दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
स्वर साधनेत रमणारी शमिका
कोकणातील रत्नागिरी येथून आलेल्या शमिकाने तिचे शालेय शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्याचबरोबर कला हा तिचा आवडता विषय त्यामुळे ती शाळेच्या जवळपास सगळ्याच स्पर्धांमध्ये, कार्यक्रमांमध्ये भाग घेत होती. आणि अशाच एका राज्यस्तरीय गायन स्पर्धेत तिने भाग घेतला तेव्हा तिला अनपेक्षितपणे दुसरं बक्षीस देखील मिळालं. जे तिचं पहिलं बक्षीस होतं. त्यानंतर कला क्षेत्रातील तिची आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी तिला सुरांची ओळख पटेल अशा वयात गाण्याचे शिक्षण घेण्यास पाठवले. तिने वयाच्या दहाव्या वर्षी श्री. प्रसाद गुळवणी आणि श्रीमती. मुग्धा भट सामंत यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. आणि आता मागची आठ वर्षे पुढील शास्त्रीय गायनाचे शिक्षण विदुषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे घेते आहे. तिथे ती जयपुर अत्रौली घराण्याच्या गायकीचे कौशल्य आत्मसात करतेय.
पुढे गायनाचा रियाज सुरू ठेवत तिने खास बालगायकांसाठी आलेल्या पहिल्या सा रे ग म प लिटिल चेम्प च्या पर्वात भाग घेतला. आणि शमिका भिडे केवळ रत्नागिरीत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या सुरेल आवाजामुळे लोकांच्या घराघरात पोहोचली. मग काही काळ तिने अजून दाणगा स्वराभ्यास केला. आणि परत एकदा आपण तिला ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात गातांना अनुभवले. त्याबद्दल तिला विचारले असता ती सांगते, ‘त्या कार्यक्रमात आम्हाला खूप काही शिकायला मिळाल. महेश काळे, अवधूत गुप्ते आणि शाल्मली खोलगडे या तीनही परीक्षकांनी आमच उत्तम प्रकारे ग्रूमिंग करून घेतलं. स्वरांशी नवीन ओळख तिथे करून दिली. आम्ही सगळे गायक मित्रमैत्रिणी खूप छान प्रकारे एकत्र राहायचो, मजा मस्ती करायचो आणि त्यामुळे आमच एकमेकांशी असलेलं नात आता खूप घट्ट झालय. आणि मुळात पुन्हा एकदा लोकांच्या आठवणींमध्ये येऊन राहण्याची चांगली संधी आम्हाला कार्यक्रमाद्वारे मिळाली’.
केवळ गाण्याचे कार्यक्रम नाही तर तिने संगीत नाटकांमध्ये देखील काम केले आहे. तिचे पहिले संगीत नाटक हे ‘मेघदूत’ होते. ज्यात तिने पहिल्यांदाच गाणं आणि अभिनय यांची एकत्र सांगड घालण्याचा प्रयत्न केला. पुढे मागील वर्षी आलेल्या ‘ची. सौ. का. रंगभूमि’ या संगीत नाटकाचा ती भाग होती. तिथे तिने संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्या सोबत काम केले. संपदा ताई आणि पणशीकर सरांनी खूप काही नवीन शिकवलं, आम्हाला तुम्ही या भूमिकेत स्वतःचे वेगळे कौशल्य काय दाखवाल असे प्रश्न विचारले. आणि त्यामुळे मी माझ्या गाण्याबरोबरच अभिनयाचे शिक्षण सुद्धा तिथे नव्याने घेतले असे म्हणाली.
अनेक नाटकाचे प्रयोग तिने केले पण त्यात तिच्या खास आठवणीत राहिलेला प्रयोग म्हणजे जेव्हा तिचे लाडके कलाकार शरद पोंक्षे उपस्थित होते. प्रयोगानंतर मागे येऊन तिला म्हणाले छान गायलीस आणि केवळ कौतुक केल नाही तर नाटकात रंगमंचावर कसे वावरायचे, अभिनय कसा करायचा याचे चार धडे सुद्धा दिले.
असाच तिच्या आठवणीत राहिलेला कार्यक्रम म्हणजे नुकताच तिने महिनाभर केलेला यूएसए चा दौरा. या टूर मध्ये लता मंगेशकर यांची दोन गाणी तिने सादर केली. त्यातील एक गाणे होते ‘लग जा गले’ हे गाणं ऐकून त्यातल्या भावना समजून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोन बायकांना त्यांच रडू आवरेनास झाल. तेव्हा त्या कार्यक्रम झाल्या नंतर मागे येऊन तिला खास दाद देत म्हणाल्या, खूप छान गायलीस. लता दिदिंच गाणं आहे म्हणून अगदी तसच न गाता स्वतःच्या प्रमाणे गायलीस ते आम्हाला आवडल. आणि मनाला भिडल देखील! हा तिच्या करता आयुष्यभर लक्षात राहील असा प्रसंग आहे.
शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत असल्यामुळे तुझा आवडता राग कुठला असे तिला विचारले तेव्हा तिने क्षणात किशोरी ताईंनी गायलेला ‘यमन’ राग असे उत्तर दिले. तसेच तिला वृक्षवल्ली अभंग, लता दीदींची गाणी, सुमन कल्याणपूर यांचे ‘केतकीच्या बनी तिथे’ हे गाण, ‘गुणी बाळ असा’ ही अंगाई अशी अनेक गाणी मनापासून आवडतात. आणि तिचे लाडके संगीतकार अजय अतुल आहेत. ज्यांच्याबरोवर तिने पानीपत, धडक अशा सिनेमांमध्ये कोरसचे काम केले आहे. तिला पुढे सुद्धा त्यांच्या बरोबर काम करायची इच्छा आहे.
शमिका सध्या सोशल मीडियावर लोकांना आपलस करून घेतेय ते इनस्टाग्राम वर टाकत असलेल्या ‘वन मिनीट वन सॉन्ग’ या तिच्या कन्सेप्ट मुळे. तीचे फॅन फॉलोइंग जबरदस्त असल्यामुळे तिला वेगवेगळी गाणी ते सुचवतात, त्यातली एका मिनिटामध्ये बसतील अशी गाणी निवडून ती आणि तिची धाकटी बहीण राधिका त्याचे छोटे विडियो करून टाकतात. या गाण्यांमध्ये जुन्या मराठी गाण्यांपासून, अभंगांपासून ते अगदी आत्ता नवीन आलेल्या हिन्दी गाण्यांपर्यंत सगळ्याचा समावेश असतो.
सध्या सुरू असलेल्या कॉरंटाईन मध्ये ती रियाज करते. जुनी गाणी पुन्हा ऐकून त्यात आपण कुठला योग्य बदल करू शकतो याचा विचार करते. स्वतःच गायलेल्या गाण्यांकडे वेगळ्या नजरियाने बघतेय. वन मिनीट वन सॉन्ग याचे वेगवेगळे प्रयोग करतेय. कविता करायची आवड तिला असल्यामुळे नवनवीन कविता आता लिहितेय. अभिनयात सुधारणा करता याव्यात म्हणून विविध नाटकं ती यूट्यूबवर बघतेय. अशाप्रकारे तिसुद्धा तिचा वेळ सुरेल आणि अभ्यासमय घालवतेय.
शमिकाचे आता पुढील प्लॅन्स म्हणजे तिचे दोन स्वतःचे गाण्यांचे अल्बम येणार आहेत, एकात तिने वेगवेगळी गाणी गायली आहेत. आणि दूसरा अल्बम हा केवळ अभंगांचा असणार आहेत.
तिच्या आईने लहानपणी गाणं शिकायला सुरुवात केली होती. पण काही कारणाने ते पूर्ण होऊ शकल नाही. आता शमिका तिच्या आईचं हे सुरेल स्वप्न पूर्ण करतेय आणि नित्य स्वरसाधना करून प्रेक्षकांच्या मनात घर करतेय यात शंकाच नाही!
विपाली पदे