सिद्धार्थ जाधवची एक महत्त्वपूर्ण बाजू आपल्याकडून दुर्लक्षित रहाते.
रंगभूमी आणि नाट्यरसिकांचं भरभरून प्रेम लाभलेला कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. कॉलेज एकांकिकांपासून नाट्यरसिकांच्या चर्चेतलं हे नाव. सिद्धू म्हणजे धमाल, सिद्धू म्हणजे मस्ती, सिद्धू म्हणजे धुमाकूळ अशा समीकरणात सिद्धार्थ जाधवची एक महत्त्वपूर्ण बाजू आपल्याकडून दुर्लक्षित रहाते. ती म्हणजे त्याने केलेला संघर्ष आणि व्यसनांपासून दूर रहाण्याचा सच्चेपणा. आज ‘पडद्यामागून’ त्याची ही बाजू पाहुया जी तरुणाईसाठी ख-या अर्थाने प्रेरणा देणारी आहे.
शिवडी परिसरात लहानाचं मोठं झालेल्या सिद्धार्थला स्टेजची भीती कधी वाटलीच नाही. कारण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत त्याने या भीतीवर कधीच मात केली होती. रुईया कॉलेजच्या नाट्यवलयाच्या प्रेमात पडलेल्या सिद्धार्थने रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला तो अगदी नाईलाजाने. रुईयाच्या लीस्टला नाव न लागल्याने रुपारेल महाविद्यालयात दाखल झालेल्या सिद्धार्थसाठी नाटकाचा नवा मंच खुला झाला. सोबत असणा-या तितक्याच गुणी विद्यार्थी कलाकारांसोबत त्याच्यातला अभिनय बहरत गेला.
“तुमचा मुलगा करतो काय”? या नाटकात सिद्धार्थ काम करत असतानाची गोष्ट. शिवडीवरुन बेस्टने प्रवास करणारा सिद्धार्थ शिवाजी मंदिर स्टॉपला उतरून कॉलेजला जायचा तेव्हा न चुकता नाटकाचे बोर्ड बघायचा. आपलं नाव या बोर्डवर येईल अशी स्वप्न पहायचा. तुमचा मुलगा करतो काय ? या नाटकामुळे त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. या नाटकाच्या प्रयोगाला कुणालाही न सांगता सिद्धार्थचे बाबा तिकीट काढून येऊन बसायचे. नाटकाच्या मध्यंतरात लोकं नाटकाबद्दल काय बोलतात ते नीट ऐकायचे आणि संध्याकाळी सिद्धार्थ घरी आल्यावर काय छान झालं, काय चुकलं याची चर्चा झाली की सिद्धार्थ आश्चर्यचकित व्हायचा. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जिथे मुलगा कलाकार होणार म्हणून सर्वसामान्यपणे कडाडून विरोध होतो तिथे मुलांच्या कामाविषयी इतके सजग पालक विरळाच. पण त्यामुळे कलाकार आणि मुलगा म्हणून आयुष्यातील दोन्ही भूमिका सिद्धार्थने उत्तम पेललेल्या दिसतात.
उमेदीच्या काळातील सिद्धार्थच्या बाबतीत घडलेला एक किस्सा खूप काही सांगून जाणारा आहे. एका कामाच्या ऑडिशनला गेलेल्या सिद्धार्थची तिथे खूप भंकस झाली. ॲक्टर असा दिसतो का? असं हिणवलं गेलं.”मै ॲक्टर हूं. मुझे काम चाहीये” हा डायलॉग त्याला प्रत्येकाला जाऊन ऐकवायला सांगीतला गेला. सिद्धार्थने तेही केलं. पण आत कुठेतरी तो दुखावला गेला. घरी जाऊन रडत असताना मोठ्या भावाने काय झालं हे शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याला एक उपाय सांगितला. तो उपाय म्हणजे स्वत:मधल्या आवडणा-या आणि न आवडणा-या गोष्टींची यादी करणे. ती यादी सिद्धार्थने केल्यावर त्यात आवडणा-या अनेक गोष्टी होत्या आणि नावडणारी एकच. ते म्हणजे दिसणं. त्या आवडणा-या अनेक गोष्टींसाठी नावडणारी एकच गोष्ट कुरवाळत बसणं कसं चुक आहे हे भावाने दाखवून दिल्यावर सिद्धार्थ नव्या जोमाने आव्हानं स्वीकारायला तयार झाला आणि विविध भूमिका सहजपणे साकारुन त्याने ते दाखवूनही दिले.
सिद्धार्थ महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती उपक्रमाचा राजदूत आहे. सिद्धार्थच्या आईने त्याच्याकडून व्यसनांपासून दूर रहाण्याचं वचन घेतलं होतं आणि सिद्धार्थने ते पाळलं. नाटकांचे दौरे आणि त्यानंतर रंगणारा “चौथा अंक” यासाठी कित्येक कलाकार बदनाम असताना सिद्धार्थचा हा निश्चय तरुणाईला खूप काही सांगणारा आहे. कामाची झिंग, नशा व्यसनांशिवायही अनुभवता येते हे सिद्धार्थकडे पाहून कळतं. त्याचं एक वाक्य विशेष आहे.
“कलाकार म्हणून कुठल्यातरी दारुच्या लेबलवर आपलं नाव असण्यापेक्षा व्यसनमुक्ती उपक्रमाचा राजदूत म्हणून नाव लागणं कधीही चांगलं”.
आणि म्हणूनच सर्वसामान्य घरातून येऊन असामान्य ठरलेला हा महाराष्ट्राचा सुपरस्टार इथे इतरांपेक्षा वेगळा ठरतो.