‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मुक्ता.. एक फुलराणी…
शाळेत असतांना लाजरी-बुजरी, अबोल असणारी मुलगी आता एक यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. अभिनय तिचा आत्मा आहे. भूमिका निवडतांना ती कमालीची चोखंदळ आहे… पण ती भूमिका साकारतांना स्वतःला विसरुन जाते… त्या भूमिकेची होऊन जाते… रंगभूमी, चित्रपट किंवा छोटा पडदा या तिनही माध्यमांवर तिने स्वतःला सिद्ध केलंय…. ही मनस्वी अभिनेत्री म्हणजे आपली मुक्ता बर्वे…. मुक्ताचा आज वाढदिवस… कलाकृती मिडीयातर्फे या गुणी अभिनेत्रीला लाख लाख शुभेच्छा…..
मुक्ता पुण्याची. वडील वसंत बर्वे आणि आई विजया बर्वे यांचे दुसरे अपत्य. मुक्ताची आई, विजया बर्वे या शिक्षिका आणि नाट्यलेखिका. मुक्ताचा मोठा भाऊ देबू बर्वे हा नाटकात काम करायचा. काही चित्रपटातही त्याने बालकलाकर म्हणून भूमिका केल्या होत्या. त्याला काही पारितोषिकेही मिळाली आहेत. देबूच्या यशाचं घरात कौतुक होतं. मात्र आपल्या दादाच्या यशाखाली मुक्ता दबल्यासारखी झाली होती. तिच्या आईच्या लक्षात आलं. मुक्ता घरात अबोल असायची. शांत रहायची… या मुलीला मोकळं करायचं तर काहीतरी वेगळं करायला लागेल हे आईनी ओळखलं. लेखिका असलेल्या आईनं मुक्तासाठी ‘रुसू नका फुगू नका’ हे बाल नाटक लिहीलं. तेव्हा मुक्ता अवघी चार वर्षाची होती. आईचा अंदाज अचूक ठरला. या नाटकातल्या भूमिकेनं मुक्ताचा नूर पालटला. ती व्यक्त होऊ लागली. शाळेत असतांनाच मग परी राणी, भीत्रा ससा या नाटकात तिनं काम केलं. बर्वेंच्या घरात मोकळं वातावरण होतं. मुलांनी ठराविक करिअर करावं याचं दडपण नव्हतं. तिचा मोठा भाऊ देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम करु लागला. दहावीच्या सुट्टीत मुक्तांनी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्नाकर मतकरी यांचं ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात भूमिका केली. तेव्हा ती 15 वर्षाची होती. या नाटकानंतर तिनं अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावं असं तिच्या कुटुंबाला वाटू लागलं. या नंतर तिलाही नाटकाविषयी ओढ निर्माण झाल्याने त्यात करियर करायचं हे नक्की झालं. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर मुक्तानं ललित कला केंद्र येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली आणि तिच्या करिअरला ख-या अर्थानं सुरुवात झाली.
मुक्ता तिच्या अभिनय प्रवासात ललित कला केंद्रामध्ये मिळालेल्या मार्दगर्शनाला खूप महत्त्व देते. वामन केंद्रे, विजय तेंडूलकर, प्रिया तेंडूलकर, भक्ती बर्वे, विजया मेहता, श्रीराम लागू या जेष्ठांचे तिला मार्गदर्शन लाभले. त्यामुळे मुक्ता मुक्तपणे विचार करु शकली, रंगमंचावर वावरु शकली… आणखी एक म्हणजे तिच्यात असलेला अबोलपणा हा एका विचारी अभिनेत्रीमध्ये रुपांतरीत झाला. शिवाय बॅकस्टेजचा अनुभवही तिच्या गाठी आला. वेशभूषाकार, संगीतकार, नेपथ्यकार या भूमिका तिनं केल्यानं रंगभूमीबरोबर नातं अधिक पक्क झालं… “घडलंय बिघडलंय” या मालिकेतून मुक्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर पिंपळपान, बंधन, बुवा आला, चित्त चोर, मी एक बंडू, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे, इंद्रधनुष्य, अग्निहोत्र, रुद्रम असा टप्पा तिनं गाठला. यातील प्रत्येक मालिकेत वेगळ्या मुक्ताचा परिचय होत होता. याच दरम्यान मु्क्ताचा मोठ्या पडद्यावर प्रवेश झाला. ‘चकवा’ हा तिचा पहिला चित्रपट. या पहिल्याच चित्रपटात तिला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर रंगभूमीवरही मुक्ताचा मुक्तसंचार सुरु झाला. तिची प्रत्येक भूमिका ही चोखंदळपणे स्विकारलेली असायची. आणि सर्वस्व झोकून ती ही भूमिका करायची… त्यामुळे मुक्ताच्या नावावर अनेक पुरस्कार जमा झाले आहेत.
राजीव पाटील दिग्दर्शित ‘जोगवा’ ह्या चित्रपटातील भूमिकेमुळे मुक्ता बर्वे या अभिनेत्रीचे नाव भारतभर झाले. जोगतिणीच्या आयुष्यावर असलेला हा चित्रपट करण्यासाठी मुक्ताने खूप मेहनत घेतली. जोगतिणींच्या जीवनाचा अभ्यास केला. यात मुक्तानं सुली नावाच्या जोगतिणीची भूमिका केली. उपेंद्र लिमये तिचा सहकलाकार… या चित्रपटात तिच्या अभिनयाबरोबर तिने बेभान होऊन केलेले नृत्य… तिने दिलेला किसींग सीन यांचीही चर्चा झाली. पण मुक्ता कधी या चर्चामध्ये थांबली नाही. भूमिकेची गरज काय…. हा तिचा प्रश्न असायचा… या चित्रपटासाठी मुक्ताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
जोगवा मध्ये गंभीर असलेली मुक्ता ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटात पूर्णपणे बदललेली दिसली. थोडीशी अवखळ, आधुनिक विचारांची मुक्ता इथे प्रेक्षकांना बघायला मिळाली. या चित्रपटाचे सिक्वलही झाले… आणि त्या प्रत्येकातील मुक्ता तेवढीच प्रेक्षकांना भावली.
अभिनयात परिपक्व असलेल्या मुक्ताने रसिका प्रॉडक्शन्स नावाची कंपनी सुरु केली आणि नाट्य निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. मुक्ताच्या यशाचा आलेख चढतच होता. त्यातच या अभ्यासू अभिनेत्रीनं आपल्या कवितांवर आधारित रंग नवा या कार्यक्रमाची निर्मिती केली. तर संगीतकार मिलिंद जोशी यांच्याबरोबर ज्ञात कवींच्या अज्ञात कविता या विषयावरील आणि स्वतः लिहिलेल्या काही कविता सादर केल्या. मुक्ताचे वैशिष्ट्य असे की, ती कधीच एका साच्यात बांधली गेली नाही. तिचा चेहरा कधी गावातील साध्या मुलीसारखा दिसतो, तर कधी शहरातील मॉडर्न मुलीसारखा. बरं फटकळ म्हटलं तरीही तिचे डोळेच समोरच्याला गप्प करतील असे भाव… डबलसीट, हायवे – एक सेल्फी आरपार, मुंबई-पुणे-मुंबई चे सिक्वल, गणवेश, वायझेड, हृदयांतर यासारख्या चित्रपटातील मुक्ताचा अभिनय हा चाहत्यांना तिच्या अधिकच प्रेमात पाडणारा आहे. प्रत्येक भूमिकेतील रंग वेगळे… हे रंग मुक्तानं उत्तमरित्या साकारले आहेत. नाटकाविषयी तिची आस्थाही सर्वांना माहीत आहे.
कोडमंत्र, इंदिरा, दीपस्तंभ, सखाराम बाईंडर सारखी नाटकं तिने रंगभूमीवर आणली… सखाराम बाईंडर नाटकातून मिळालेले सर्व पैसे तिने बॅकस्टेज कलाकारांसाठी दिले… अशी ही आपली मुक्ता… कितीही मोठी झाली तरी तिचे पाय जमिनीवर आहेत. आजही आपल्यासाठी काही खरेदी करायची असेल तर तिला तिच्या आईची सोबत लागते. लहानपणी अगदीच अबोल असणारी मुक्ता आता तिच्या डोळ्यांमधून, अभिनयातून बोलती झाली आहे. या गुणी अभिनेत्रीचे हे अभिनय रंग असेच बहरत जाणार आहेत… या तिच्या अभिनयाच्या बहराला कलाकृती मिडीयातर्फे लाख लाख शुभेच्छा….
सई बने