‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
तरुण रायकरचा खुनी कोण…?
द रायकर केस : कौटुंबिक मेलोड्रामामध्ये अडकलेला थरारपट
ऑनलाईन ॲप : व्हूट सिलेक्ट
पर्व : पहिले
स्वरूप : कौटुंबिक थरारपट
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
मुख्य कलाकार : अतुल कुलकर्णी, अश्विनी भावे, कुणाल करण कपूर, पारुल गुलाठी, ललित प्रभाकर, मनवा नाईक आणि इतर
सारांश : गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात घडणारं सिरीजचं कथानक कौटुंबिक ड्रामा आणि अपुऱ्या वेळेमुळे घुटमळत राहत पण तरीही प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यास काहीअंशी यशस्वी ठरतं.
‘द रायकर्स’, यशवंत रायकर यांच्या नेतृत्वाखाली नांदणारं (?) गोव्यातील एक प्रतिष्ठीत कुटुंब. घरातील जेष्ठ भाऊ या नात्याने बहीणभाऊ त्यांची मुले असं भरलेलं गोकुळ यशवंत यांनी आपल्या खांद्यांवर पेलून धरलेलं असतं. कोणत्याही सुखवस्तू घरात होणारे तंटे या कुटुंबालालाही चुकलेले नसतात. पण एका रात्री तरुण नाईक रायकर उंच कठड्यावरून उडी मारून आपला जीव देतो आणि सिरीजच्या कथानकाला सुरवात होते. सिरीजच्या पहिल्या सीनमध्ये दाखवलेल्या या आत्महत्येच्या घटनेनंतर प्रेक्षकांची उत्सुकता तरुणच्या आत्महत्येचं कारण शोधण्यामध्ये गुंतते. त्यात उडी घेण्यापूर्वी तरुण आणि त्याची बहीण इताशामध्ये झालेल्या मोबाईल संभाषणावरून संशयाची पहिली सुई इताशावर जाते आणि तीही भावनेच्या भरात वेळेवर त्याचा फोन न उचलल्यामुळे आपणच तरुणच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा समज करून घेते. पण दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांच्या बोलण्यातून एक वेगळच वास्तव पुढे येतं. पोलीस अधिकारी जॉन परेलाला प्राथमिक तपासातून तरुणने आत्महत्या केलेली नसून त्याचा खून केला असल्याचं जाणवतं आणि संपूर्ण रायकर कुटुंब त्याच्या संशयाच्या कचाट्यात सापडतं.
सिरीजची सुरवात अतिशय उत्साहवर्धक घटनाक्रमाने सुरु होते. कुटुंबातील प्रत्येकाभोवती संशयाची सुई फिरते आणि प्रत्येकाकडे तरुणचा खून करण्यासाठी एक कारण असतच. पण तरुणचा खून नक्की कोणी केला हे कोडं प्रत्येक भागागणिक अजूनच गुंतत जातं. सात भागांच्या या सिरीजच्या कथानकाचा पसारा मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. त्यात तरुणवर असलेला ख्रिश्चन मिशनरीचा प्रभाव आणि त्याला घरच्यांचा असलेला विरोध, तरुणचे वडील आणि बहिणीचा झालेला गूढ अपघातातील मृत्यू, राज्यसभेत प्रवेश मिळविण्यासाठी चाललेली यशवंतची धावपळ आणि त्यानिमित्ताने राजशेखर राणे आणि त्यांचा मुलगा एकलव्य राणे यांचे रायकरांसोबतचे गुंतागुंतीचे संबंध, रायकरांचा काजूचा कारखाना आणि त्यातील अर्थकारण अशी बरीच जोड कथानके सिरीजच्या मूळ कथानकामध्ये गुरफटलेली आहेत. त्यामुळे कथानकात कुठेच स्थिरता येत नाही.
पण त्याचवेळी सात भागांच्या या सिरीजच्या प्रत्येक भागासाठी ३० मिनिटांचा कालावधी आखून दिलेला आहे. ही वेळमर्यादा मात्र कथानकामध्ये आडवी येते. इतका मोठा पसारा अपुऱ्या कालावधीत मांडताना प्रत्येक व्यक्तिरेखेला खुलविण्याची संधी दिग्दर्शकाला मिळत नाही. गेल्या काही काळामध्ये वेबसिरीजची काळमर्यादा अर्ध्या तासावरून ४५-६० मिनिटांवर गेलेली आहे. उत्तम कथानकाच्या सिरीजसाठी इतका वेळ गुंतवणे यास प्रेक्षकांचीही हरकत नसते. पण तरीही मराठी वेबसिरीजमध्ये अजूनही हे धाडस दिसत नाही. मराठी दिग्दर्शक आणि कलाकारांची तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिरीजबाबत हे धाडस करण्यास दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना काहीच हरकत नव्हती पण त्यांनी इथे हात आखडता घेतला आहे.
काही वर्षांपूर्वी ‘ब्रोडचर्च’ नावाची एक ब्रिटीश मालिका आली होती. (सध्या ती नेटफ्लिक्सवर पहायला मिळते) एका शाळकरी मुलाचा कठड्यावरून पडून मृत्यू होतो आणि त्यात गावातील विविध लोकांचे धागेदोरे अडकले जातात. या दोन्ही मालिकांच्या मांडणीमध्ये बरच साम्य दिसत. पण ब्रोडचर्चमध्ये दिग्दर्शक गुन्ह्याच्या आणि गुन्हेगाराच्या मानसिकवृत्तीवर बोट घालतो, तर रायकर केसमध्ये अनेकपदरी थरारनाट्य मांडलेलं आहे. त्यात रायकरांचे कौटुंबिक नाट्यही घुसळले गेले आहे. ते मात्र बऱ्याच ठिकाणी निरथर्क वाटत. सिरीजची जमेची बाजू म्हणजे अतुल कुलकर्णी आणि अश्विनी भावे यांची जमलेली जुगलबंदी. कोंकणी भाषेचा लय पकडून यशवंत आणि साक्षी नाईक रायकर हे त्यांनी साकारलेलं जोडपं सिरीजचा महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः हे दोघे आमनेसामने उभे राहिल्यावर त्यांच्यातील सीन हे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले आहेत. पण त्याचवेळी गोव्याच्या कोंकणी पार्श्वभूमीवरील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी हिंदी कलाकारांची केलेली निवड काहीशी खटकते. कदाचित हिंदी टीव्हीविश्वातील हे ओळखीचे चेहरे निवडून सिरीजला मोठं प्रेक्षकवर्ग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या कलाकारांच्या तोंडी आलेल्या कोंकणी संवादात मात्र कृत्रिमता जाणवते. ललित प्रभाकरला सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका आहे, पण त्याच पात्र खुलण्यासाठी सिरीजच्या दुसऱ्या पर्वाची वाट पहावी लागणार आहे. शेवटच्या भागांमध्ये सिरीजचं कथानक संपणार या आशेत असलेल्या प्रेक्षकांना अखेरच्या क्षणी एक धक्का देत नव्या पर्वाची उत्सुकता दिग्दर्शकाने ताणून धरली आहे. पण हे पर्व उशिरा आल्यास सिरीज प्रेक्षकांच्या विस्मृतीत जाण्याचीही तितकीच शक्यता असल्यामुळे ती उत्सुकता कितपत ताणावी हे निर्मात्यांच्या हाती आहे.
– मृणाल भगत