मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल..
गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल, हा जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 12 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. भारतीय वायु सेनेमधील पहिल्या महिला अधिकारी फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या शौर्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे ट्रेलर बघून जान्हवी कपूरच्या अभिनयाचे खुद्द गुंजन सक्सेना यांनीही कौतुक केले आहे.
गुंजन सक्सेना या चित्रपटातील एक गाणे नुकतेच रिलीज झाले असून त्याला सोशल मिडीयावर चांगलेच लाईक मिळत आहेत. डोरी टूट गईयां…कौसर मुनीर यांनी लिहिलेल्या गाण्याला रेखा भारद्वाज यांचा आवाज आहे.
26 डिसेंबर 2018 रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. 13 मार्च 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या आक्रमणाचा फटका बसल्याने आता 12 रोजी नेटफ्लिक्सवर चित्रपट प्रदर्शित होत आहे. यात जान्हवी कपूर गुंजन सक्सेनाच्या भूमिकेत आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी वडीलांच्या भूमिकेत आणि अंगद बेदी भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शरण शर्मा आहेत. निखिल मल्होत्रा आणि शरण शर्मा यांनी या बायोपिकचे संवाद लिहिले आहेत.
गुंजन सक्सेना यांचा कारगील गर्ल म्हणून गौरव करण्यात येतो. कारगील युद्धात गुंजन यांनी अनेक सैनिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या शौर्याला सलाम म्हणून त्यांचा शौर्य चक्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. गुंजन सक्सेना यांचा जन्म 1975 रोजी एका सेना अधिका-याच्या घरात झाला. गुंजन यांचे वडील भारतीय वायु सेनेमध्ये होते. गुंजन यांचा मोठा भाऊही भारतीय वायु सेनेमध्ये दाखल झाला. साहजीकच गुंजन यांनाही भारतीय वायुसेनेमध्ये पायलट म्हणून स्थान मिळवायचं होतं. हे त्यांचं स्वप्न साकार करतांना खूप अडथळे आले. मुख्य म्हणजे महिलांविषयक दृष्टीकोन बदलतांना आला. तो सगळा प्रवास या बोयोपिक मध्ये आहे.
दिल्लीमधील हंसराज कॉलेज मधून पदवी घेतल्यावर गुंजन यांनी दिल्ली फ्लाईंग क्लब जॉईन केला. त्याच दरम्यान भारतीय वायु सेनेमध्ये महिला पायलट भरती जाहीर झाली. गुंजन यांनी आवश्यक अशा सर्व परीक्षा दिल्या आणि त्या वायुसेनेमध्ये पायलट म्हणून दाखल झाल्या. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना या वायुसेनेमध्ये दाखल झालेल्या महिलांच्या पहिल्या बॅचच्या अधिकारी ठरल्या. 1994 मध्ये त्यांच्यासोबत अन्य 25 महिला वायुसेनेत दाखल झाल्या. त्यातील गुंजन या पहिल्या महिला अधिकारी आहेत, की ज्यांनी थेट युद्धात भाग घेतला. त्यावेळी महिलांना युद्धकाळात वॉरझोन मध्ये जाण्यास आणि फायटर विमान उडवण्याची परवानगी नव्हती.
1999 च्या कारगील युद्धादरम्यान 25 वर्षीय गुंजन या उधमपूर, जम्मू काश्मिर तळावर नियुक्त होत्या. त्यांनी कॉम्बेट झोन मध्ये चीता हॅलिकॉप्टर उडवले आणि भारतीय जवानांना मदत केली. गुंजन यांचे वडीलही यावेळी वायुसेनेमध्ये कार्यरत होते. त्यांच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट ठरली. गुंजन ज्या भागात कामगिरीवर होत्या तिथे पाकिस्तानी सैन्याकडून जबरदस्त गोळीबारी होत होती. एकवेळ गुंजन यांच्या विमानावर मिसाईलही सोडण्यात आलं. पण गुंजन यांनी आपल्याला आणि विमानालाही वाचवलं. 13 हजार फूट उंचीवर असलेल्या हॅलीपॅडवर गुंजन अत्यंत सफाईदारपणे आपल्या हॅलिकॉप्टरला लॅंड करीत असत. वीस दिवसात गुंजन यांनी अनेकवेळा आपल्या जखमी सैनिकांना वाचवलंच पण त्यांना वेळीच औषधे आणि आवश्यक वस्तूही पोहचवल्या. गुंजन सक्सेना यांच्यासोबत तेव्हा विद्या राजन नावाची पायलट सहकारी होती. या शौर्यामुळे गुंजन यांचा शौर्य चक्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार पहिल्यांदाच एका महिलेला देण्यात आला.
कारगील युद्धात महत्त्वपूर्ण कामगीरी करणा-या गुंजन 2004 मध्ये चॉपर पायलट म्हणून निवृत्त झाल्या. त्यांच्यावर आता गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल नावाची बायपीक येत आहे. जान्हवी कपूरचा हा दुसरा चित्रपट. धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दाखल झालेल्या जान्हवी कपूरला गुंजन सक्सेना…मधून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे श्रीदेवी यांचा 13 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. आपल्या आईला मीस करणारी जान्हवी या चित्रपटाती भूमिकेतून आईला गिफ्ट देणार आहे. आता 12 ऑगस्टला जान्हवीनं फ्लाईट ऑफीसरच्या भूमिकेत किती रंग भरलेत हे स्पष्ट होईलच…
-सई बने