‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
४० वर्षीय इसमाने मणिपुरी मुलीवर पानाची पिचकारी मारली आणि तिला ‘कोरोना’ म्हणून हिणवल…
अकुनी : भारतीय समाजात रुजलेल्या वंशव्देषाचं हलकफुलकं चित्रण
२३ मार्च २०२०, करोनाची मुळं हळूहळू भारतात पसरत होती. आत्तापर्यंत युरोप, चीनमध्ये थैमान घातलेला हा आजार भारताच्या सीमेवर येऊन पोहचलेला. आपण या आजाराला रोखू शकतो का? आपल्या यंत्रणा त्यासाठी सज्ज आहेत का? लोकांना ‘टाळेबंदी’ची संकल्पना जमेल का? दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेला कसं सावरायचं? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याची धडपड सरकारी यंत्रणा, पोलीस, समाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, विविध विषयाचे तज्ञ ते थेट खुद्द सामान्य माणसापर्यंत सगळेच करत होते. दरम्यान कुणालाच कल्पना नव्हती की भारतीय समाजात मुरलेला एक प्रश्न यावेळीही आपलं डोकं वर काढत असेल.
याचं दिवशी दिल्लीमध्ये एका ४० वर्षीय इसमाने मोटरसायकलवरून जाताना बाजूला उभ्या असलेल्या मणिपुरी मुलीवर पानाची पिचकारी मारली आणि तिला ‘कोरोना’ म्हणून हिणवल आणि तो निघून गेला. पुढच्या तीन दिवसांमध्ये त्या माणसाला अटक झाली पण त्यामुळे एका झाकलेल्या मुद्द्याला पुन्हा धग मिळाली. भारताच्या ईशान्येकडील राज्यातील लोकांची चेहरापट्टी ही चीन, जपान, भूतान या देशातील लोकांशी मिळतीजुळती असते. त्यामुळे यांना कायम आपल्याच देशात परकीय म्हणून हिणवल जातं. याचं मानसिकतेतून त्या तरुणीला हिणवण्यात आलं होतं.
‘अकुनी’ सिनेमा भारतीय समाजात मुरलेल्या या ईशान्येकडील राज्यातील जनतेबाबतच्या वंशव्देषाच्या प्रश्नाला अधोरेखित करतो पण सोबतच दिग्दर्शक तीव्र उद्रेकापेक्षा हलक्याफुलक्या विनोदी मात्रेचा वापर करतो. हा प्रश्न समाजात मुरलेला आहे हे मान्य करत असताना प्रेक्षकांना त्याची जाणीव करून देताना त्यांच्या आजूबाजूची सहज, सोप्पी पण भोगणाऱ्यासाठी तीव्र परिणाम करणारी उदाहरणे समोर ठेवतो आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पडतो.
दिल्लीच्या एका छोट्याशा गल्लीत राहणाऱ्या ईशान्येकडील राज्यातून आलेल्या एका तरुणांच्या गटाची ही गोष्ट आहे. छबी आणि उपासना त्यांची मैत्रीण मिनामच्या लग्नाची तयारी करत असतात. मिनाम दिल्लीमध्ये नोकरीनिमित्त आल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने तिचं लग्न होणार असतं. अशावेळी लग्नाच्या इतर थाटामाटाला ती मुकत असताना किमान एक छान मेजवानी करून तिचा दिवस साजरा करायचा दोघींचा उद्देश असतो. त्यासाठी अकुनी नावाचा नागालँडचा पारंपारिक पदार्थ बनवायची तयारी सुरु असते.
डुक्कराचं मास वापरून बनविण्यात येणाऱ्या या पदार्थाची सगळ्यात मोठी समस्या असते ती ‘अकुनी’च्या उग्र वासाची. सोयाबीनला आंबवून करण्यात येणारं अकुनी या पदार्थाचा मुख्य जिन्नस असतो. पण त्याला सहन न होणारा उग्र वास असतो. अकुनी शिजवताना हा वास अजूनच तीव्र होत जातो. त्यामुळे भाड्याच्या घरामध्ये आपल्याला हा पदार्थ बनविता येणार नाही, याची पूर्ण कल्पना दोघींना असते. त्यामुळे इमारतीमध्ये साधारणपणे कमीतकमी लोक असताना पदार्थ बनविण्यास सुरवात करायची असं ठरत. पण हा बेत फसतो आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांमध्ये या तरुणांच भावविश्व, त्यांना नित्यनियमाने येणारे अनुभव उलगडत जातात.
करोनाचा प्रसार अमेरिकेत होत असताना आशियायी वंशाच्या अनेक विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. त्यामागेही हेच कारण. करोना हा आजार चीनमधून पसरायला सुरवात झाली. त्यामुळे हा आशियायी समाज हा आजार पसरवत असल्याच्या संशयामुळे या घटना होत होत्या. किमान अमेरिकेत हे विद्यार्थी परदेशातून आलेले होते. पण भारतात मणिपुरी मुलीसोबत झालेला प्रकार हा एका स्वदेशी व्यक्तीने त्याच्याच देशबांधवावर केलेला होता. त्यामुळे याची तीव्रता किंचित अधिकच.
मुळात आसाम, मिझोरम, मणिपूर, अरुणाचलप्रदेश, सिक्कीम, नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यातील जनतेला त्यांची चेहरापट्टी, संवादाची ढब, आहार, कपडे आणि चालीरीतीवरून उर्वरित भारतीय समाजाकडून कायम हिणवल गेलं आहे. कित्येकदा त्यांच्या चेहरापट्टीतील चीन, जपानी लोकांशी असलेल्या साधर्म्यामुळे त्यांना ‘भारतीय’ म्हणून स्विकारायलाही हरकत व्यक्त केली गेली.
एकीकडे भारतीय सेना आणि सरकार चीनशी या राज्यांच्या सीमाप्रश्नांवरून वाद घालत असताना, तेथील स्थानिक लोकांना आपल्यातील एक न मानण्याची दांभिकता भारतीय समाज करतो आहे. थोडक्यात आपल्याला जमीन हवी आहे पण तेथील लोकांचं काय? या प्रश्नांवरून ही राज्ये कायम जळत राहिली.
हा चित्रपट या समाजाचातील एका छोट्याशा बाबीला हाताशी घेतो, ती म्हणजे ‘अकुनी’ डिश बनवायची धडपड. पहायला गेल्यास खरतर अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत हे मान्य केल्यास, प्रत्येकाला आपल्या आवडीचं अन्नपदार्थ बनविण्याचा अधिकार आहे. मग अशावेळी इमारतीची वृद्ध मालकीण डॉलीने या मुलींना, ‘तुम्हाला इथे रहायचे असेल, तर तुमचे उग्र वासाचे पदार्थ बनवायचे नाहीत’ अशी घातलेली अट ही नैतिकदृष्ट्या योग्य ठरते का?
बरं इमारतीच्या मालकी हक्काचा मुद्दा ग्राह्य धरून तिने ही अट घालणं यात कदाचित खटकण्याजोगं काही नसेलही, पण त्याचवेळी या मुली रोजच अकुनी किंवा तत्सम उग्र वासाचे पदार्थ बनवत असत असेही नाही. घरात एक लग्नकार्यासारखा चांगला कार्यक्रम असल्याने पारंपारिक पदार्थ बनविण्याची त्यांची इच्छेला अपवादात्मक घटना म्हणून परवानगी द्यायला हरकत नव्हती. पण तो अधिकार त्यांना नाकारला गेला. असे कितीतरी दिसायला छोटे पण मुलभूत बाबींपासून या समाजाला कसं वेगळं केलं जात याचे अनेक दाखले दिग्दर्शक देतो.
केवळ त्याची हेअरस्टाईल आवडली नाही म्हणून बेंदांगला दिल्लीच्या कॉलेजच्या जमावाने मरेपर्यंत बेदम मारण असो किंवा ईशान्येकडील राज्यातील अन्नपदार्थांना लागणारे जिन्नस, भाजीपाला विकणाऱ्या झोरमच्या दुकानावर एका वयस्कर व्यक्तीने गरज नसताना संशयाच्या नजरेने पाळत ठेवणे असो, शीवने अगदी भोळ्या मनाने केवळ मित्रांमध्ये मिरविण्यासाठी या राज्यांतील एका मुलीला गर्लफ्रेंड बनविण्याची इच्छा व्यक्त करण असो, तिच्या चेहरापट्टीमुळे छबीला सहन करावी लागलेली अश्लिल शेरेबाजी असो अशा कित्येक घटना या तरुणांच्या आजूबाजूला सरार्स घडत असतात.
बरं हे सगळं चित्रण करत असताना दिग्दर्शक या तरुणांमध्ये आपापसात असलेला दांभिकपणासुद्धा उपासनाच्या निमित्ताने अधोरेखित करतो. आसाम, नागालँडसारख्या राज्यांमधील लोकसंख्या अनेक छोट्याछोट्या जमातींमध्ये विभागली गेली आहे. प्रत्येक जमातीचे वेगवेगळे नियम, रीतीभाती आणि चालीरीती आहेत. नोकरी, शिक्षणासाठी या राज्यांमधील तरुण जेव्हा दिल्ली, मुंबई, बंगलोरसारख्या शहरांमध्ये येतात, तेव्हा ते एकतर गटाने राहतात. पण याच गटामध्ये जेव्हा नेपाळची उपासना येते तेव्हा स्वतः बाहेर वंशभेदाचा दाह सहन करत असूनही ते तिलाही आपल्यातील एक म्हणून स्वीकारत नाहीत.
सिनेमा या अशाच समस्यांना प्रेक्षकांपुढे सादर करतो. या प्रश्नांवर कोणतेही भाष्य करणं मात्र दिग्दर्शक टाळतो. त्याच्यावर पूर्वी झालेल्या हल्ल्याच्या वेदनेतून पुरता बाहेर न आलेला बेंदांग शीवच्या अतिजवळीकीमुळे चिडून त्याला, ‘तुम इंडियन’ म्हणून बाजूला ढकलतो. तेव्हा खरतर त्याच्या मनातील हा राग आणि मनामध्ये असलेल्या दोन भिन्न भारत देशाच चित्रण व्यक्त होणं अपेक्षित होतं. पण हे धाडस करणं दिग्दर्शक टाळतो.
कदाचित या धाडसाने या चित्रपटाने एक वेगळीच उंची गाठली असती. पण तरीही हलक्याफुलक्या पद्धतीने एक गंभीर मुद्दा प्रेक्षकांसमोर आणायला चित्रपट यशस्वी ठरतो. कदाचित अशा प्रयत्नांमुळे येत्या काही वर्षांमध्ये ‘चक दे इंडिया’ मधल्या मॉली, मेरीला, ‘अपने ही देश में मेहमान कहा जाये तो आपको कैसा लगेगा?’ हा प्रश्न विचारायची गरज पडणार नाही.