याsssssहू…आव्वाज कुणाचा?
भारतीय सिनेमात ‘बंडखोरीच्या’ संस्थानाचा अनभिषिक्त सम्राट होता शम्मीकपूर! तोवर सिनेमात आदर्शवत असलेल्या संयत प्रणयाची मात्रा शम्मीने पार चोळामोळा करून फेकून दिली. सिनेमाच्या चौकटीत बसणारी नायकाची सोज्वळ, स्त्री दाक्षिण्य सांभाळणारा, हळुवारपणे फुलविणारा ही प्रतिमाच मोडीत काढली. त्याच्या नजरेत नयिकांना घायाळ करणारा एक ’किलिंग लूक’ होता. सिनेमात तो नायिकांना घुसळून टाकत असे, छ्ळ छ्ळ छ्ळत असे, प्रचंड त्रास देत असे, तरसवत असे, विमा एजंट सारखा तिचा ’पिच्छा’ सोडत नसे. काहीही करून तिला फशी पाडणे हा एक कलमी कार्यक्रम तो इमाने इतबारे पार पाडायचा. त्याच्यातील ‘अॅटीट्युड’ किंवा ‘एक्स फ़ॅक्टर’ ओळखला नसीर हुसेन या जोहरीने! नसीर हुसेनच्या १९५७ च्या ‘तुमसा नही देखा’ या सिनेमाच्या वेळी त्याने कात टाकली. मिशा काढून टाकल्या, केसांची स्टाईल बदलून प्रिस्ले प्रमाणे कपाळावर बट आणली. नायिकेला करकचून मिठी मारत, तिच्या कुल्ल्यावर चापट्या मारत, तिच्याशी धसमुसळेपणाने वागत त्याने प्रेमाची भाषाच बदलवून टाकली. त्याचे हे असभ्य पणे नायिकांशी वागण अफाट चालून गेल.
शम्मीचा जंगली १९६१ सालचा. तो त्याच्या ’याहू’ स्टाईलने तुफान हिट झाला. देशभर याहू ची प्रचंड हवा झाली. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर शम्मी त्याच्या दुसर्या एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी उत्तरेत गेला होता. लोकांनी मोठा कल्ला करीत याहू याहू चा घोष सुरू केला. आधी सर्वांना ती ’याहू’ आरोळी रफीनेच गायली असे वाटायचे. पण तो आवाज रफीचा नव्हता. शूटींग बघायला आलेले लोक शम्मीला ’याहू’ च्या आरोळी ची फर्माईश करू लागले. शम्मी मोठा वस्ताद. त्याने चक्क हा आवाज माझा नाही तर संगीतकार शंकरचा आहे असे सांगितले! शंकर तिथेच उपस्थित होता. बिचार्याला घसा दुखेपर्यंत ’याहू’ चा आवाज दिवसभर काढावा लागला! खरी गंमत पुढेच आहे. तो आवाज शंकरचाही नव्हता! मग तो आवाज नक्की कुणाचा होता?????
आज संगणक युगात देखील ज्या शब्दाची मोहमाया अबाधित आहे ती ’याsssssहू’ ही आरोळी, हा आवाज होता पुढे दिग्दर्शक म्हणून गाजलेले ‘प्रयाग राज’ यांचा!