‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
फोटोग्राफर्स मिडीयम माधुरी
फोटोग्राफर्स मिडीयम माधुरी
आपल्या परफेक्ट अभिनयासाठी जशी माधुरी दीक्षित ओळखली जाते त्याचप्रमाणे फोटोग्राफर्स चॉईस अशीही माधुरी दीक्षितची ओळख. आपल्या संपूर्ण प्रवासात आजपर्यंत माधुरी दीक्षितने फोटोग्राफर्ससाठी आदर्श अशी ओळख निर्माण केली आहे. आजही ही ओळख कायम आहे.
माधुरी दीक्षितचा स्वभाव मुळात सौम्य, मनमिळाऊ. तिच्या गोड वागण्याने तिने सगळ्यांना आपल्या जवळ केलं होतं. वास्तविक करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर माधुरी एक स्टार होती पण तरीही तिने कधीच कोणत्याही फोटोग्राफरला आपला मोठेपणा दाखवला नाही. उलट कधीही ती फोटोग्राफर्सना कुटुंबातील एक असल्यासारखीच वाटायची. त्यापलीकडे जाऊन फोटोग्राफरना फोटोशूटमध्ये अपेक्षित असलेले रिजल्ट्स, लुक्स माधुरी मेहनत घेऊन द्यायची त्यामुळेच तिला फोटोग्राफर्स चॉईस म्हटलं जातं.
प्रसिद्ध दिवंगत फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत की “नूतनसारख्या सौंदर्यवान चेहऱ्यानंतर माझ्याकडे फोटो काढायला आलेला तो सर्वात असामान्य चेहरा होता.” कोणत्याही फोटोग्राफरची हीच भावना असेल. अनेक फोटोग्राफर्सनी आजपर्यंत माधुरी दीक्षितचं फोटोशूट केलं असेल पण सगळ्यांना आलेले अनुभव सारखेच. कोणालाच आपण एका मोठ्या स्टारचं शूट करतोय असं वाटलं नाही. कॅमेऱ्यासमोर एक मूर्तिमंत सौंदर्य उभे आहे असाच अनुभव फोटोग्राफरना येतो. सहसा काही अभिनेत्री किंवा मॉडेल्सचे फोटो हे ठराविक अँगलनेच चांगले येतात पण माधुरी मात्र त्याला अपवाद होती. कोणत्याही अँगलने कोणत्याही प्रकारचा फोटो काढा तो परफेक्टच वाटेल असा फोटो फोटोग्राफरला माधुरीच्या फोटोशूटमधून मिळणार हे नक्की.
गौतम राजाध्यक्ष आणि माधुरी दीक्षित ही फोटोग्राफर आणि अभिनेत्री यांची जोडी हिट फोटोंसाठी ओळखली जाते. राजाध्यक्ष यांना माधुरी मुलीसमानच होती. प्रत्येक कलाकाराला, फोटोग्राफरला एका स्फूर्तीची गरज असते ती नेहमीच मला माधुरीने दिली आहे असं राजाध्यक्ष यांनी आपल्या चेहरे या पुस्तकामध्ये म्हटलं आहे. राजाध्यक्ष यांनी माधुरीसोबत साठ-सत्तर शुट्स केली असतील. सुरुवातीच्या काळात तर दर महिन्याला ते एक फोटोशूट करत असत. हे फोटोशूट अत्यंत समाधान देणारं फोटोशूट असायचं असं ते नेहमी म्हणतं.
दिल तो पागल है या चित्रपटाचा असाच किस्सा प्रचलित आहे. फोटोग्राफर प्रसिद्धीचे शूट करत होते.शाहरुख, करिश्मा आणि माधुरी यांचं शूट सुरू होतं, त्यावेळी माधुरी सोडून त्या दोघांना फोटोग्राफरकडून काही सूचना करण्यात आल्या. न रहावून त्या दोघांनी विचारलंसुद्धा की माधुरीला काहीच सूचना का नाहीत. माधुरी हे ऐकून फक्त हसली. फोटोग्राफरला काय हवंय आणि फोटोग्राफरला काय अपेक्षित आहे हे तिने अगदी परफेक्ट जाणलं होतं. फोटोग्राफर कोणीही असो त्याच्या नजरेतून तिला आपोआप या सूचना कळायच्या.
कोणतंही आउटफिट असो त्यासाठी लागणारे बारकावे, त्याबद्दलचा अभ्यास माधुरीचा तर असायचाच पण त्यासाठी फोटोग्राफरला लागणारा वेळ ती द्यायची. शूट कोणतंही असो त्यासाठी जो फोटोग्राफर असेल त्याचं १००% समाधान जोपर्यंत होतं नाही तोपर्यंत माधुरी फोटोशूट करायची. त्याचबरोबर झाल्यावर ते फोटोज बघून पूर्णपणे समाधान झाल्यावरच आजही फोटोशूट पूर्ण होतं. फिल्मफेअरचं कव्हर शूट असेल किंवा पीएनजीच्या जाहिरातीचं शूट किंवा वैयक्तिक शूट याला अपवाद नाही.
गौतम राजाध्यक्षांनी एका प्रदर्शनामध्ये माधुरीचे जवळपास ५५ फोटो प्रदर्शित केले होते. मात्र यातील प्रत्येक फोटो हा एकापेक्षा वेगळा होता. अनेकांनी माधुरीचे एवढे फोटो का असा प्रश्नही त्यावेळी राजाध्यक्षांना विचारला होता. माधुरीबद्दल ते नेहमी म्हणायचे की मधुबालापेक्षाही सुंदर अभिनेत्री आणि नर्तकी माधुरी आहे तिच्यात तसे अनेक गुण आहेत तर तिचं कौतुक माझ्यासारखा एखादा फोटोग्राफर करत असेल तर चूक नक्कीच नाही.
गौतम राजाध्यक्षांनीच आपल्या पुस्तकामध्ये असाच एक किस्सा मांडला आहे. एका फोटोशूटसाठी माधुरीला १२० वेळा गिरक्या घ्यायला त्यांनी सांगितले. यावर त्यांच्या टीममधील सदस्यसुद्धा अचंबित झाले होते. पहाटेपर्यंत चाललेले शूट संपवून माधुरी घरी गेली. दुसऱ्या दिवशी राजाध्यक्ष ओशाळले आणि कालच्या प्रसंगाबद्दल माफी मागायला त्यांनी फोन केला. फोनवर माफी मागितल्यावर क्षणार्धात माधुरी फक्त हसली आणि त्यांना म्हणाली, “फोटोशूटला मज्जा आली, फोटो चांगले आले ना?” कुंभारासारख्या मातीसारखी ती फोटोग्राफर सोबत फोटोशूट करते आणि त्याने सांगितलेल्या सर्व आज्ञांचे पालन करते.
सहसा कलाकारांना फोटोशुट्स, प्रेसमिटिंगमधील शूट किंवा पुरस्कार सोहळ्याच्या वेळेचं शूट याचा कंटाळा असतो मात्र माधुरी दीक्षित याला अपवाद असल्याचं छायाचित्रकार सांगतात. फोटोग्राफर्सचं पूर्ण समाधान होईपर्यंत शूटसाठी माधुरीचं सहकार्य असतं.
या क्षेत्रात अनेक अभिनेत्री येतील, जातील, इंडस्ट्रीचा प्रवास सुरूच राहिलं, मात्र कितीही झालं तरी माधुरी नक्कीच फोटोग्राफर्स चॉईस कायम राहिल हे निश्चित.
-आदित्य बिवलकर