भारतीय सिनेमाचे जनक : दादासाहेब फाळके
सिनेमाच्या शताब्दीच्या निमित्ताने आणि त्या पूर्वी आलेल्या परेश मोकाशीच्या ’हरीश्चंद्राची फॅक्टरी’च्या निमित्ताने फाळके यांच्या कार्य कर्तृत्वावर विपुल लिहिलं गेलं. तरी देखील फाळकेंच्या कार्याचं वर्णन करायचं झालं तर एकच शब्द पुरेसा आहे ’अफाट’! अपुरी साधन सामुग्री, कुशल मनुष्यबळाचा अभाव, सिनेमा बाबतची सामाजिक अनिच्छा, तुटपुंजी अर्थ व्यवस्था या सर्व नकारात्मक बाबी फाळकेंच्या अफाट इच्छाशक्तीने व अचाट झपाटलेपणाने मागे पडल्या आणि स्वत:च्या घरावर अक्षरश: तुळशीपात्र ठेवून त्यांनी हलत्या चलचित्रांचा खेळ या मातृभूमीत रूजवला. परदेशातील सिनेमाच्या जाणकारांनी त्यांच्यातील कलागुण हेरले होते व त्यांनी भारत देश सोडून आपल्या येथेच सिनेमा निर्मिती करावी अशी ऑफर त्यांना दिली होती पण या देशभक्त धुरंधराने हि ऑफर नाकारली. सिनेमा बनवताना त्याच्या प्रत्येक अंगाचा ते किती बारकाईने विचार करेत असत याचा त्यांचे चरीत्र अभ्यासताना वारंवार प्रत्यय येतो. सिनेमाची जाहीरात आणि विपणन याचा त्यांनी किती खोलवर विचार केला होता!
सिनेमाला त्या वेळी स्पर्धा होती संगीत नाटकांची जी पाच पाच सहा सहा तास चालत. सिनेमाकडे समाजाने आकृष्ट व्हावे या साठी त्यांनी निरनिराळ्या युक्त्या केल्या. सूरतला त्यांनी वर्तमान पत्रात ’फक्त दोन आण्यात पहा दोन मैल लांब आणि पाऊण इंच रूंदीचे ५७००० फोटोग्राफस’ वेगळं काम करताना ते वेगळ्या पध्दतीनं केलं तर हमखास यश मिळतं हा मार्केटींगचा फंडा त्यांनी अनेकवेळेला वापरला. पुण्यात त्या वेळी १९१३ साली एकही थिएटर नव्हतं. श्री गंगाधरपंत पाठक यांनी त्या काळात नुकतीच पिठाची गिरणी सुरू केली होती. या गिरणीच्या ’पॉवर’वरच थिएटर सुरू करावे असे त्यांना वाटले. फाळकेंच्या ’राजा हरीश्चंद्र’या सिनेमाने पुण्यातील पहिले चित्रपट गृह ’आर्यन’ सुरू झाले. पण प्रेक्षक काही येईनात. फाळके व पाठक यांनी एक युक्ती शोधली. ’अमुक अमुक पायली दळण आणणार्यास सिनेमाच्या तिकीटात सवलत’ अशी जाहीरात सुरू केली. त्या मुळे पाठकांची गिरणी जोरात चालू झाली व थिएटर हाऊस फुल्ल होवू लागले!
सिनेमात तांत्रिक करामती, ट्रिक सीन्स दाखविण्याची फाळकेंची शैली जबरदस्त होती. लंका दहन, मोहिनी भस्मासूर, कलिया मर्दन यातील ’ट्रिक्स’ प्रेक्षकांना अवाक करणार्या होत्या. फाळकेंनी आयुष्यात एकच बोलपट बनविला १९३८ साली ’गंगावतरण’. कोल्हापूरातील याच्या चित्रीकरणाच्या वेळचा किस्सा मनोरंजक आहे. या सिनेमात त्यांना हिमालय दाखवायचा होता. प्रत्यक्ष हिमालयात जावून शूटींग करणं अशक्य होतं. मग कोल्हापूरात हिमालय आणायचा कुठून? स्टुडिओतच सेट लावून चित्रीकरण करण्याचा सल्ला त्यांना पटला नाही. आता फाळकेंनी काय करावे? तर चक्क कोल्हापूर जवळचा रामलिंगचा डोंगर चुनखडीने रंगवून घ्यायचा आदेश दिला. चुन्याचे डबे घेवून कामगार डोंगर रंगवायला लागले. सर्व डोंगर पांढर्या शुभ्र रंगाने चमकू लागले. शूटींगचा दिवस आला पण फाळके यांच दुर्दैव आडवं आलं आदल्या रात्री मुसळधार पाऊस झाला आणि फाळकेंच्या कल्पनेतील पांढरा शुभ्र हिमालय अक्षरश: धुवून पुन्हा काळा ठिक्कर पडला. पावसाने वाहून गेलेल्या हिमालयाचे चित्रीकरण मग स्टुडिओतील नकली हिमालयावरच करावे लागले!
– धनंजय कुलकर्णी