कोरंटाईन आणि मराठी नाटक
हाय फ्रेंड्स, काय मग कस काय चाललय तुमच सोशल डिस्टनसिंग? घरी बसून आता प्रचंड कंटाळा आलेला असणार. सतत नवीन नवीन गोष्टी तरी कुठल्या ट्राय करणार हे पण कळत नसेल. खर म्हणजे या कोरोनाचा सगळ्यात जास्त वैताग हा आपल्या सारख्या तरुणांना आलाय. त्यात ही रोज कोरोनाच्या केसेस वाढतायेत आणि लॉकडाउन परत एक्सटेंड झालाय. म्हणजे आता जे १४ तारखे नंतर घराबाहेर पडून मी हे करणार, ह्या मित्र मैत्रिणींना भेटणार, पहिले त्या पाणीपुरीवाल्याला गाठणार अशी जी मोठी लिस्ट होती ती काही आता अजून दोन – तीन आठवडे पूर्ण होणार नाही.
पण तरुणांना आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या घरच्यांना टेक्नोलॉजीच्या या जमान्यात टेंशन घ्यायच काहीच कारण नाही. कारण घरात आपल्याकडे टीव्ही असतोच, आणि त्याच बरोबर अगदी शाळेतल्या मुलांपासून ते आजी-अजोबा पर्यंत सगळेजण अगदी सहज स्मार्टफोन वापरतात. त्यात रोज टाईमपास व्हावा या दृष्टीने युथ आता नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम, यूट्यूब, एमेक्स प्लेयर, वूट आणि अशा कित्येक ऍप्लिकेशन्सस वापरून त्यावर नवीन सीरीज, मूवीज बघतात. शिवाय तितक्याच उस्तुकतेने टीव्हीवर जुन्या काळी प्रसिद्ध असलेल्या महाभारत, रामायण या सीरियल परत एकदा सगळे बघायला लागलेत.
श्रीमंत दामोदर पंत
‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाने सगळ्यांनाच वेड लावल होत. अत्यंत हलक-फुलक नाटक आहे. आणि मुळात भरत जाधव आणि विजय चव्हाण यांनी एक नंबर काम केलेलं हे नाटक तुम्ही कधीही बघाव अस आहे. त्यात देखील ‘गोड गोजरी लाज लाजरी’ या गाण्यावर एकदाका लाडक्या दामुने ताल धरला की हसून हसून तुम्ही वेडे होणारच!
एका लग्नाची गोष्ट
‘एका लग्नाची गोष्ट’ खूप गाजलेल नाटक. नाट्यप्रेमींकरिता पर्वणी म्हणजे आता परत एकदा प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी रंगमंचावर आलीये आणि पुन्हा लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलय. अस हे नाटक जेव्हा तुम्ही यूट्यूब वर बघाल तेव्हा १०० टक्के मनोरंजनाची खात्री. यूट्यूब वर असलेल्या नाटकात कविता लाड जरी नसली तरी हरकत नाही. कारण विनोदाचा आणि रंगभूमीचा हुकुमी एक्का तुमच्या समोर असेल. आणि त्याच्या सुरेल आवाजातल ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असत’ हे गाण तुम्हाला नक्की गुणगुणायला लावेल.
शांतेच कार्ट चालू आहे
‘शांतेच कार्ट चालू आहे’ म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी रंगभूमीला जे अमूल्य योगदान दिले त्यापैकी एक! यात लक्ष्मीकांत यांच्याबरोबर तुम्ही नयनतारा, सुधीर जोशी, रवींद्र बेर्डे, उज्वला जोग अशा त्या काळातील एक से एक कलाकारांचा अभिनय बघु शकता. आणि आज कालच्या मुलांना यातली ‘कार्ट’ ही कन्सेप्ट स्वतःशी खूप रिलेट करता येईल. खरच पुण्य केलय हो म्हणून ह्या कलाकारांना यूट्यूबर बघतोय आपण.
वाऱ्या वरची वरात
‘वाऱ्या वरची वरात’ हे मूळ पु. ल. देशपांडे यांनी केलेलं नाटक सुद्धा तुम्हांला बघण्यासाठी ऍवेलेबल आहे. त्यात त्यांचे गाणे आणि अभिनय दोन्ही असेल. या गोष्टी कायम आठवणीत ठेवण्यासारख्या आहेत. काही काळाने हेच नाटक पुन्हा स्टेजवर आलं तेव्हा त्यात अरुण नलावडे, विघ्नेश जोशी, सुचित्रा बांदेकर अशी मंडळी आपल्या समोर अवतरली. त्यांचे काम आणि पुलंचे विनोदी षटकार याने तीन तासाचा वेळ सहज निघून जातो.
बटाट्याची चाळ
‘बटाट्याची चाळ’ या नाटकाची धमाल तुम्हाला वेगळी काय सांगणार?. अहो पु. ल. यांचे शब्द आणि त्यांचा अभिनय तुम्हाला युट्यूबवर सहज बघायला मिळेल हेच नशीब! वेगवेगळी कॅरेकटर्स आणि त्यांचे स्वभाव ह्याचा उत्तम संगम यात तुम्हाला दिसेल. पु. लं. देशपांडे यांचा अभिनय म्हणजे नुसतं त्यांनी वाक्य म्हणायला सुरुवात केली तरी सहज हसायला येईल यात शंका नाही.
मोरूची मावशी
‘मोरूची मावशी’… प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले आणि विजय चव्हाण या त्रिकूटाने त्या काळात हे नाटक मराठी इंडस्ट्री मध्ये एकदम यशाच्या शिखरावर नेऊन ठेवल. आणि आजही ते तितकच फेमस आहे. वेगवेगळी गाणी, डान्स आणि त्याच बरोबर विनोद याने भरलेल नाटक. हसून हसून तुम्ही खूप वेडे झालाच पाहिजेत. एक मस्त विनोदी नाटक म्हणून बघायला काहीच हरकत नाही.
ती फुलराणी
‘ती फुलराणी’… पुन्हा पु. ल. देशपांडे लेखक. भक्ती बर्वे अत्यंत उत्कृष्ट नटी. त्यांनी ‘मंजुळा’ म्हणजे प्रोफेसर साहेबांची लाडकी मंजु ही भूमिका अशी काही सादर केली की आजही ती मंजू सगळ्यांच्या आठवणीत आहे. त्यांनी केलेली फुलराणी जरी यूट्यूबवर नसली तरी अविनाश नारकर आणि अमृता सुभाष ह्यांनी सादर केलल नाटक तुम्ही नक्कीच बघू शकता. त्यातलं म्युझिक आणि डायलॉग एकदम बेस्ट आहेत.
तो मी नव्हेच
‘तो मी नव्हेच’… प्रभाकर पणशीकर हे अगदी मराठी रंगभूमीवर घरातील सदस्या प्रमाणे वाढले. आणि मराठी इंडस्ट्री मोठी केली. त्यांच्यामुळे अनेक नाटकं अगदी देश विदेशात पोहोचली आणि त्यातलंच हे एक नाटक. हया नाटकात ह्या अवलीयाने जवळपास ६ ते ७ वेगवेगळ्या भूमिका रंगमंचावर लीलया सादर केल्या आहेत. त्यांच ‘तो मी नव्हेच!’ हे ऐकायला प्रेक्षक कायम आतुर असतात.
हसवा फसवी
‘हसवा फसवी’ हे नुसत नाव जरी घेतल तरी समोर लगेच आपल्याला दिलीप प्रभावळकर दिसतात. सहा वेगवेगळ्या भूमिका एकच व्यक्ती स्टेजवर कशी करते हे बघण्यासाठी अत्यंत बेस्ट नाटक. आणि नुसती एक्टिंग नाही तर त्या बरोबर विनोद करण, वेगवेगळे आवाज काढण हे त्यांच स्किल तुम्ही बघू शकता. ‘चिमणराव, दीप्ती, कृष्णराव हेरंबकर’ या त्यांच्या खुप गाजलेल्या भूमिका आहेत.
सविता दामोदर परांजपे
‘सविता दामोदर परांजपे’ हे त्या काळातील अत्यंत गाजलेलं आणि स्वतःच वेगळेपण टिकवणार नाटक. या नाटकाची थिम तशी थ्रिलर आणि सस्पेन्स यांनी भरलेली आहे. रीमा लागू ह्यांचा उत्कृष्ट अभिनय आपण पुन्हा एकदा यानिमित्ताने बघू शकतो.
ही आणि याचसारखी अजुन मस्त आणि भारी नाटकं तुम्ही यूट्यूबवर कधीही बघू शकता. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपण घरात अडकलोय. तर आशा या मिळालेल्या वेळेचा जरा चांगला वापर करूयात. सीरीज, मूव्हिज हे तर बघाच, पण या नाटकांमुळे तुमचा मूड नक्की फ्रेश होईल.
तर तुम्हाला सगळ्यांना हँप्पी कोरंटाईन आणि बी सेफ!!!
विपाली पदे