‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अभिनय आणि आवाजाचा बादशहा
अमिताभ बच्चन… हे नाव नुसतं जरी कानी पडलं तरी अमितजींचं अवघं व्यक्तीमत्व समोर उभं रहातं… त्यांचा अभिनय… आवाज… याची कोणीही आणि कधीही कॉपी करु शकत नाही. अमिताभ बच्चनसारखंच एक नाव आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतही आहे. ज्याचा अभिनय आणि आवाज या दोघांनाही तोड नाही. कुठलीही भूमिका असूदे, ती भूमिका या कलाकारासाठीच होती, असे वाटावे इतकी ती जीवंत साकारलेली असते. आणि आवाजाबद्दल काय बोलावे. या कलाकाराचा आवाज… त्यातील जरब, अंगावर काटा आणणारी तर प्रेमाची ओढ व्याकूळ करणारी… हे समीकरण भल्याभल्यांना जमत नाही. पण या कलाकारांनं आपल्या सच्च्या वृत्तीच्या बळावर ते करुन दाखवलं आहे.
आज हा कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. अनेक पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. राष्ट्रीय पुरस्कारावर त्याचं नाव कोरलं आहे. पण तरीही प्रसिद्धीच्या मागे कधी हा कलाकार गेला नाही. मानधन किंवा मोठाला बॅनर याला महत्त्व न देता, भूमिकेतून समाजासाठी काय चांगला संदेश आहे, हे बघूनच भूमिका स्विकारणारा हा तत्ववादी कलाकार आहे…. मंडळी ओळखलतं का या कलाकारचं नाव… नक्कीच… उपेंद्र लिमये… बस्स नाम ही काफी है…..
उपेंद्र लिमये पक्के पुणेकर… ते सांगतात, कोण कुठल्या वातावरणात वाढतो हे आपण सांगू शकत नाही. पण माझं सर्व संगोपन पुण्यात झालं हे मी भाग्याचं समजतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून गौरविलेल्या पुण्यात लहानाचा मोठा झालो. आमचं घर म्हणजे एकत्रकुटुंब पद्धतीचं आदर्श होतं. तिथूनच खूप काही शिकता आलं. संस्कार झाले. हे संस्कार आयुष्यभाराचे सोबती आहेत. यामुळेच हा सर्व यशाचा पल्ला गाठता आला, असं उपेंद्र सांगतात. उपेंद्र यांचा शाळेपासूनच नाटकाकडे ओढा होता. शाळेत नाटक, वाचन स्पर्धा, एकांकीका स्पर्धा, गॅदरींग यात कायम सहभाग असायचा. अगदी दहावीपर्यंत त्यांच्या भोवती असेच वातावरण होते. त्यामुळे त्या सर्वांचे संस्कार त्यांच्यावर झाले. अंगात नाटक भिनल्यासारखं झालं. पण उपेंद्र यांना त्याची खरी जाणीव झाली ती दहावीनंतरच. दहावीनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांनी ‘पडघम’ नाटक बघितलं. डॉ. जब्बार पटेल हे नाटकाचे दिग्दर्शक. या पडघम नाटकानं उपेंद्र यांना हिप्नोटाईज केलं. पडघम हे प्रायोगिक रंगभूमीवरील नाटक. वेगळ्या धाटणीचं. समाजातील सत्ता गाजवणारी प्रस्थापित व्यवस्था. त्या सत्तेविरुद्ध बंडाचे निशाण फडकावून ती सत्ता उलथून नवनिर्माणाची स्वप्न रंगवणारी युवा मनं… यात काहींचा असंतोष…. या सर्वांचा पडघम…. राजकीय… सामाजिक परिस्थितीवर वार करणा-या या प्रायोगिक नाटकानं उपेंद्र यांच्या मनाचा ताबा घेतला. यातून दोन गोष्टी चांगल्या झाल्या त्याम्हणजे उपेंद्र हे प्रायोगिक नाट्य चळवळीकडे ओढले गेले…. आणि त्याच्यांत असलेल्या अस्सल कलाकारावर त्यामुळे अभिनयासोबतच, दिग्दर्शनाचेही संस्कार झाले.
पडघड हा उपेंद्र यांच्या जीनवातला मोलाचा टप्पा ठरला… पंधरा-सोळावं वर्ष म्हणजे नक्की पुढे काय करावं या प्रश्नात मन अडकलेलं असतं. पण या नाटकांनं त्यांना वाट दाखवली. नाटक, रंगमंचाविषयी प्रचंड आकर्षण वाटू लागलं. त्यामुळे इथे आपण रमू शकतो असं वाटायला लागलं. विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचं शिक्षण केल्यानंतर ही नाटकाची ओढ जाणून थेट नाट्यशास्त्र या शाखेत पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. इथून उपेंद्र लिमये या कलाकाराची जडणघडण सुरु झाली. यासोबतच त्यांचा प्रायोगिक रंगमंचावरचा प्रवास सुरु झाला. या सर्वांत त्यांनी स्वतःला झोकून दिले. प्रायोगिक रंगभूमीवरील या दहा बारा वर्षांनी एक परिपूर्ण कलाकार घडलाच शिवाय समाजमनाचे भान असलेला कलाकार घडायलाही मदत झाली. पुढे काही समविचारी मित्रांसोबत उपेंद्र यांनी ‘परिचय पुणे’ नावाची स्वतःची संस्था सुरु केली. त्या संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळ्या एकांकीका स्पर्धा, आंतरकॉलेज नाट्य स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. या दहाबारा वर्षात पाया भक्कम झाल्याचे उपेंद्र सांगतात. या वर्षात काय नाही केलं. अभिनेता म्हणून स्वतःला पारखता आलं. जिथे कमी वाटत होती तीथे सुधारणा केली. दिग्दर्शकाची भूमिकाही केली. या भूमिकेतही स्वतःला जोखता आलं. कमी असेल तिथे अजून सुधारणा करता आली. या सर्वांत उपेंद्र हे सर्व भूमिकांमध्ये लिलया वावरायचे. ते कधी अभिनेता म्हणून रंगमंचावर असायचे…. तर कधी दिग्दर्शक म्हणून काम करायचे… तर कधी बॅकस्टेजचे काम सांभाळायचे… मग नाटकाच्या सेटचे डीझाईन ते लाईट-साऊंड सिस्टीम… या सर्वांचे काम करायचे… एकूण काय त्यांचे व्यक्तिमत्व सर्व बाजुंनी तयार होत होते.
या सर्वात त्यांचं पहिलं नाटक आलं… आणि ते अपेक्षेप्रमाणे चालंलही… ‘कोण म्हणतं टक्का दिला’ या नाटकानं अवघा महाराष्ट्र गाजवला… आणि एका दमदार अभिनेत्याच्या आमगनाची वर्दी दिली. हे नाटक मराठी रंगभूमीवरचं माईल स्टोन नाटक ठरलं… ‘परिचय पुणे’ या ग्रुपमध्ये संजय पवार नावाचे तरुण लेखक होते. त्यांच्याकडे नवनवीन कल्पना असायच्या… त्या कल्पना रंगमंचावर येऊ लागल्या. ही प्रायोगिक नाटकं समाजभीमूख होती. या काळात उपेंद्र यांनी व्यावसायिक नाटक केलं नाही. येथूनच ऑफबीट काम करायची सवय लागल्याचं ते सांगतात. प्रवाहाच्या उलट जाऊन काम करायचं आणि यश खेचून आणायचं हा त्यांचा स्वभाव आणि फॉर्म्युलाही… समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. आपली भूमिका ठामपणे मांडायला धाडस लागतं… ते धाडस उपेंद्र करत होते. या सर्वांमागे मेहनत असतेच… पण मनाचीही तयारी लागते. मुळात ही नाटकं व्यावसायिक नव्हती… तर प्रायोगिक होती. त्यामुळे भरभरुन पैसे मिळतील अशी अपेक्षा नव्हतीच. शिवाय मेहनात जास्त… हे सर्व मान्य करुनच उपेंद्र यांनी प्रायोगिक नाट्य चळवळीत स्वतःला झोकून दिलं होतं.
त्याच दहा वर्षात त्यांनी थिएटर अकादमीमधूनही दोन नाटकं केली. सतीष आळेकरांचं ‘अतिरेकी’ नावाचं नाटक. त्यानंतर वामन केंद्रें याचं ‘जळाली तुझी प्रित’ नावाचं नाटक त्यांनी केलं. पुण्यात ग्रिप्स थिएटर अकादमी कार्यरत होती. ग्रिप्स ही जर्मन नाट्य चळवळ होती. या ग्रिप्स थेअटरमध्येही उपेंद्र काम करत होते. या दहा वर्षात त्यांनी अशा वेगवेगळ्या संस्थेमधून काम केलं. अभिनय केला. दिग्दर्शन केलं. हे सर्व करतांना स्वतःला रंगभूमीसाठी झोकून दिलं. मात्र इथेही त्यांनी कुठलीही एक भूमिका केली नाही. तर नेहमी विविधरंगी भूमिका करण्याकडे लक्ष दिलं. एक अभिनेता म्हणून घडण्यासाठी या सर्वांची मदत झाल्याची उपेंद्र सांगतात. लोकनाट्य, संगीत, राजकीय, सामाजीक अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये उपेंद्र यांनी या दरम्यान नाटकं केली. बरं हे सर्व करतांना आपलं करिअर म्हणजेच अभिनय आहे हे गणित त्यांनी कधी मानल नव्हतंच. या माणसानी प्रायोगिक रंगभूमीसाठी आपल्या आयुष्यातील मोलाची वर्ष दिली तरी त्याचा व्यावसायिकेतेसाठी फायदा करावा असा हेतू ठेवला नाही… व्यावसायिक अभिनेता व्हावं असं त्यांच्या मनातही नव्हतं. कारण उपेंद्र सांगतात, “रंगभूमी हे क्षेत्रचं एवढं व्यापक आणि विस्तृत आहे, की ज्यात तुम्ही सतत शिकण्याचा प्रयत्न कराल तरी कमी पडाल.”
हा आपल्या शिक्षणाचा भाग आहे असं मानूनच उपेंद्र यांची वाटचाल होत होती. हे करतांना व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी, सिनेमात काम करण्यासाठीही धडपड कधीच केली नाही. निस्वार्थी भावानं केलेल्या या मेहनतीचे चीज झाले. नट म्हणून त्यांचे मान्यवरांनी कौतुक केले… मुळात उपेंद्र लिमये या वादळाची दखल घ्यायला सुरुवात झाली होती. त्यातच त्यांना पहिला चित्रपट मिळाला. डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘मुक्ता’ चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर अमोल पालेकरांसोबत ‘बनगरवाडी’ केला. ‘कल का आदमी’, ‘कैदी’ यासारखे चित्रपटही केले. हे सर्व ऑफबीट चित्रपट होते. अगदी प्रायोगिक रंगभूमीसारखेच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
ही सर्व वर्ष उपेंद्र पुण्यात स्थायिक होते. त्यांच्या नाटकांचे शो मुंबईला व्हायचे. तेवढाच त्यांचा मुंबईबरोबर संबंध यायचा. पण व्यावसायिकदृष्ट्या ते मुंबईला आले नाहीत. मात्र 2000 मध्ये एका प्रोजेक्टसाठी त्यांना मुंबईला यावे लागले. या टप्प्यावर त्यांनी वयाची तिशी ओलांडली होती. मुंबई कलाजगतात एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांचं नाव झालं होतं. मराठी रंगभूमीवर प्रायोगिक चळवळीतील कलाकारांना उपेंद्र लिमये यांची अभिनय ताकद माहीत होती. पुल देशपांडे, निळू फुले, विजय तेंडूलकरांनी उपेंद्र यांच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक केलं होतं. प्रायोगिक रंगभूमीवर रंगलेला हा अभिनेता मुंबईमध्ये आल्यावर आपसूक चांगले प्रोजेक्ट त्यांच्याकडे यायला लागले.
‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’चे हिंदीचे प्रयोग उपेंद्र करत होते. या दरम्यान त्यांची सचिन खेडेकर यांच्याबरोबर ओळख झाली. सचिन खेडेकर यांचा उल्लेख करतांना उपेंद्र, मित्र, हितचिंतक आणि मार्गदर्शक असा करतात. सचिन खेडेकर यांच्यामुळे व्यावसायिक रंगभूमीबरोबर चांगल्या पद्धतीने रुळता आलं. सकारात्माक दृष्टोकोण मिळाला, असं ते सांगतात. 2000 नंतर प्रायोगिकचा ग्रुप थोडा कमी झाला. त्यामुळे व्यावसायिक नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला. यात विनय आपटेंबरोबर नाटक केलं ‘सुपरहिट नंबर वन’. यात रसिका जोशी सहअभिनेत्री होती. मुंबईत व्यावसायिक नाटक करायला सुरुवात केल्यावर हितचिंतकांना ही गोष्ट समजली. पेपरमध्ये नाटकाच्या जाहीराती यायला लागल्या. उपेंद्र यांचे अनेक समकालीन मित्र रंगभूमीवर कार्यरत होते, त्या सगळयांचे फोन सुरु झाले. त्यांच्याकडून कामं यायला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईत आल्यावर सुदैवाने कोणाकडेही काम देता का… असं विचारण्याची वेळ उपेंद्र यांच्यावर आली नाही. चांगल्या भूमिका आपसूक मिळत गेल्या. एका कामातून दुसरं काम मिळत गेलं.
2001 पासून उपेंद्र लिमये यांचा व्यावसायीक नाटकाचा प्रवास सुरु झाला. त्याचवेळी टिव्ही इंडस्ट्री विकसीत होत होती. नवीन चॅनेल सुरु झाले. डेली सोप नावाची संकल्पना आली… आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळू लागला. अनेक मालिका आणि चित्रपटातील भूमिका उपेंद्र यांच्याकडे आल्या. उपेंद्र सांगतात, “या क्षेत्रात आपलं काम हेच आपला आरसा असतो. यातूनच नवीन भूमिका मिळतात”. अर्थात याबाबतीत उपेंद्र खणखणीत नाण होतं. त्यामुळे त्यांना कधी काम मागावं लागलं नाही. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक भूमिकेकडे त्यांनी आव्हान आणि संधी या दृष्टीकोनातून बघितलं. भूमिका समरस होऊन केली. त्यांच्याकडे आलेल्या भूमिका बहुधा ऑफबीट स्वरुपाच्या असायच्या. येथे त्यांना प्रायोगिक रंगभूमीचा अनुभव कामाला येई. या भूमिका जणू त्यांच्यासाठीच असायच्या. त्या अत्यंत प्रामाणिकपणे करत असत. तुमचं कामच तुम्हाला उत्तम काम देऊ शकतं. हे उपेंद्र यांचं सूत्र होतं. त्यामुळे आपसूकच एक भूमिका संपली की दुसरी भूमिका येत असे.
‘सावरखेडा एक गांव’मध्ये राजीव पाटील यांच्यासोबत काम केलं. त्यातला ‘सुरश्या’ भाव खाऊन गेला. दरम्यान उपेंद्र यांना हिंदी चित्रपट सृष्टीतही आपसूक प्रवेश मिळाला. ‘चांदनी बार’ हा पहिला हिंदी व्यावसायिक चित्रपट. त्यातला ‘गोकूल’ लक्षात राहीला… त्यानंतर आलेल्या मधूर भंडारकरच्या ‘पेज थ्री’ मधील ‘इन्स्पेकर भोसले’च्या भूमिकेनं हिंदीमध्येही उपेंद्र लिमये नावाचं नाण खणखणीत असल्याचं सिद्ध झालं. या चित्रपटाला उत्तम यश मिळालं. त्यामुळे साऊथच्या चित्रपाटातही काम करण्याची संधी उपेंद्र यांना मिळाली. मग तमिळ चित्रपटही केले. राम गोपाल वर्मांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या दोघांचं ट्युनिंग चांगलं जमलं. त्यामुळे जेव्हा रामगोपाल वर्मा ‘सरकार राज’ बनवत होते त्यात उपेंद्र यांना अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘सरकार राज’ हा चित्रपट ड्रीम रोल ठरला. त्यात ‘कांतीलाल वोरा’च्या भूमिकेत उपेंद्र होते. त्यांच्या वयापेक्षा पंधरा वर्षांनी तरी मोठ्या व्यक्तीची भूमिका होती. या चित्रपटाचं शुटींग सुरु झालं होतं. पण कांतीलाल वोरांच्या भुमिकेसाठी कोणी फिट्ट नव्हतं. त्यावेळी रामगोपाल वर्मांनी उपेंद्र यांना फोन करुन थेट हायद्राबादला बोलावलं. रोलची कल्पना दिली… ट्रायल झाल्या… आणि उपेंद्र यांचा कांतीलाल वोरा सरस ठरला. अमिताभ बच्चनसारख्या अभिनेत्यासमोर तेवढ्याच ताकदीनं उभा राहीला. आयत्यावेळी आलेली ही भूमिका उपेंद्रसाठी ड्रीम प्रोजेक्टसारखी ठरली. उपेंद्र सांगतात, प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचं. माझंही होतं. या चित्रपटाच्या प्रिमीअरचा शो अमिताभ बच्चन यांच्यासोबतच पाहिला. तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन “यंग मॅन यु डीड बेस्ट जॉब…” अशी पावती दिली. हा मोठा पुरस्कार असल्याचं उपेंद्र मानतात.
उपेंद्र यांच्या यशाच्या शिखरावर सोनेरी तुरा लागाला तो क्षण ‘जोगवा’ या चित्रपटामधल्या भूमिकेनं आला. राजीव पाटील यांच्या जोगवानं सगळी समीकरणं बदलून टाकली. मराठी अभिनेत्याला छप्पन वर्षात पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पहिला मराठी कलावंत ज्याला 56 वर्षात पहिल्यांदाच अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यातल्या ‘तायप्पा’ची भूमिका अशी होती की एखाद्या अभिनेत्याचा कस लागेल. राजीव पाटील यांच्यासोबत सावरखेडा केल्यामुळे त्यांची शैली उपेंद्र यांना माहीत होती. दोघांचे ट्युनिंग उत्तम जुळायचे. उपेंद्र सांगतात, “अभिनेता म्हणून पाटील, माझा खूप आदार करायचे. मी त्यांच्या चित्रपटात काम करावं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांनी मला हे अनेकदा बोलूनही दाखवलं होतं.” राजीव पाटील यांनी जेव्हा जोगवा करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी उपेंद्रला फोन करुन ‘तायप्पा’चा रोल तुझ्यासाठी आहे असं सांगितलं.
शिवाय खरचं जर तू अॅक्टर असशील तर हा रोल करशील असंही चॅलेंज दिलं. त्यामुळे एक चॅलेंज म्हणून ही भूमिका उपेंद्रंनं स्विकारली. तायप्पाच्या भूमिकेचा अभ्यास करतांना त्यांना जाणवलं की प्रत्येक कलाकार अशा एका भूमिकेच्या प्रतीक्षेत असतो की, जी भूमिका अविस्मरणीय असेल आणि ती भूमिका तायप्पाची होती. तायप्पाची भूमिका ही सर्वस्व झोकून करायला हवी म्हणून जोगवाच्या वेळेला दुसरा कुठलाही प्रोजेक्ट उपेंद्र करत नव्हते. उपेंद्रनं या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत बघून राजीव पाटील आपल्या सहका-यांना नेहमी सांगायचे की या भूमिकेसाठी उपेंद्रला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार… त्यांचे हे बोल खरे ठरले. ज्या दिवशी हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा उपेंद्र जिममध्ये होते. एका पत्रकाराने त्यांना पुरस्काराची बातमी सांगितली. त्यांना हा सुखद धक्का होता. ‘जोगवा’ चित्रपटाला विविध पुरस्कारांसाठी ६० नामांकने मिळाली होती. त्यात ३७ पुरस्कारांवर नाव कोरले. जोगव्यातील तयप्पासाठी वर्ष-दीड वर्ष मेहनत घेतली. मात्र जोगवाचं शूट संपलं आणि ते तायप्पामधून लगेच बाहेर आले. वर्षातून दोन किंवा तीन प्रोजेक्ट करणारे उपेंद्र मानतात की एखादी भूमिका कितीही गंभीर, संवेदनशील असली तरी त्यात कायमचं अडकून रहायचं नसतं. नाहीतर पुढच्या भूमिकेला न्याय दिला जात नाही…. त्यामुळे या तायप्पामधून बाहेर आल्यावर उपेंद्रनी अन्यही उत्तम भूमिका सीनेरसिकांना दिल्या.
मुक्तापासून उपेंद्र यांचा सुरु झालेला चित्रपटाचा प्रवास बनगरवाडी, पेज थ्री, सरकार राज, यल्लो, मुळशी पॅटर्न, जोगवा, सूर सपाटा अशा विविधरंगी वाटावरुन जात आहे. जेवढं मराठी सफाईदार तेवढंच हिंदीही… उपेंद्र याचे सगळे श्रेय भूमिकेला देतात. जेव्हा एखादी भूमिका येते तेव्हा तिचा अभ्यास केला जातो. तिची बोलीभाषा… रुप… आंतरमन… या सर्वांचा अभ्यास असतो. पण जेव्हा भूमिका पडद्यावर साकारण्याची वेळ येते, तेव्हा हा फक्त अभ्यास न दिसता ते व्यक्तिमत्व साकारावं लागतं. ही करसरत असते. उपेंद्र यांना ही कसरत लिलया जमते. त्यामुळेच जोगवाच्या यशानंतर त्यांच्या आणखी चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘ढग’, महेश लिमये यांच्या ‘यल्लो’ ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हे त्याच वाटेवरचे यशस्वी चित्रपट… राष्ट्रीय पुरस्काराच्या वलयामध्ये गुंतायचं नाही…. थांबायचं नाही हे उपेंद्र यांनी निश्चित केलंय. त्यामुळे त्या पुरस्काराच्या क्रेझमध्ये ते नसतात. गुंतायचं नाही… थांबायचं नाही… आणि शक्यतो एकासारखी दुसरी भूमिका करायची नाही. या त्रिसुत्रीमुळे उपेंद्र यांची अभिनय कारकीर्द बहरत आहे.
नाही म्हणायला उपेंद्र यांनी ‘यल्लो’ आणि ‘सूर सपाटा’ या दोन्हीही चित्रपटात कोचची भूमिका केली आहे. पण त्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. महेश लिमये यांचा ‘यल्लो’ हा शहरी पार्श्वभूमी असलेला चित्रपट. एका ‘विशेष मुलीला’ तिचा सन्मान मिळवून देणारा हा कोच आहे. त्यासाठी हा स्विमींग कोच आपलं कसंब पणाला लावतो. हा शहरी भागातला कोच आहे. त्याची रहाणी टापटीप… भाषाही तशीच… पण ‘सूर सपाटा’ पूर्णतः वेगळा. ग्रामीण पार्श्वभूमी…. गावांनं ओवाळून टाकलेल्या मुलांना कब्बडी खेळातून घडवणारा कोच यात आहे. पण या कोचलाही गावांनं वेगळं केलं आहे. तो दारुडा आहे. भडंग अवस्थेतला… काठीच्या आधारानं लंगडत चालणारा… गबाळा… शिवराळ भाषा तोंडात असणारा… असा हा कब्बडीचा प्रशिक्षक… दोन्हीही भूमिका सर्वस्वानं वेगळ्या… त्याचा ढाचा एक असला तरी व्यक्तीमत्व भिन्न…. उपेंद्र यांनी दोन्हीही भूमिकांना ख-या अर्थांनं न्याय दिला आहे.
रंगभूमी आणि मोठ्या पडद्यावर यशस्वी अभिनेता असलेले उपेंद्र छोट्या पडद्यालाही तेवढंच महत्त्व देतात. सरुवातीच्या काळात त्यांनी किमयागार, दामिनी, नकाब, भाग्यविधाता, या गोजिरवाण्या घरात, या सुखांनो या, समांतर या सारख्या मालिकांमधून काम केलं आहे. मात्र 2008 मध्ये छोटा पडदा कमी केला. मात्र 2016 मध्ये त्यांनी ‘नकोशी’ मालिका केली. आणि त्यानंतर दोन वर्षांनी सोनी टिव्हीवरील ‘तारा फ्रॉम सातारा’ ही मालिका केली. मोठ्या पडदयावर यश मिळाल्यावर कलाकार छोट्या पडद्याकडे शक्यतो येत नाहीत. पण उपेंद्र ही गणितं मानत नाहीत.
रंगभूमी, छोटा पडदा आणि चित्रपट हे तीनही वेगवेगळे भाग असल्याचे ते सांगतात. यातील प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. चित्रपट आणि नाटक यांना आज कितीही लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला तरी छोटा पडदा जेवढं सर्वसामान्यांना ओढून घेतो, तेवढं ही दोन माध्यमं करु शकत नाहीत, असं उपेंद्र सांगतात. प्रत्येक माध्यमाचं एक बलस्थान असतं. बारा वर्षात टीव्हीचे त्यांनी फक्त दोन शो केले. त्यातला एक हिंदी आणि एक मराठी. ‘नकोशी’चंही खूप कौतुक झालं. ‘तारा फ्रॉम सातारा’ला बेस्ट ज्युरी पुरस्कार मिळालाय… बेस्ट शो ऑफ इंडीयन टेलिव्हीजन 2019 चा पुरस्कार या मालिकेला मिळाला. नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन असं काहीही असू दे… तुमची गोष्ट, कथा जर सकस असेल, कथानक उत्तम असेल यश मिळतंच. तीनही माध्यमांची तुलना कधीही होऊ शकत नाही, असं उपेंद्र सांगतात.
सध्या उपेंद्र मुळशी पॅटर्नच्या टीमसोबत हंबीरराव मोहीते यांच्यावरील चित्रपटात व्यस्त आहेत. या चित्रपटाचे अगदी थोडे चित्रीकरण बाकी आहे. लॉकडाऊन संपल्यावर हे शूट आधी उपेंद्र पूर्ण करणार आहेत. शिवाय अरविंद जगताप यांच्या कथेवर असलेला ‘आणीबाणी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. यात उपेंद्रबरोबर विणा जामकर सहअभिनेत्री आहे. अजूनही काही प्रोजेक्टमध्ये उपेंद्र व्यस्त आहेत. सध्याचा लॅकडाऊन संपल्यावर हे प्रोजेक्ट ते पूर्ण करणार आहेत.
हा मनस्वी कलाकार भूमिका साकारतांना त्या भूमिकेचाच होऊन जातो. सर्वस्व झोकून देतो. त्यांच्या या वृत्तीमुळंच अनेक पुरस्कार त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामध्ये नाट्यगौरव पुरस्कार, कालनिर्णय पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, हमलोग पुरस्कार, राष्ट्रीय रत्न पुरस्कार, कलारंग पुरस्कार, शिवाजी गणेशन पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, बाबुराव पेंटर पुरस्कार, संकृती कलादर्पण पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. अर्थात यात राष्ट्रीय पुरस्काराचे स्थान सर्वोच्च आहे. तरीही या पुरस्काराच्या मोहजाळापासून उपेंद्र लिमये दूर आहेत. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून एका वेगळ्या उपेंद्र लिमयेची ओळख होते. ‘बनगरवाडी’चा शेखू वेगळा, ‘कैरी’मधील देशपांडे गुरुजी वेगळे, ‘ट्रफीक सिग्नल’मधला मन्या लंगडा वेगळा, ‘कॉट्रॅक्ट’मधला गुंगाही वेगळा आणि ‘कोकणस्थ’मधला गौतमही वेगळाच… या सर्व वेगळ्या वाटांवर आपल्यासारख्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा अवलीया कलावंत स्वतःला मात्र भूमिकेतून वेगळं करुन घेतो आणि पुढच्या प्रवासासाठी तयारीला लागतो. पुन्हा नव्या भूमिकेला न्याय द्यायला…..
सई बने