‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कसं असेल ‘ब्रेथ’च ब्रेथ टेकिंग थरारनाट्य?
ब्रेथ २: डळमळीत वाहणारं थरारनाट्य
ऑनलाईन ॲप : अमेझॉन प्राईम
कलाकार : अभिषेक बच्चन, नित्य मेनन, अमित सढ, हृषीकेश जोशी, इव्हाना कौर, श्रीकांत वर्मा, प्लाबिता बोर्थाकुर, सैयामी खेर, श्रद्धा कौर, रेशम श्रीवर्धन आणि इतर
सारांश : मुखवट्याआड लपलेला चेहरा उलगडल्यावर सिरीजचं कथानक डळमळीत होतं आणि मग थरारनाट्याचा धागा सैल पडत जातो.
२००० मध्ये ‘अभिषेक बच्चन’ हे नाव बॉलीवूडमध्ये आलं तेव्हा ‘नेपोटीझम’, ‘घराणेशाही’ या चर्चांचा बॉलीवूडक्षेत्राला स्पर्शही झाला नव्हता. तो आला तेच मुळी ‘अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा’ या ओझ्यानिशी. आज IMDB वेबसाईटनुसार ६६ क्रेडीट आपल्या नावावर नोंदवलेला अभिषेक बच्चन जेव्हा OTT माध्यमावर येणार हे नक्की झालं, तेव्हा उत्सुकता शिगेला पोहचली होती. या लॉकडाऊनच्या काळात एकीकडे बच्चन कुटुंबीयांना झालेल्या करोनाच्या लागणीची चर्चा आहे तिथेच ब्रेथच्या दुसऱ्या पर्वाचीही तितकीच चर्चा आहे.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मनमर्झिया’ हा अभिषेक बच्चनचा शेवटचा सिनेमा. त्यानंतर दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पडद्यावर आलेला त्याचा हा अवतार प्रेक्षकांना नक्कीच थक्क करतो. या सिरीजचं कथानक अभिषेक, नित्या मेनन आणि अमित सढच्या पात्रांभोवती फिरतं. पण सगळ्यात भाव खाऊन जातो तो अभिषेक बच्चन. आपल्या एरवीच्या शैलीपेक्षा वेगळी भूमिका करण्याची ही संधी त्याने चुकवली नाही. त्यामुळे बारा भागांची ही सिरीज त्याच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का बनून राहते. पण असं असूनही दुसरं पर्व मात्र सिरीजच्या चाहत्यांची निराशा करतं. पहिल्या पर्वात आर. माधवन आणि अमित सढची जुगलबंदी आणि उत्कंठावर्धक कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ती किमया पुन्हा साधण्यात दुसरं पर्व मात्र काही प्रमाणात अपयशी ठरत.
‘ब्रेथ’ सिरीजच्या कथानकाचा मुख्य साचा आहे चोरपोलिसाच्या पाठशिवणीच्या खेळाचा. अमित सढने साकारलेला पोलीस अधिकारी कबीर सावंत हा या दोन्ही पर्वांचा मुख्य दुवा आहे. एक अत्यंत हुशार आणि तीक्ष्ण नजरेच्या कबीरचा रागिट स्वभाव ही त्याची दुखरी बाजू असते. या रागिटपणामुळे एकेदिवशी गुन्हेगाराचा पाठलाग करताना अनावधानाने मेघनाचा अपघात होतो आणि तिला अपंगत्व येतं. या चुकीची शिक्षा म्हणून सहा महिन्यांचा कारावास कबीरला भोगावा लागतो. तुरुंगातून सुटून आल्यावर तो पत्रकारांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आणि मेघनाची माफी मागण्याच्या निमित्ताने दिल्लीत बदली करून घेतो.
इथे दिल्लीमध्ये दरम्यानच्या काळामध्ये मानसोपचारतज्ञ अविनाश सब्रवाल आणि शेफ आभा सब्रवाल यांची मुलगी सियाचं अपहरण होतं. नऊ महिने झाले तरी अपहरणकर्त्याने खंडणीसाठी संपर्क साधला नाही यामुळे अविनाश, आभा आणि पोलीसखात चिंतेत असतं. त्यात सिया मधुमेहाची रुग्ण असल्याने तिला दिवसातून चारवेळा इन्सुलिनचं इंजेक्शन टोचायची गरज असते. अपहरणकर्त्याच्या हलगर्जीपणामुळे सियाचा मृत्यू तर झालेला नाही ना? ही भीतीही त्यांना सतावत असते.
अशावेळी अचानकपणे एकेदिवशी घरी एक कुरियर येतं. त्यात सिया सुखरूप हवी असल्यास अविनाश आणि आभाला अपहरणकर्त्याचे एक काम करायचे असते. ते म्हणजे त्याने सांगितलेल्या माणसाचा खून… पापभिरू अविनाश आणि आभा आपल्या मुलीला वाचविण्यासाठी हे काम करतील का? की पोलिसांच्या मदतीने गुन्हेगाराला शोधतील? याचा उलगडा सिरीजमध्ये होतो. त्याचवेळी दिल्लीत आलेला कबीरही वेगळ्याच मार्गाने या केसशी जुळला जातो आणि कथानकाची रंगत वाढली जाते.
सिरीजमध्ये अविनाशचं मनोसोपचारतज्ञ असणं म्हणजे सिरीजचा ओघ मनोवैद्यानिक विषयाकडे असणार हे ओघाने येतच. त्याला पुराणातील रावणाच्या तत्वज्ञानाची जोड दिल्यामुळे त्याला नष्ट करायला राम येणार हे सहाजिकच होतं. पण सिरीजमधला राम कबीर की अविनाश की आभा? या प्रश्नाचा गुंता प्रेक्षक म्हणून आपण सोडवत असताना कथानक एक वेगळाच धक्का देत आणि आपण त्यात गुंततो. पण नेमक तिथूनच कथानकची दोरी सैल पडायला सुरु होते आणि त्यापुढे कथानकात वेगळेपण राहत नाही. मुळात इथपासून दिग्दर्शकाने कथानकाला वेग दिला असता तर कदाचित हे टाळता आलं असतं पण त्याऐवजी कथानक कबीर आणि मेघना, प्रकाश आणि वृषाली यांच्या गोष्टीमध्ये वाजवीपेक्षा अधिक वेळ वाया घालवत आणि मूळ विषय बाजूला राहतो.
पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वामध्ये तगडी स्टारकास्ट असणं या सिरीजची जमेची बाजू आहे. आणि अभिषेक, अमित, नित्या, हृषिकेश जोशी, प्लाबिता ही जबाबदारी अगदी योग्यरीतीने बजावतात. विशेषतः अभिषेक बच्चन आणि अमित सढमधील महत्त्वाचे क्षण प्रेक्षकांसाठी मेजवानीचं ठरतात. मुख्य म्हणजे सिरीज या दोघांभोवती फिरत असली तरी यातील स्त्रीपात्रांनासुद्धा तितक्याच सशक्त भूमिका देण्याची जबाबदारी दिग्दर्शकाने आणि लेखकाने निभावली आहे. आभाची आई म्हणून खचलेली बाजू पण नवऱ्याच्या मागे तितक्याच खंबीरपणे उभी राहणारी बायको, कबिरच्या येण्याने खात्यातील आपलं डळमळीत होणारं स्थान वाचविण्याच्या धडपडीत असेली झेबा, कबीरच्या चुकीमुळे अपंगत्व येऊनही मनात कोणताही राग न ठेवता आयुष्याला नव्या जोमाने सामोरी जाणारी मेघना या मुख्य पात्रांशिवायही सियाची लहान बहिणीप्रमाणे काळजी घेणारी गायत्री, वेश्याव्यवसायात असूनही मानाने वागणारी शर्ली, समलिंगी लेखक नताशा अशी कित्येक छोटी स्त्रीपात्रेही सिरीजमध्ये सुरेख रंगवलेली आहेत. पर्वाच्या अखेरीस कथानक नव्या पर्वाची चाहूल देताना C-16 चं एक वेगळ कोडं प्रेक्षकांसमोर ठेवतं. हे कोडं सोडवायचा प्रयत्न इंटरनेटच्या मायाजालमध्ये सगळेच करत आहेत. तुम्हाला याचं उत्तर मिळालं तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.