‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
जितेंद्रने अपमान गिळून स्वत:ला सिध्द केले त्या मुळेच अभिनयाची मोठी इनिंग तो खेळू शकला.
अभिनेता जितेंद्र याचा रूपेरी पडद्यावरील प्रवेशाचा किस्सा फार गमतीचा आहे. त्याच्या वडलांची पेढी होती. सिनेमा साठी दाग दागिने भाड्याने ते देत असत. त्या निमित्ताने तो शांताराम बापूंकडे राजकमल मध्ये येत असे. बापूंचे सर्वांकडे बारीक लक्ष असे. जितेंद्रचा चेहरा त्यांना बर्यापैकी फोटोजनिक वाटला. एकदा जितेंद्रला त्यांनी बोलावून घेतले व त्याची स्क्रीन टेस्ट घेतली. त्या वेळी त्यांचा ’नवरंग’ हा सिनेमा फ्लोअर वर होता. त्यात क्राऊड मधील जुजबी भूमिका केल्यावर त्यांनी ’सेहरा’ या सिनेमाकरीता त्याचा विचार केला. ‘सेहरा’ चं सगळं चित्रीकरण राजस्थानातील वाळवंटात होणार होतं. सगळं युनिट तिकडे पोचलं. बापू करड्या शिस्तीचे. त्यांना थोडा देखील उशिर चालत नसे. एका दिवशी रात्रीच्या जेवणाला जितेंद्र उशिरा पोचला. बापूंनी त्याला तिथल्या तिथे भरपूर झापला व मेकअपमन बोलावून सांगितले याच्या चेहर्याला उद्यापासून रंग लावायचा नाही! प्रॉडक्शन डिपार्टमेंटला जितेंद्रचा हिसाब चुकता करून त्याला परत पाठवून देण्याचे निर्देश दिले.
जितेंद्र रात्रभर तळमळत राहिला. हाती आलेली संधी स्वत:च्या क्षुल्लक चुकीने जाताना पाहून मनाला दु:ख झाले. पहाटे पाचलाच उठून तो तयार झाला व शेवटचा चान्स घ्यावा म्हणून बापूंकडे गेला व पश्चातापाने माफी मागू लागला. बापूंनी त्याला सांगितले “चूक तर तुझ्याकडून झालीच आहे. आता या सिनेमात तू संध्याची डमी / डुप्लीकेट म्हणून काम करायचं.” सिनेमात संध्याला उंटावर बसायचं होतं. इतरही काही स्टंटस होते. या सार्या सीन्स मध्ये साडी घालून व डोक्यावर घूंघट घेवून जितेंद्र काम करीत होता! जितेंद्रच्या मनाचा मोठेपणा त्याने त्याच्या वाट्याला आलेली ही भूमिका देखील चोख बजावली. शांताराम बापू खरे द्रष्टे. त्यांनी जितेंद्रचा सिनेमा बाबतीतला हा अॅटीट्यूड बघून त्यांच्या पुढच्या ’गीत गाया पत्थरोने’ या सिनेमात त्याला नायकाची फुल लेन्थ भूमिका दिली. नायिका होती बापूंची मुलगी राजश्री. जितेंद्रने अपमान गिळून स्वत:ला बापूंपुढे सिध्द केले त्या मुळेच अभिनयाची मोठी इनिंग तो खेळू शकला.