निलेशनी अवघ्या 12 तासात उभं केलं ‘चला हवा येऊ द्या’
व्यसन चांगलं असतं का…. सर्वच नाही… काही व्ससनं ही चांगली असतात. गेली सहा वर्ष महाराष्ट्राला एका कार्यक्रमाचं व्यसन लागलं आहे, तो कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. झी टिव्हीवरील हा कार्यक्रम एखाद्या फायद्याच्या व्यसनासारखा प्रत्येकाच्या घरा घरात जाऊन बसला आहे. या कार्यक्रमानं निखळ आनंद म्हणजे काय याची अनुभती घेता आली.
याचं सर्व श्रेय जातं ते डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) यांना. एक अभिनेता, दिग्दर्शक, निवेदक आणि लेखक या विविधांगी भूमिकेतून निलेश चला हवा येऊ द्या मधून आपल्याला भेटतात. गेल्या सहा वर्षापासून सुरु असलेला हा कार्यक्रम निलेशच्या कल्पकतेने टीआरपीच्या रेसमध्ये सर्वात पुढे आहे.
आयुर्वेदात एमएस केलेल्या निलेशचा अभिनयाचा प्रवास हा शालेय जीवनापासून नक्की झाला होता. मात्र वडील कडक शिस्तीचे. त्यामुळे आधी शिक्षण मग अभिनय अशी अट त्यांनी घातली होती. त्यांच्या वडीलांची सतत बदली होत असे. त्यातून कोल्हापूर आणि नंतर पुण्यामध्ये निलेश यांचे शिक्षण झाले.
पुढे आयुर्वेद कॉलेज नाशिक मध्ये ते दाखल झाले. हाती एमएस आयुर्वैद ही पदवी आल्यावर त्यांच्या वडीलांनी दोन वर्षाची मुदत दिली. यात अभिनयात सफलता आली नाही तर हाती असलेल्या पदवीचा वापर करुन डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस सुरु करायची, वडीलांनी अशी रोखठोक भूमिका घेतल्यानं निलेशनी सरळ मुंबई गाठली.
त्या दरम्यान झी मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार हा रिॲलिटी शो सुरु होत होता. त्यात निलेशचा प्रवेश झाला. महेश मांजरेकर आणि सुप्रिया या कार्यक्रमाचे जज होते. लहानपणापासून निलेश नकलाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या शिक्षकांच्या नकला ते हुबेहुब करायचे. वडीलांच्या फिरतीमुळे त्यांचे शिक्षण ही एकाच शाळेत झाले नाही. त्याचा फायदाच जणू निलेश यांना झाला. कारण त्यांना नकला करण्यासाठी व्हरायटीही भरपूर मिळाल्या. या सर्वांचा फायदा त्यांना महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये झाला. नवखे असूनही त्यांनी या कार्यक्रमात बाजी मारली.
या विजयानं फू बाई फू सारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून निलेशला निवडण्यात आले. यामध्ये रितेश देशमुख आपल्या ‘लय भारी’ या चित्रपटाच्या टीमसह येणार होता. या टीमचे स्वागत वेगळ्या स्वरुपात करायचे होते. तसे निलेशला सांगण्यात आले. निलेशने कुशल बद्रीके आणि भाऊ कदम यांना घेऊन एक कार्यक्रम आखला. हा कार्यक्रम तुफान प्रसिद्ध झाला.
अवघ्या बारा तासात तयार झालेला हा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. पुढे त्याला स्वतंत्र रुप देण्यात आले. सहा वर्ष निलेशच्या चला हवा येऊ द्या नं तमाम मराठी जनांना भूरळ घातली आहे. निलेशनं आपले फू बाई फू चे सह कलाकार, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, भरत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्यासह या कार्यक्रमाची अशी काही गुंफण केली आहे की मराठीच काय पण हिंदी चित्रपट सृष्टीही यावर फिदा झाली आहे.
निलेशने नवरा माझा भवरा, एक मोहरं अबोल, बुद्धीबळ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावरही एन्ट्री घेतली आहे. या डॉक्टर अभिनेत्याची पत्नीही डॉक्टर आहे. डॉक्टर गौरी साबळे. गौरी ही त्याच्याच आयुर्वैदीक कॉलेजची विद्यार्थीनी. एका कार्यक्रमात या दोघांची ओळख झाली. निलेश तिथे नकला सादर करायला गेले होते, तर गौरी गाण्यासाठी आली होती. तिथेच दोघांची ओळख झाली. पुढे या ओळखीचं रुपांतर लग्नात झालं आहे. चला हवा येऊ द्या च्या सेटवर ही डॉक्टर पत्नी आपल्या भेटायला येते तेव्हा चर्चेत असते.
चला हवा येऊ द्या ची सुरुवात झी टीव्हीवर 18 ऑगस्ट 2014 रोजी झाली. मराठी चित्रपट आणि नाटकाचं प्रमोशन या कार्यक्रमात होतं. पण त्यासोबत आपल्या मराठी कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. मराठी सोबत हिंदी चित्रपटांचे कलाकारही इथे आले आणि रमले. विनोद हा निखळ असावा. हे सूत्र निलेशनं पाळलं. त्याच्या करिअर सोबत त्यानं आपल्या सहका-यांनाही यश आणि ओळख दिली. हा तरुण कलाकार म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रगल्भतेचे प्रतिक ठरतोय. त्याची कारकीर्द अशीच बहरावी ही कलाकृती मिडीयातर्फे शुभेच्छा…