‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
समांतर : एकाच्या भूतकाळातून दुसऱ्याच्या भविष्यात डोकावण्याचा अडखळलेला प्रयोग
ऑनलाईन ॲप : एम एक्स प्लेयर (MX PLAYER)
पर्व : पहिले
स्वरूप : थरारपट
दिग्दर्शक : सतीश राजवाडे
मुख्य कलाकार : स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत, नितीश भारव्दाज, गणेश रेवडेकर
सारांश : तगडे कलाकार आणि उत्तम दिग्दर्शकाची साथ लाभूनही मराठीतील या थरारपट वेबसिरीजचा प्रयोग काहीसा अडखळला आहे. उत्तम कथानकाला अपुऱ्या वेळेचं लागलेलं गालबोट सिरीज पाहताना जाणवतं.
—-
‘माझा नशिबावर नाही, स्वतःवर विश्वास आहे’, असं फोनवर पलीकडच्या माणसाला सांगत गाडी चालविणाऱ्या नायकाचा त्याक्षणी अपघात होतो आणि उलटलेल्या गाडीतून रक्तबंबाळ झालेला स्वप्नील जोशी म्हणजेच या वेबसिरीजच्या नायकाचा चेहरा प्रेक्षकांसमोर येतो. सुरवातीच्या या एका प्रसंगातूनच सिरीज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घ्यायला यशस्वी ठरते आणि यशस्वी वेबसिरीजच्या पहिल्या कसोटीत यशस्वी ठरते. सुहास शिरवळकरांच्या ‘समांतर’ या पुस्तकावर आधारित या वेबसिरीजच्या घोषणेच्या वेळेपासूनच प्रेक्षकांना या सिरीजची उत्सुकता लागून राहिली होती कारण मालिका-सिनेमांमधून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता स्वप्नील जोशीचा यातून वेबसिरीजच्या ‘दुनियादारी’त प्रवेश करणार होता. सिरीजच्या सुरवातीच्या काही प्रसंगातच प्रेक्षकांच्या मनाची पकड धरण्यात यशस्वी होत असतानाच पुढील भागांतील संथगतीने वाहणाऱ्या कथानकाने मात्र ही पकड सैलावते.
कुमार महाजन (स्वप्नील जोशी) हा पिढीजात सुखवस्तू घरातील पण वाडवडीलांनी आयुष्यभरातील वाईट कृत्यांमुळे किंवा अजून काही कारणाने आजच्या घडीला पगार महिनाभर पुरवताना दमछाक होण्याची पाळी त्याच्यावर आली आहे. पत्नी निमा (तेजस्विनी पंडीत) आणि मुलाच्या किमान गरजा पूर्ण करण्यास आपण अपयशी ठरत असल्याची खंत त्याला खदखदत असते. अशावेळी शीघ्रकोपी आणि नशीब, दैवावर अजिबात विश्वास नसलेला कुमार फक्त मित्र शरद (गणेश रेवडेकर)च्या आग्रहाखातर स्वामींची भेट घेऊन त्याच्या भविष्यात काय वाढून ठेवलय हे जाणून घ्यायला तयार होतो. तिथे त्याचा हात पाहून दचकलेले स्वामी त्याला भविष्य सांगायला नकार देतात. पण सुमारे ३३ वर्षांपूर्वी आपण कुमारच्या हस्तरेषांशी मिळता जुळता हात पाहिलेला असून त्या व्यक्तीच्या आणि कुमारच्या भाग्यरेषा सारख्या असल्याचे ते सांगतात. इथून सुरु होतो कुमारचा सुदर्शन चक्रपाणी नामक व्यक्तीला शोधण्याचा प्रवास. कुमारला ही व्यक्ती सापडते का? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटना कुमारला कळतात का? त्यामुळे त्याच्या आयुष्यात काही बदल घडतात का? हे सगळं सिरीजमध्ये उलगडत जातं.
उत्सुकतावर्धक कथानक आणि सतीश राजवाडे-स्वप्नील जोशी ही जोडगळी ही या सिरीजची जमेची बाजू पण सिरीजच्या सुरवातीस पकडलेली गती नंतरच्या काही भागांमध्ये मंदावते आणि कथानकातील कुतूहल कमी व्हायला लागतं. सध्याच्या घडीला सुरु असलेल्या बहुतेक मराठी सिरीजचं कथानक २०-३० मिनिटांच्या ८-१० भागांमध्ये विभागलेलं असतं. त्यामुळे लघु स्वरूपाचे कथानक या सिरीजमध्ये व्यवस्थित मांडता येतं. पण या सिरीजच्या कथानकाची व्याप्ती मोठी आहे. त्यात कुमारचा भूतकाळ आणि वर्तमान, चक्रपाणी नावाचं कोडं, चक्रपाणीला गाठायची कुमारची धावपळ आणि त्यानंतर त्याचं बदललेलं भविष्य असा बराच मालमसाला खच्चून भरलेला आहे. हे सगळं २० मिनिटांच्या भागांमध्ये बसवण्याऐवजी सिरीजची लांबी जास्त असती तर कदाचित यातील नाट्य प्रेक्षकांना व्यवस्थितपणे अनुभवता आलं असतं. यामधील कुमारचा चक्रपाणीला शोधायचा प्रवास यावर सिरीजच्या पहिल्या पर्वात भर दिला असला, तरी हा प्रवास अगदीच सरळ रेषेत झालेला आहे. त्यामुळे त्यातील कुतूहलनाट्य कमी झालंय.
माहिती आणि फोटो सौजन्य – एम एक्स प्लेयर (MX PLAYER)
मृणाल भगत