‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ती एक चांदनी…
जो उनकी ऑंखों से बयां होते हैं,
वो लफ्ज शायरी में कहाँ होते हैं..
ही शायरी म्हटल्यावर फक्त एका अभिनेत्रीचं नाव समोर येतं… ते म्हणजे श्रीदेवी. टपो-या डोळ्यात काजळ भरलेली श्री पडद्यावर आली की थेअटर दणाणून जायचं. नंतरचा सगळा चित्रपट ही टपो-या डोळ्यांची श्री आपल्या ताब्यात घ्यायची. तिचा अप्रतिम अभिनय, डोळ्याचे आणि चेह-यावरचे बोलके भाव आणि तिचं नृत्य कौशल्य यावर प्रेक्षक भारावून जायचे. बॉलिवडूच्या या पहिल्या आणि बहुदा एकट्या महिला सुपरस्टारनं सर्वाधिक दुहेरी भूमिका केल्या. यावरुनच श्रीदेवीची पडद्यावरची हुकमत लक्षात येते. ही चांदणी अचानक गायब झाली, पण तरीही ती कायम आठवणीत आहे. 13 ऑगस्ट रोजी श्रीदेवीचा वाढदिवस. आज श्री आपल्यात असती तर 57 वर्षाची असती. जितेंद्र, अमिताभ, रजनीकांत, कमल हासन, अनिल कपूर सारख्या अभिनेत्यांबरोबर काम करतांना त्यांच्या एवढेच मानधन आणि भूमिका मिळवणारी ही अभिनेत्री सक्षम महिला अभिनेत्रीचं प्रतिक होती.
श्रीदेवीचे आई वडील हे तेलगू आणि तामिळ, दोघांचाही प्रेमविवाह. वकील असलेल्या श्रीच्या वडीलांकडे तिची आई एका केसबाबत गेली, दोघंही प्रेमात पडले आणि लग्न झाले. श्रीदेवीच्या आईनं काही चित्रपटात भूमिका केली होती. त्यांना दोन मुली झाल्या, श्रीलता आणि श्रीदेवी. त्यापैकी टप्पोरो डोळे, गोल आणि बोलक्या चेह-याची श्रीदेवी अवघ्या चार वर्षाची होती, तेव्हाच मोठ्या पडद्यावर आली. 1971 मध्ये मल्याळम चित्रपट पूमबत्ता या चित्रपटात या छोट्या श्रीनं प्रेक्षकांना मोहात पाडलं. तिला त्यावर्षाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड भाषिक चित्रपटात श्रीदेवीनं आपल्या नावाचा आणि अभिनयाचा ठसा उमटवला. 1975 मध्ये ज्युली या हिंदी चित्रपटात तिनं बालकलाकाराची भूमिका केली. 1976 मध्ये श्रीदेवीच्या करीअरला खरी सुरुवात झाली. प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक के बालचंद्रन यांनी तिला मूंदरू मुदिचू या चित्रपटासाठी साईन केलं. या चित्रपटात नवखी श्री दोन दिग्गज अभिनेत्यांसमोर उभी रहाणार होती. ते अभिनेते म्हणजे रजनीकांत आणि कमल हसन. के बालचंद्रन यांची नजर पारखी होती. श्री नवखी होती, पण परिपूर्ण अभिनेत्री होती. या दोन जाणत्या अभिनेत्यांसमोर ती तेवढ्याच सक्षमपणे उभी राहीली. 1979 मध्ये श्रीदेवी सोलवां सावन द्वारे हिंदीमध्ये आली. या चित्रपटात तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. पण आणखी एक साऊथ सुंदरी हा शिक्का तिच्यावर बसला. साऊथच्या वळणाची हिंदी बोलणारी अभिनेत्री एवढाच तिचा उल्लेख झाला. पण 1983 मध्ये आलेल्या हिम्मतवालामधून श्रीदेवीची खरी ओळख बॉलिवूडला झाली. जितेंद्रच्या सोबतीनं नैनो में सपना म्हणत नृत्य करणा-या श्रीदेवीचा हिम्मतवाला पहिला हिंदीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. नंतर बॉलिवूड श्रीदेवीमय झालं. तोहफा या तिच्या चित्रपटानं रेकॉर्डतोड कमाई केली.
चुलबुली, नृत्यात पारंगत असणारी श्री, कमलहसन सोबत सदमा चित्रपटात आली. या चित्रपटानं तिला पहिला फिल्मफेअर मिळवून दिला. सदमातील तिचा अभिनय पाहून समिक्षकांनी तिच्यावर रकानेच्या रकाने लेख लिहिले. या चित्रपटापासूनच श्रीदेवीनं आपल्या मानधनात वाढ केली. पुरुष कलाकारांसारखं, काहीवेळा त्यांच्याही अधिक मानधन ती घेत होती. काहीजण याला श्रीची दादागिरी म्हणत. पण श्रीदेवी अभिनयातलं परिपूर्ण नाणं ठरलं. एकाच चित्रपटात दोन टोकाच्या दूहेरी भूमिका कराव्यात तर तिनंच. त्यामुळे ती म्हणेल तो शब्द अंतिम असायचा. अमिताभ बच्च्नसोबत काम करतांनाही अटी ठेवणारी श्रीदेवी ही पहिली आणि एकमात्र अभिनेत्री होती. खुदागवाह मध्ये श्री ची दुहेरी भूमिका होती.
नगिनामध्ये तिच्या मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा… या नृत्याची अनेक तरुणी कॉपी करु लागल्या. कर्मा, जांबाज, मिस्टर इंडीया, मकसद, मास्टर जी, आखिरी रास्ता, भगवान दादा, औलाद, हिम्मत और मेहनत, सोने पे सुहागा असे अनेक हीट चित्रपट तिच्या नावावर जमा झाले. दुहेरी भूमिकांमध्ये तर श्रीदेवीचा हात कोणी धरला नाही. चालबाज तर तिच्यासाठी अनेकवेळा बघितला गेला. यशराज फिल्मची श्रीदेवी ही लाडकी अभिनेत्री. तिला चांदनी हे नाव यशराजच्या चांदनी चित्रपटातूनच मिळाले. मेरे हाथों में नौ नौं चुडीयॉं है… या तिच्या नृत्यावर आजही तरुणी तिने केलेल्या नृत्याची कॉपी करतात. तिच कथा लम्हेमधली तिच्या नृत्याची. लम्हे साठी श्रीदेवीला दुसरा फिल्मफेअर मिळाला.
श्रीदेवी बॉलिवूडमध्ये अशा स्थानी होती की जिथे दुसरी कुठलीही अभिनेत्री तिला टक्कर देऊ शकत नव्हती. त्याचवेळी तिच्या आयुष्यात वादंग सुरु झाले. मिथूनदा अर्थात मिथून चक्रवर्ती यांच्याबरोबर तिचं नाव जोडलं गेलं. या दोघांनी मंदिरात लग्न केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होऊ लागल्या. मिथून चक्रवर्ती यांचे पहिले लग्न झाले होते. त्यांची पत्नी योगिता बाली आणि त्यांच्यात यावरुन वाद होऊ लागले. शेवटी मिथूनदा यांनी मि़डीयासमोर येऊन श्रीदेवीसोबत आपलं कुठलंही नातं नाही याची कबूली दिला. श्रीदेवीच्या आयुष्याला या घटनेनं कलाटणी मिळाली. ती अतिशय हळवी झाली. याचवेळी तिच्या आयुष्यात बोनी कपूर यांची एन्ट्री झाली. बोनी कपूर यांचेही पहिले लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं होती. शिवाय त्या दोघांच्या वयातही मोठी तफावत होती. त्यामुळे त्यांच्यात वाढत असलेल्या नात्याला श्रीदेवीच्या आईचा विरोध होता. श्रीदेवी मात्र आता कोणाचंही ऐकत नव्हती. तिनं आणि बोनी कपूर यांनी 1996 मध्ये लग्न केलं. तिच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला. टॉपवर असतांना लग्न केल्यामुळे तिच्या करीअरवर परिणाम होणार होता पण श्रीनं याचा विचार केला नाही. लग्नानंतर ती अगदी साधी गृहिणी झाली. बोनी कपूर यांच्यासोबत तिचा संसार सुरु झाला. तिनं मोठ्या पडद्याला काही काळ दूर ठेवलं. जान्हवी आणि खुशी या दोन मुली तिला झाल्या. आपल्या मुलींसह ती संसारात रमली. त्रयस्त होऊन या तिच्या निर्णयाकडे बघितलं तर श्रीदेवीची जबर इच्छाशक्ती किती मजबूत होती याची कल्पना येईल. एकेकाळी बॉलिवूडला आपल्या इशा-यावर नाचवणारी ही अभिनेत्री या चंदेरी दुनियेपासून सहज वेगळी झाली. एक पत्नी, एक आई म्हणून ती तेवढ्याच सहजतेनं वावरत होती.
दरम्यान काही टिव्ही शो मध्ये श्रीदेवी दिसायची, अजूनही ती चर्चेत होती. वय झालं तरी तिच्यात काही बदल दिसत नव्हता, उलट वाढत्या वयाबरोबर श्री अधिक खुलली होती. तिच्या फिटनेसची चर्चाच अधिक होत होती. 2012 मध्ये गौरी शिंदे यांचा इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट आला. शशी या एका गृहिणीची भूमिका श्रीदेवीनं केली. ती जणू तिचीच भूमिका होती, एका महिलेची ताकद त्यात होती. पुन्हा एकदा श्री आणि तीचं नृत्य यांची चर्चा सुरु झाली… नवराई माझी लाडाची गं आवड हिला चंद्राची गं… खास श्रीदेवी स्टाईल ठुमक्यांनी हे गाणं कायम लक्षात रहाण्यासारखं झालं.
त्यानंतर श्री, मॉम मध्ये आईच्या भूमिकेत दिसली. शहारुखच्या झिरोमध्येही श्री काम करत होती. सोबत आपल्या मोठ्या मुलीच्या, जान्हवीच्या एन्ट्रींसाठी ती मेहनत घेत होती. सर्व काही सुरुळीत असतांना या चांदनीनं अचानक एक्झीट घेतली. श्रीदेवीचा मृत्यू. ही एक ओळ टिव्ही चॅनलवर झळकली आणि तिच्या तमाम चाहत्यांना मोठा धक्का बसला. एका घरगुती समारंभासाठी दुबईत गेलेल्या श्रीदेवीचा बाथटबमध्ये मृत्यू झाला. तेव्हा तिचं वय होतं अवघं 54. श्रीदेवीची ही एक्झीट खूपच धक्कादायक होती. तिच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा झाल्या. मृत्यू की खून अशाही चर्चा होत्याच, पण त्यांनी ही चांदनी पुन्हा चमकणार नव्हती… ती शांत झाली होती. असेच अनेक प्रश्न मागे सोडून तिच्या या एक्झीटवर अनेक चाहत्यांनी आपले दुःख व्यक्त केले. त्यापैकीच एकाची प्रतिक्रीया अत्यंत बोलकी होती.
माना कि तेरे हाथ में है डोर जिंदगी की, है खुदा
पर ये क्या…जिसको दिल किया पास बुला लिया
चॉंदनी आसमान के चॉंद की कम पड गयी थी क्या
जो जमी की चांदनी को वहॉं बुला लिया….
सई बने