‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कॅमे-यावर हुकुमत गाजवणा-या महेश यांचा डोंबिवली ते बॉलिवूड संघर्ष नक्की कसा आहे…..
डोंबिवलीतील फणसेबाईंच्या शाळेत प्राथमिक शिक्षण… पुढे स वा जोशी शाळेत दहावी… दहावीनंतर या मुलाने थेट जेजे ची वाट धरली… रोज भल्या पहाटे पहिल्या ट्रेनबरोबर जणू दोस्ती केली… सीएसटीच्या फलाटावर बसून हजारो स्केचेस काढले… मग त्याच्या हाती कॅमेरा लागला… आणि आयुष्याचं ध्येयचं मिळालं जणू… झपाटल्यागत कॅमे-याचा अभ्यास केला… त्यात जेजेचं कलाविश्व सोबतीला… या वेड्या ध्येयाचं फळ मिळालं… चित्रपट आणि जाहीरातीच्या विश्वात त्याची आणि कॅमे-याची दोस्ती म्हणजे हुकमी एक्का ठरली… मराठी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीतही सिनेमॅटोग्राफर म्हणून आपली विशेष ओळख निर्माण करणारं हे व्यक्तीमत्व म्हणजे महेश लिमये… एका मध्यवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेले महेश यांचा हा प्रवास स्वप्नवत आहे. पण त्यामागे आहे ती प्रचंड मेहनत… आणि मेहनतच….
डोंबिवलीच्या स वा जोशी शाळेतून महेश लिमये 1987 मध्ये दहावी झाले. दहावीनंतर इतर कुठल्याही कॉलेजमध्ये सायन्स किंवा कॉमर्स शाखेकडे जाणार नाही हे त्यांनी आठवी, नववीमध्येच नक्की केलं होतं. त्यांना जे.जे. कला महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यांच्या निर्णयाला आई वडिलांचा पाठींबा होता. पण जे जे मध्ये महेश यांना प्रवेश मिळाला नाही. लेखी परीक्षा पास झाले, मात्र मुलाखतीमध्ये मागे पडेल. त्यामुळे त्यांनी जेजे मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फाऊंडेशनचा अभ्यासक्रम केला. 1987 ते 1988 मध्ये त्यांनी ठाणे स्कूल ऑफ आर्टमध्ये फाऊंडेशन केलं. त्यानंतर डोंबिवलीच्याच म. ना. करंदीकर सरांच्या करंदीकर कला अकादमीमध्ये प्रवेश घेतला. करंदीकर सरांबरोबर त्यांनी एक वर्ष काम केलं. 1989 मध्ये महेश लिमये जेजे कला महाविद्यालयात दाखल झाले. जे जे मध्ये प्रवेश करण्याचं त्यांचं स्वप्न होत… ध्येय होतं. हे ध्येय पूर्ण झाल्याने आणि तिथल्या वातावरणामुळे एका जादुई दुनियेत आपण प्रवेश केल्याची जाणीव त्यांना झाली. 1989 ते 1994 ही जेजे मधील पाच वर्ष स्वप्नवत होती… पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत महेश यांनी घेतली ती नवोदीतांना प्रेरणा देणारी आहे. जे जे ची पाच वर्ष पुढच्या वर्षांसाठी मार्गदर्शक ठरली. 89 ते 94 ही पाच वर्ष सर्वोत्तम होती. डोंबिवलीहून राजेश जोशी, सुधांशू ठोके आणि महेश हे त्रिकूट रोज पहिली ट्रेन पकडायचे… सीएसटीला पहाटे साडेपाचला हजर… तिथे एक कोपरा पकडायचा. सीएसटीवर रोज हजारो माणसांची ये-जा चालू असते… त्यांचे चेहरे पकडायचे आणि स्केचिंग चालू करायचं… रोज तब्बल दोन तास हा स्केचिंगचा सराव करायचा…. जेवढे जास्त चेहरे हाताखालून जातात तेवढा हात मोकळा होतो… त्यामुळे हा रोजचा दोन तासांचा सराव झाला की कॉलेज गाठायचं… तिथे तिन वाजेपर्यंत कलेच्या विश्वात… मग बदलापूर किंवा अंबरनाथ ट्रेन पकडून बॅक टू डोंबिवली…. महेश यांनी घेतलेल्या या मेहनतीचं चिज झालं. जे जे मध्ये पहिली दोन वर्ष त्यांना स्कॉलरशिप मिळाली. तिस-या वर्षापासून फोटोग्राफी, प्रिटींग टेक्नॉलॉजी आणि इलेस्ट्रीशन हे विषय आले. फोटोग्राफीची थेअरी होती… अनेक मान्यवरांनी काढलेले पोर्टफोलियो पहायला मिळाले… कॅमेरा आणि लाईट यांची जादू काय असते हे पहायला मिळाले. तिथेच कॅमेरा हेच आपलं भविष्य असणार हे महेश यांनी नकळत निश्चित केलं. त्यासुमारास एमटीव्ही चॅनेल नुकतच लॉन्च झालं होतं. महेश आणि त्यांच्या मित्रांची 30-32 जणांची गॅंग या रॉक म्युझिकची चाहती होती. कुठेही रॉक शो असला की मंडळी हजर… एमटीव्हीचे म्युझिक व्हिडीओ खास असायचे… त्यात सिनेमॅटोग्राफीचे तंत्र आधुनिक स्वरुपात असायचे… जेजे मधून घरी आल्यावर महेश एमटीव्हीवर ही सिनेमॅटोग्राफी बघत असायचे. या निरीक्षणाचा वापर त्यांनी फोटोग्राफीमध्ये सुरु केला. जे जे मध्ये शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट सादर करावा लागे. महेश यांना त्यात चार क्रियेटीव्ह फोटोग्राफीचे पुरस्कार मिळाले. शेवटच्या वर्षीचं हे प्रोजेक्ट सादरीकरण म्हणजे कॅम्पस इंटरव्हूच असतो. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट बघण्यासाठी अनेक मान्यवर अॅड एजन्सीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि या क्षेत्रातील देश-विदेशातील मंडळी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी संधी असते. त्यात महेशना पॅनल मिळालं होतं. पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे त्यांना एजन्सीमधून कॉलही आला. नोकरीची ऑफरही आली… पण महेश यांनी आपला मार्ग निवडला होता. त्यांना सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पहायचं होतं. या क्षेत्रात त्यांच्या कुटुंबपैकी कोणीही नव्हतं… पण हे क्षेत्र नवखही नव्हते. त्यांच्या आईचे वडील, आबा जोशी हे बॉम्बे फिल्म लॅबोटरीमध्ये कामाला होते. ते रसायन तंत्रज्ञ होते. त्यांनी बी आर चोप्रांच्या सर्वच चित्रपटांचे काम केलेले. पण त्यांच्यानंतर कोणीही फिल्मइंडस्ट्रीमध्ये गेलं नव्हतं. त्यामुळे महेश यांनी नव्यानं शोधाशोध सुरु केली.
दरम्यान त्यांच्या प्रियाल भगत या मित्रानं क्रेस्ट कम्युनिकेशनचं नाव सुचवलं. तिथे प्रोडोक्शन विभागत महेश काम करु लागले. 1994 च्या मे महिन्यात हे काम सुरु केलं. क्रेस्टचे श्याम रमण्णा म्हणजे राजा रमण्णा या प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे चिरंजीव… श्याम रमण्णा म्हणजे राजा माणूस… महेश क्रेस्टमध्ये प्रोडोक्शन ट्रेनी होते. प्रोडोक्शन ट्रेनी म्हणजे स्पॉट बॉयची भूमिका…. महिन्यातून सात ते आठ जाहीराती शूट होत असल्याने भऱपूर काम होतं. म्हणजेच तेवढच शिकता आलं. तिथे गोपाल शहा, अनिल मेहता, जहांगीर चौधरी हे डीओपी म्हणून काम करायचे. शुटींगमध्ये काही ब्रेक लागला की महेश त्यांना आपला पोर्टफोलीओ दाखवायचे. त्यापैकी काहींनी त्यांना पुण्याच्या फिल्म इंस्टीट्युटमध्ये जाण्यास सुचवलं. तिथेच त्यांना राजा सय्यद भेटले. त्यांनाही महेश यांनी आपला पोर्टफोलीओ दाखवला. पण तेव्हा कामाचं काहीच झालं नाही…
क्रेस्टच्या काही महिन्याच्या कामानंतर महेश आरो व्हिजन या म्युझिक चॅनलमध्ये पोस्ट प्रोडक्शन विभागात काम करु लागले. तिथं दोन महिने काम केले. त्यावेळी त्यांनी राजा सय्यद यांची पुन्हा भेट घेतली. यावेळी राजा यांनी महेशना काम दिलं, पण पगार मिळणार नाही असं स्पष्ट सांगितलं… महेश यांना या क्षेत्रात अनुभव गरजेचा होता. त्यामुळे त्यांनी हा जॉब स्विकारला. सिनेमॅटोग्राफी क्षेत्रातलं हे महेश यांचं पहिलं पाऊल. त्यांनी सात वर्ष राजा यांच्याकडे काम केलं. त्यातील पहिली दीड वर्ष पगार मिळत नव्हता. कधीतरी 50 रुपये प्रवास भत्ता मिळायचा. 96 पासून ते असिस्टंट म्हणून काम पाहू लागले. 400 रु. पर शिफ्ट असं मिटर चालू झालं. पहिल्या कमाईचा आस्वाद चाखता आला. खरं पहाता जे जे मध्ये असल्याचा फायदा महेश यांना पहिल्यापासून स्वावलंबी बनण्यासाठी जास्त झाला होता. आधीपासूनच ते पेंन्टींग, ग्रिटींग, कॅलिग्राफी करुन विकायचे. त्यातून पैसे मिळायचे. त्यात कॅमेरा हाताळता येऊ लागला तेव्हापासून महिन्यातून एखादा पोर्टफोलियो करायचे. त्यातून 3ते 4 हजार रुपये मिळायचे. त्याकाळी ते पुष्कळ व्हायचे. त्यामुळे संघर्षाच्या वर्षात या पैशांनी खूप आधार दिला.
या क्षेत्रात कामाच्या वेळाचं बंधन नसतं. 9 ते 5 ही सोनेरी चौकट तर नसतेच… सकाळी सुरु झालेली शिफ्ट रात्री उशीरा संपते… कामाची काही ठराविक वेळ नसते. त्यातून डोंबिवलीला वास्तव्य. अनेकवळा शुटींगचे रात्री दोन वाजता पॅकअप व्हायचे. तेव्हा शेवटची ट्रेन गलेली असायची. अशावेळी दादरला मामा, काका यांच्याकडे जाऊन रहायला लागयचे. या नातेवाईकांनाही रात्री दोन किंवा तीन वाजता उठावे लागे. पुन्हा पहाटे साडेपाचच्या सुमारास घर सोडावे लागे. आपल्या नातावाईकांना आपल्यामुळे नाहक त्रास होतो याची चुटपूट महेश यांना असे. त्यामुळे अनेकवेळा ते शेवटची ट्रेन चुकल्यावर दादर स्टेशनजवळील चहाच्या टपरीवर टाईमपास करायचे… पहाटेची पहिली गाडी पकडून डोंबिवली गाठायची. काही वेळा झोप एवढी असायची की अंबरनाथ किंवा बदलापूरची वारी व्हायची… घरी पोहचल्यावर एखाद तास झोप… पुन्हा सातच्या सुमारास घर सोडायचे.
तेव्हा प्रवासाच्या एवढ्या सोयी नव्हत्या. मढ आयलंडला शूटींग असल्यावर दोन तास तरी प्रवासात जायचे. पु्न्हा कामावर सतत उभं रहावं लागे. मग पुन्हा दोन तास परतीचा प्रवास. अशी महेश यांनी तब्बल सात वर्ष काढली. महेश यांची ही कसरत पाहून त्यांच्या वडीलांनी त्यांच्यामागे डोंबिवलीच्या बाहेर पडण्याचा तगादा लावला. वडीलांच्या आग्रहाखातर महेश 2000 साली ठाण्यात आले. तेव्हाच लग्न झालं. 2001 पासून महेश यांनी स्वतंत्र सिनेमॅटोग्राफी चालू केली. प्रोमो, डॉक्युमेंटरी फिल्म असं काम चालू झालं. 2003 पर्यंत अनेक परदेशी डीओपींबरोबर काम केलं. ऑस्ट्रिलिया, अमेरिका, ब्रिटन येथील तज्ञांचा त्यात समावेश होता. त्यांच्याबरोबर काम करण्याचा महेश यांना फायदा खूप झाला. परदेशात शुटींगसाठी मनुष्यबळ कमी असतं. त्यामुळे अनेक कामं स्वतःच करावी लागतात. त्यातून अनुभव मिळतो. दरम्यान जे जे चा त्यांचा मित्र स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम करु लागला. मार्लन रॉड्रीग्ज हे त्याचं नाव. त्याच्याबरोबर महेश यांनी अनेक जाहीराती केल्या. सी यू अॅट नाईन या सायकोथ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन मार्लन करणार होते. या चित्रपटासाठी महेश यांनी पहिल्यांदा स्वतंत्रपणे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. या चित्रपटाचे प्रोमो बघून मधुर भांडारकर यांनी महेश यांना भेटायला बोलावले. तेव्हा मधुर भांडारकर कॉर्पोरेट साठी सिनेमोटोग्राफर शोधत होते. ही भेट होण्यासाठीच दीड महिन्यांचा कालावधी गेला. या भेटीत मधुर यांनी अगदी दहा मिनीटांच्या गप्पांमध्ये महेश यांना कॉर्पोरेट चित्रपट दिला. मधुर भांडारकर आणि महेश लिमये हे समिकरण दृढ झालं. या दोघांनी चार चित्रपट केले. कॉर्पोरेट, ट्रॅफीक सिग्नल, फॅशन, हिरोईन… यापैकी ट्रॅफीक सिग्नल आणि फॅशन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
दरम्यान मराठी चित्रपटातही महेश लिमये यांच्या कॅमे-याची जादू रंगू लागली होती. बिपीन नाडकर्णी यांच्याबरोबर उत्तरायण आणि एवढंस आभाळ हे चित्रपट त्यांनी केले. तर रवी जाधव यांच्यासोबत महेश यांनी नटरंग, बालगंर्धव आणि बालक पालक हे मराठीतील बिग बजेट यशस्वी चित्रपट केले. चित्रपट क्षेत्रात कॅमेरा हा हुकमी एक्का असतो. त्यामुळे त्याचा वापर कसा होतो, यावर चित्रपटाचं यश अवलंबून असतं. महेश यांची मेहनत आणि कल्पकता यामुळे चित्रपटांचा ओघ त्यांच्याकडे वाढत होता. या सर्व काळात त्यांनी केलेल्या पाच चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. महेश याचं सर्व श्रेय उमेदीच्या काळात केलेल्या परिश्रमांना आणि निरिक्षणाला देतात.
या सर्वांत फॅशन चित्रपट करतांना महेश यांचा अरबाज खान यांच्याबरोबर परिचय झाला. फॅशनमध्ये एका फॅशन शोचं चा सीन होता. मेहबूब स्टुडीओमध्ये हे शूट होतं. मरजावां… या गाण्यात प्रियांका आणि कंगना सोबत तब्बल अठरा टॉपच्या मॉडेल सहभागी झाल्या होत्या. त्यासाठी महेश यांनी केलेला लायटींगचा सेटअप पाहून अरबाज खूष झाला. त्यांनं महेश यांचं कौतुक करत आपल्या आगामी चित्रपटासाठी तुला काम करायचंय असं सांगितलं. ही घटना झाल्यावर साधारण दीड वर्षांनी अरबाजनी रात्री बारा वाजता फोन करुन महेश यांना त्यांच्या ऑफीसला बोलावलं. दिग्दर्शक अभिनव कश्यप तिथे होते. त्यांना चित्रपटाचं स्क्रिप्ट ऐकवण्यात आलं…. अभिनव यांनी काही जुजबी प्रश्न त्यांना विचारले… जे दिग्दर्शक म्हणून त्यांना अपेक्षित होते तेच महेश यांनी कॅमे-याच्या नजरेतून पाहिलं होतं… त्यामुळे अभिनव आणि महेश यांचा मेळ लगेच बसला आणि महेशच्या हाती दबंग हा चित्रपट आला.
एकशे चाळीस दिवस दबंगचं शुटींग चालू होतं. ते करतांनाच महेश यांची खात्री झाली होती की दबंग सुपरडूपर होणार… त्यानंतर हिंदी मधील त्यांचा प्रवास चालू झाला. तसंच जाहीरातींही अनेक केल्या. गोरी तेरे प्यार मे हा चित्रपट केला. तर करीना, सचिन तेंडूलकर, ऋतिक रोशन, महेंद्रसिंग धोनी आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही महेश यांनी अनेक जाहीराती केल्या.
दरम्यान उत्तुंग ठाकूर यांचा बालक पालक हा चित्रपट करतांना रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांनी महेश यांच्या कामाची पद्धत पाहिली होती. उत्तुंग यांचे भाऊ वसई विरार भागात विशेष मुलांच्या शाळा चालवतात. तिथे या मुलांच्या एका कार्यक्रमात त्यांनी उत्तुंग यांना या मुलांसाठी एखादा चित्रपट कर असं सुचवलं. यासाठी उत्तुंग ठाकूर आणि राजू वनमाळी यांनी महेश यांची भेट घेतली. या भेटीत महेश लिमये यांच्याकडे आणखी एक नवी जबाबदारी आली. ती म्हणजे दिग्दर्शनाची…. तोपर्यंत महेश यांनी जाहीरातींचं दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली होती. या नव्या चित्रपटाच्या कथेवर अबंर-गणेश हे काम करत होते. जवळपास नऊ महिने या कथेवर काम चालू होते. यासाठी काही प्रश्नांचा संच बनवण्यात आला. हे प्रश्न विशेष मुलांच्या शाळातील पालकांना आणि शिक्षकांना देण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या उत्तरातून कळलं की, या पालकांना सहानुभूती आवडत नाही. तेव्हाच महेश यांनी या मुलांमधील विजेत्यांवर चित्रपट करायचा निश्चय केला. हा चित्रपट बघून इतरांनाही हुरुप येईल हा उद्देश ठेवला. त्यामुळे अशा वियजी व्यक्तीमत्वाचा शोध सुरु झाला. यात गौरी गाडगिळचा शोध लागला. तिच्यावर चित्रपट करण्याचं निश्चित झाल्यावर महेश यांनी तिच्या पुण्यातील पालकांची भेट घेतली. कथा पूर्ण झाली. मग गौरीच्या भूमिकेसाठी कलाकारांचा शोध सुरु झाला. त्या दरम्यान महेश यांना गौरी जिथे सराव करते त्या स्विमींग पुलवर जाण्याची संधी मिळाली. तिथे शेखर खासनिस या तिच्या कोचनी महेश आणि गौरीची ओळख करुन दिली. गौरीला पहिल्यांदाच बघितल्यावर महेशला चित्रपटातील गौरीही भेटली…. गौरीच गौरीची भूमिका करणार हे त्यांनी तिथेच नक्की केलं. या त्यांच्या निर्णयाबाबत मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये आणि इतरांनाही थोडी शंका वाटत होती. पण महेश यांनी या सर्वांबरोबर गौरीची भेट करुन दिली. गौरींची छाप या सर्वांवर पडली. गौरीची भूमिका गौरीच करणार हे नक्की झालं. 4 एप्रिल 2014 रोजी यलो रिलीज झाला. 16 एप्रिल 2014 रोजी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. त्यात यलोला बेस्ट ज्युरी फिल्म आणि संजना राय आणि गौरी गाडगिळ या दोघींना विशेष राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले. यलो बनवतांना साधारण दीड वर्षाचा कालावधी लागला. जे जे मध्ये असतांना ज्या सोनेरी वर्षाचा आनंद महेश यांना मिळाला, तसाच आनंद त्यांना यलोच्या दिग्दर्शनात मिळाला. या चित्रपटाला उत्तम यश मिळालं. या चित्रपटातील गौरीचं यश बघून अनेक पालकांनी आपल्या मुलांना पोहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आपण ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतली ती गोष्ट लोकांपर्यंत पोहचली याचा आनंद वेगळा असतो. तो अनुभव महेश यांना मिळाला. या चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाला गेल्यावर रितेष देशमुख यांनीही महेश यांचं कौतुक करत तुमच्यामुळेच ही संधी मिळाल्याचे सांगितले…. एखाद्या कलाकाराला ही अशी शाबासकी खूप मोलाची असते.
महेश यांच्या खात्यात मग फॅमिली कट्टा, दबंग 2, दबंग 3 असे चित्रपट जमा झाले. संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांतील साहसदृश्ये महेश यांनी चित्रीत केली. भन्सांली यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मोठा… त्यात ऐतिहासिक चित्रपटाचा अनुभव. या दुहेरी अनुभवाचा फायदा महेश यांना सरसेनापती हंबीरराव मोहीते या चित्रपटाच्या शुटींगमध्ये झाला आहे. मराठीमध्ये येणा-या या चित्रपटाचे अवघ्या काही दिवसांचे शुटींग राहीले आहे. लॉकडाऊन नंतर बहुधा हे चित्रीकरण करण्यात येईल. आत्तापर्यंत आलेल्या मराठी ऐतिहासीक चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहीते हा भव्यदिव्य ठरणार आहे.
यापाठोपाठ महेश लिमये यांच्या आणखी एका चित्रपटाचे शुटींग सुरु होणार होते. महेश यांच्या दिग्ददर्शनाखाली येणारा हा दुसरा चित्रपट एका प्रेमकहाणीवर आधारीत आहे. कोरोनामुळे झालेली परिस्थिती निवळल्यावर या चित्रपटाचे काम महेश सुरु करणार आहेत. महेश या चित्रपटसृष्टीमध्ये गेली 26 आहेत. जसजशी वर्ष जात आहेत, तसेच त्यांच्या अनुभवात भर पडत आहे. या सर्व संघर्षात त्यांचं कुटुंब तेवढ्याच सक्षमपणे त्यांच्या मागे उभे आहे. आई-वडीलांनी या अनोळखी जगात वावरायला पाठबळ दिलं. तसंच मध्यरात्री येणा-या आपल्या पुतण्याला मायेनं सांभाळणारे काका-काकू, त्याच्यासाठी पहाटे उठणारे मामा-मामी, घरची जबाबदारी सांभाळणारी भावंडं, आणि सर्वात मह्त्त्वाची साथ कोणाची असेल तर ती पत्नीची… क्षमाची… महिनोमहिने शुटींगमध्ये व्यस्त असलेल्या पतीच्या अनुपस्थितीत कुटुंबाची जबाबदारी तेवढ्याच सक्षमपणे साभांळणा-या या साथीमुळेच आपण आपले काम तन्मयतेने करु शकतो, हे महेश नम्रतेने सांगतात… यासर्वांमुळेच कोणताही गॉडफादर नसतांना केवळ आपल्या मेहनतीच्या आणि कल्पकतेच्या आधारावर त्यांनी हे यश खेचून आणले आहे…. यालाच बादशहा म्हणतात… कॅमे-याचा बादशहा…..
-सई बने