सायलेन्स…. कट… ओके… पुन्हा चालू!!!
मार्च महिन्यात कोरोनाचं आक्रमण झालं. त्याची झळ प्रत्येक क्षेत्राला लागली. आपली चित्रनगरीही या कोरोनाच्या आक्रमणापुढे थंडावली. जिथे रात्र-दिवस मालिकांचे शुटींग होत होते, तिथे शांतता पसरली. आवडीच्या मालिकांची टीआरपी रेस थांबली आणि या नव्या विषाणुबरोबर युद्ध सुरु झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तीन महिने सगळे व्यवहार बंद झाले. मालिकेचे जुने भाग पुन्हा पुन्हा बघण्यापलिकडे काहीच उपाय नव्हता. मात्र आता या चाहत्यांसाठी एक खुषखबर आली आहे, ती म्हणजे काही मालिकांनी सरकारने घालून दिलेले नियम पाळत शुटींग पुन्हा सुरु केले आहे. यात पहिली बाजी मारली आहे, ती स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेनं….
लॉकडाऊनमध्ये काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा चित्रीकरणाला होत आहे. जिजामातासह आणखी काही मालिकांना नियमांचं पालन करून शुटींग पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोनी मराठी वाहिनीने आपल्या सर्वात लोकप्रिय मालिकेचे शुटींग सरु केले. मुंबईत चित्रीकरण सुरु करणारी स्वराज्यजननी जिजामाता ही पहिली मालिका आहे.
या मालिकेचं चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी इथं सुरू झालं आहे. शुटींग सुरु करण्यापूर्वी संपूर्ण सेटचं सॅनिटायजेशन करण्यात आलं. सेटवर मास्क आणि हॅण्ड ग्लोज सक्तीचे आहेत. शिवाय नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे शुटींग होणार आहे. काळजी घेण्यासाठी काही लोक सेटवरच राहून काम करणार आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निर्मात्यांनी स्वतंत्र वैद्यकीय तपासणीची व्यवस्था केली आहे. जिजामाता या मालिकेची निर्मिती जगदंबा क्रिएशनं केली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची मालिकेच्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका आहे. त्यामुळे स्वतः डॉक्टर कोल्हे शुटींगच्या पहिल्या दिवशी सेटवर उपस्थित होते. त्यांनी कलाकार आणि तंत्रज्ञांना नवीन नियम समजावून सांगितले. तीन महिन्यांनंतर आपापल्या कामावर रुजू झाल्यामुळे सर्वच मंडळींमध्ये उत्साह होता. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
कोल्हापूरातही शाहू महाराजांच्या जयंतीचा मुहूर्त साधून तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे शुटींग पुन्हा सुरु करण्यात आले. तीन महिन्यांनी शुटींग सुरु झाल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. या शुटींगचा श्रीगणेशा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाला. राणा अर्थात हार्दिक जोशी यांनी महाराजांना अभिवादन केले आणि पहिला सीन दिला. इथेही सोशलडीस्टींगचे नियम कडक आहेत. हे नियम पाळत राणा आणि अंजलीबाई अर्थात अक्षया देवधर यांनी पहिला प्रसंग शुट केला. पहिल्या दोन मिनीटातच शॉट ओके झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. यापूर्वी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पहिल्याच दिवशी तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या कलाकारांनी सायंकाळी सात पर्यंत शुटींग केले. कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनचा फटका कलाकार, निर्माते यांच्यासह तंत्रज्ञ, लाइटबॉय, स्पॉटबॉय यांनाही बसला होता. मात्र आता तीन महिन्यांनी पु्न्हा शुटींग सुरु झाल्याने सेटवर काही कडक नियम असतांनाही आनंदाचे वातावरण होते.
आणखी एका मालिकेचे शुटींग सुरु झाले आहे. ती मालिका म्हणजे मिसेस मुख्यमंत्री. झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेच्या नव्या भागांचे शुट सुरु झाले आहे. सातारा येथे 28 जून पासून निर्माता संजय खांबे आणि श्वेता शिंदे यांच्या उपस्थतीत मालिकेच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा झाला. अर्थात इथेही शुटींग सुरु करण्यापूर्वी सर्व परिसर सॅनिटाईज करण्यात आला. माझा होशील ना या मालिकेनं देखील शुटींगला सुरुवात केली आहे. झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेला प्रेक्षाकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मालिका थांबवण्यात आली. आता शुट चालू झाल्यानं नवीन भाग पहायला मिळतील. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील कलाकार पुण्याहून मुंबईला आले आहेत. इथेही निमय काटेकोरपणे पाळले जात आहेत. शिवाय सॅनिटाईज, मास्क आणि हॅँण्डग्लोज घालण्यात येत आहेत. याबाबात अभिनेत्री गौतमी देशपांडेंनं सांगितलं की, ती स्वतः मुंबईला आल्यावर 15 दिवस क्वारंटाईन होती. खूप दिवसांनी शुटींग सुरु होणार म्हणून तीही खूष आहे.
हे सर्व सुरु असतांना कोल्हापूरच्या चित्रीनगरीनं मात्र वेगळीच भरारी घेतल्याची बातमी आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प असतांना या चित्रनगरीनं बंदच्या काळात उत्तम जाहीरात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्वच प्रकारची शुटींग बंद झाली होती. त्यामुळे इंडस्ट्रीची घडी विस्कटली. अनेक कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. अशावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कलाकर, तंत्रज्ञ, निर्माते, विविध वाहिन्यांचे प्रमुख आदींबरोबर बोलणी केली. येथे बंगले, फार्महाऊस शुटींगसाठी उपलब्ध आहेत. त्यासोबत मालिका, वेबसिरीजसाठीही काही नवीन लोकेशन उपलब्ध आहेत. याची माहीती या लॉकडाऊनमध्ये निर्माते, दिग्दर्शक आणि वाहिन्यांच्या प्रमुखांना देण्यात आली. मुंबईच्या तुलनेत येथे निर्मिती खर्च कमी येत असल्याने या भागात लवकरच मोठ्या प्रमाणात शुटींगची कामे सुरु होतील अशी चिन्हे आहेत.
एकूण काय कोरोनामुळे आलेले मंदिचे वातावरण दूर होत आहे. चित्रीकरण चालू झाल्याने कलाकांसोबत यावर अवलंबून असलेल्या तंत्रज्ञामध्येही आनंदाचे वातावरण आहे. तीन महिने घरात बसून त्याच त्याच मालिका पुन्हा बघणा-या प्रेक्षकांनाही आता त्यांच्या आवडीच्या मालिकांचे नवीन भाग बघता येणार आहेत.
सई बने