साडेतीन महिने तालीम करूनही नाटक बसलं नव्हतं…
डॉ. मोहन आगाशे – नाट्यसंपन्न व्यक्तिमत्व
मराठी नाट्यसृष्टीला अनेक डॉक्टर मंडळींनी समृद्ध केलं आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू यांच्यापासून ते अगदी आताच्या डॉ. अमोल कोल्हेंपर्यंत. या मांदियाळीतील आणखी एक कर्तृत्वसंपन्न नाव म्हणजे डॉ. मोहन आगाशे. एकीकडे मनाचा गुंता आपल्या मानसशास्त्रीय ज्ञानाने सोडवतानाच त्यांच्या अनेक नाटकातील अजरामर भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. आज डॉ. मोहन आगाशे यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या नाट्यकारकीर्दीकडे पुन्हा एकवार नजर टाकुया.
डॉ. मोहन आगाशे म्हटलं की अशी पाखरे येती, महानिर्वाण, बेगम बर्वे, सावर रे, काटकोन त्रिकोण अशा दर्जेदार नाटकांची यादीच समोर तरळते पण त्यापलीकडे उत्तम कलाकार अशी एक अजरामर भूमिका जगतो जी त्याची ओळख बनून जाते. डॉ. आगाशेंची अशी भूमिका म्हणजे बहुचर्चित “घाशीराम कोतवाल” नाटकातील नाना. हे भूमिका ते ख-या अर्थाने जगले कारण १९७२ ते १९९२ तब्बल २० वर्षं डॉ. आगाशेंनी नाना साकारला. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर २० वर्षं त्यांनी या भूमिकेशी संसार केला. ही भूमिका साकारण्याआधी त्यांचा नाट्यप्रवास कसा आकाराला आला ते पाहू.
शालेय वयात डॉक्टरांची सई परांजपे यांच्याशी ओळख झाली. सई परांजपे यांच्या ‘चिल्ड्रन थिएटर’ या संस्थेसाठी काही नाटकांत त्यांनी कामही केलं. त्यानंतर मेडीकलचं शिक्षण घेत असताना डॉ. जब्बार पटेल यांच्याशी परिचय झाला आणि एक वेगळंच विश्व डॉक्टरांसमोर खुलं झालं. नाटक सिनेमावरच्या चर्चा, वाचन यांनी या क्षेत्राविषयीची डॉक्टरांची समज घडत गेली. आणि त्या दरम्यान ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक डॉक्टरांच्या जीवनात आलं. हे नाटक डॉक्टरांच्याच आयुष्यात नाही तर मराठी रंगभूमीवरही विलक्षण बदलाची नांदी ठरलं.
घाशीराम कोतवालच्या जवळपास साडेतीन महिने तालमी झाल्या. तरीही आदल्या दिवसापर्यंत नाटक बसलं नव्हतं. नाटकाची शेवटची २० मिनीटे तर नाटकाच्या आदल्या रात्री बारा ते अडीच या वेळेत बसवली गेली. हे नाटक म्हणजे एक सांगितिका होती. कलाकारांच्या नृत्यातून नाटकात एक झुलता पडदाच तयार होत असे. या नाटकाचं नमन खास गाजलं. या नमनाची तालीमही एक महिना चालली होती. आणि त्यानंतर जे काही रंगमंचावर साकारले तो इतिहास होता. नानांची भूमिका, त्यातली लयबद्ध नृत्यं, गीतं हे सगळं पुढे नाट्यविद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरले. घाशीराम कोतवाल हे नाटक मराठीतले नाट्यविद्यापीठ म्हणता येईल.
डॉ. आगाशे यांच्या नाटकांप्रमाणेच चित्रपटातील भूमिका देखील वेगळ्या ठरल्या. नुसती सिनेमांची नावं जरी वाचली तरी ते लक्षात येतं. मराठीतील सामना, सिंहासन, जैत रे जैत, एक होता विदूषक, देवराई, कथा दोन गणपतरावांची, कायद्याचे बोला, वळू, विहीर, निशाणी डावा अंगठा, देऊळ हे चित्रपट असोत किंवा हिंदीतील निशांत, मंथन, भूमिका, गांधी, मशाल, मिसीसीपी मसाला. या सर्व चित्रपटांचा स्वत:चा एक दर्जा आहे आणि त्यात डॉ. मोहन आगाशे यांनी आपला ठसा निर्माण केलेला दिसतो.
सर्वसामान्य जीवनात वावरताना त्यांची ती विशिष्ट नेपाळी टोपी आणि खर्ज आवाज एक व्यक्तिमत्व उभं करतात. त्यापलिकडे अभिनयाचा विचार करता, घाशीराम कोतवाल मधल्या बावनखणीतला रंगेल नाना असो किंवा ‘जैत रे जैत’ मधला इरेला पेटलेला नाग्या किंवा ‘वळु’ मधला इरसाल सरपंच; डॉक्टरांच्या भूमिकांचा लंबक लांबच लांब हेलकावे खातो. शहरी ग्रामीण असा भेद न उरता प्रेक्षकांना दिसत रहातो तो निखळ अभिनय.
वैविध्यपूर्ण आणि पठडीबाहेरच्या भूमिकांनी मराठी सिने-नाट्य सृष्टीला संपन्न करणा-या डॉक्टरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!