याला बघता येणार आहे. तसंपाहिलं तर या दोन्हीही वेळा एक समांतर धागा आहे, तो म्हणजे पहिल्यावेळी मालिका जेव्हा प्रसारीत झाली तेव्हा रस्ते मालिकेच्या ओढीनं आपसूक बंद व्हायचे….आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानं सर्वत्र बंद करण्यात आला आहे. आपली काळजी म्हणून…त्यामुळे मंडळी पुन्हा आपल्याला एकदा निवांतपणे रामायणात हरखून जाण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा या निवांत वेळेचा हा फायदाच म्हणाना…आणि जय श्री राम म्हणत रामायण पहा….
सई बने
फोटो सौजन्य- गुगल (Google)