पंचायत : गावगझलीमध्ये अडकलेल्या इंजिनियरची व्यथा
ऑनलाईन ॲप :
अमेझॉन प्राईम (Amezon Prime)
पर्व :पहिले
स्वरूप :विनोदी ड्रामापट
दिग्दर्शक :दीपक कुमार मिश्रा
मुख्य कलाकार :जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय, फैसल मलिक
गावाचं नाव फुलेरा. उत्तर प्रदेशमधील एक छोटसं, गुण्यागोविंदाने नांदणार गावं. तो येतो या गावात नाईलाजास्तव. आळशीपणा आणि दुर्लक्षित स्वभावाने कॉलेजमध्ये असताना शेवटपर्यंत मनापासून अभ्यास केला नाही, परिणामी गुणवंत असूनही मार्कशिटमधील गुणांमध्ये मात्र ते दिसत नाही. त्यामुळे घरी बसून चंगल्या नोकरीची वाट पाहत राहण्यापेक्षा तो गावातल्या पंचायतमध्ये सचिवाची नोकरी स्वीकारतो. एकीकडे त्याच्यासोबतच्या मित्रमंडळीनां उत्तम पगारांची पॅकेजेस मिळाल्याची असूया मनात असताना वर्षभरात CAT ची परिक्षा उत्तीर्ण करून MBA करायला जायचं इतकं ध्येय नजरेसमोर ठेवून तो गावात दाखल होतो. पंचायत ऑफिसमध्येचं एका खोलीत राहताना नोकरी, जेवण सगळं सांभाळून रात्रीच्या फुरसतीत अभ्यास करत तो आला दिवस ढकलत असतो.
अभिषेक त्रिपाठी हा देशातल्या इतर कोणत्याही इंजिनियरिंग विद्यार्थ्यांप्रमाणे मोठ्या पगाराची नोकरी, मेट्रो शहरात छान घर, शनिवार-रविवारी मित्रांसोबत दारूपार्टी अशा ऐषोआरामाच्या जीवनाची स्वप्न पाहत असतो. पण या स्वप्नांना ब्रेक लागून तो थेट फुलेरामध्ये पोहचतो. ‘तुला फुलेरामध्ये जाऊन ‘स्वदेस’चा मोहन भार्गव होण्याची संधी आहे’ मालिकेच्या पहिल्याचं भागात अभिषेक आणि त्याच्या मित्राचा हा संवाद ऐकल्यावर सिरीजचा सूर हा ‘स्वदेस’, ‘आर्टिकल १५’ सारख्या सिनेमांप्रमाणे नायकाचा हिरोत्वापर्यंतचा प्रवासापर्यंतचा जातो की काय ही शंका येते. पण ही सरळसोट वाट टाळून दिग्दर्शकाने मेट्रो शहरातून एका रात्रीत गावात पोहचलेल्या तरुणाची भांबावलेली अवस्था सिरीजमध्ये रंगवलेली आहे. अभिषेक हा बॉलीवूड नायकांसारखा बॉडीबिल्डर नाही, ना त्याला वाक्चातुर्य आहे. तो नाईलाजास्तव फुलेरामध्ये अडकतो. बरं सिरीजमध्ये ड्रामा भरण्यासाठी कथानकात गावातले प्रधान किंवा इतर सरकारी अधिकारी खलनायकी सुरात दाखवणंसुद्धा टाळाल आहे. कागदोपत्री मंजूदेवी या गावाच्या प्रधान असतात. पण त्यांच्या जागी त्यांचे पती ब्रिज भूषण दुबे ‘प्रधान-पती’ म्हणून कामकाज पाहत असतात. निवडणुकांमध्ये महिलांसाठी असलेल्या राखीव जागांचा वापर करून गावात कित्येक पंचायतपदे अशीच भरलेली असतात. यांच्या जोडीला विकास आणि प्रल्हाद हे दोघे या पंचायतमधील दोन सदस्य असतात. पंचायतमधील आपल्या पदाचा आणि पैशांचा वापर करून दुबेंनी गावातली बरीच जमीन बळकावलेली असते. पण म्हणून त्यांना खलनायकी छटेमध्ये रंगवणं दिग्दर्शकाने टाळले आहे. खरतर रघुवीर दुबे आणि नीना गुप्ता यांनी नवराबायकोच्या भूमिकेतील गावातील सर्वात मोठं प्रस्त असलेल्याचा अहंकार पण स्वभावातील तितकाच देवभोळेपणा सुंदरपणे रंगवलेला आहे. त्यामुळेचं एकीकडे ऑफिसमध्ये अभिषेकने त्यांच्यापेक्षा चांगली खुर्ची घेतल्यावर जळफळाट झालेले दुबे प्रसंगी बरेच महिने गावात एकट्याने राहणाऱ्या अभिषेकला मैत्रीचा हात पुढेही करतात.
गावात अभिषेकपुढे येणाऱ्या समस्यासुद्धा साध्या आणि प्रासंगिक आहेत. रात्री गावात लाईट जात असल्याने सरकारकडून मंजूर झालेला सौरयंत्र पंचायत ऑफिसमध्ये लावून घेणे मंजूर करणं किंवा गावातील स्थानिक गुंडाशी विनाकारण नडण, गावातील लग्नातील मानअपमान असोत किंवा गावातील भुताटकीचा मागोवा घेणं असोत अभिषेकच्या वाट्याला येणाऱ्या समस्या या कोणत्याही गावात सहसा पाहायला मिळणाऱ्या समस्या आहेत. बरं अभिषेक नायक असल्याने त्याचं उदात्तीकरण करायचा प्रयत्न करून त्याला नैतिकतेच्या चौकटीमध्ये बसवायचा कुठलाही प्रयत्न सिरीजमध्ये झालेला नाही. उलट त्याच्या शीघ्रकोपी स्वभावामुळे कित्येक समस्या तो स्वतःहून ओढवून घेतो. या कथानकाला प्रासंगिक, हलक्याफुलक्या विनोदाची जोड दिल्याने सिरीज पाहताना आपसूक आपल्या चेहऱ्यावर हास्य खुलतं. मुलाच नाव ठरविण्यावरून नवराबायकोमध्ये तंटा होणं, टीव्ही समजून चोराने पंचायत ऑफिसमधील संगणकाचा मॉनिटर चोरणं, अतिसंवेदनशील सरकारी घोषवाक्यांमुळे गावकरी दुखावणे आशा समस्या सहजतेने सिरीजमध्ये येतात आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरतात. बरं हे सगळं होत असताना अभिषेक गावात रुळतो का? CAT ची परिक्षा देतो का? हे सगळे प्रश्न पाठीशी असतातच. लॉकडाऊनमुळे टीव्हीवरील कौटुंबिक मालिकांमधील नाट्याला अल्पविराम मिळालेला आहे त्यावेळी या गावात होणार नाट्य पहायला हरकत नाही.
माहिती आणि फोटो सौजन्य – अमेझॉन प्राईम (Amezon Prime)
मृणाल भगत