नवा गडी अन् राज्य नवं…
एखादया नाटकासाठी एखादे गीत लिहिलं जातं. पुढे त्या नाटकाचा चित्रपट होतो. नाटक असो किंवा चित्रपट, दोन्ही माध्यमांसाठी गीतकार, गायक, संगीतकार आणि गायिका अशी टीम तीच असते. असं घडलं होतं , ‘टाइम प्लिज -गोष्ट लग्नांनंतरची’ या चित्रपटाच्या बाबतीत. हा चित्रपट म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकाचे माध्यमांतर होते. हे नाटक क्षितिज पटवर्धन याने लिहिले होते आणि या नाटकाचे संगीत देण्याची जबाबदारी ऋषिकेश कामेरकर या गायक आणि संगीतकारावर सोपवण्यात आली.
या नाटकाचे शीर्षकगीत असावं, असं ठरलं आणि मग क्षितिज पटवर्धन याने शब्द लिहिले,
“नात्यांच्या बंधात रेशमी ,खेळ मनाचा रंगे
डाव नवा ,आकारा येई नव्या भिडूच्या संगे ‘
जुळता हृदयीचे सूर , उमगते आनंदाची ठेव
स्वप्नांच्या आकाशी प्रीतीचं इंद्रधनू उमलावे
नवा गडी अन राज्य नवं “
या ओळींना संगीत ऋषिकेश कामेरकर याने दिले आणि हे गीत ऋषिकेश आणि नेहा राजपाल यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित केले. या नाटकासाठी ऋषिकेश कामेरकर याला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राज्य शासन पुरस्कार देखील मिळाला होता.
पुढे काही प्रयोगानंतर ‘नवा गडी नवं राज्य ‘ हे नाटक दुसऱ्या निर्मिती संस्थेतर्फे रंगभूमीवर आले. तेव्हा या शीर्षक गीताचे शब्द तेच ठेवले ,पण ऋषिकेश कामेरकर याने गाण्याची चाल बदलली आणि गाण्याचे ऑर्केस्ट्रेशन देखील बदलले. ऋषिकेश आणि नेहा यांनीच ते गायले होते. जेव्हा त्याच कथानकावर आधारित ‘टाइम प्लिज -गोष्ट लग्नानंतरची ‘ हा चित्रपट करायचे ठरले, तेव्हा या गीतासाठी आणखी एक कडवे लिहिले गेले. ऋषिकेश कामेरकर हाच संगीतकार होता. त्याने यावेळी गीताची चाल तीच ठेवली, पण पुन्हा एकदा गाण्याचे ऑर्केस्ट्रेशन बदलले.
नाटकाचे माध्यमांतर चित्रपटातून होताना गाण्याच्या ऑर्केस्ट्रेशन मध्ये बदल झाला. वरळी येथील एका स्टुडिओत या गाण्याचे ध्वनिमुद्रण अर्थातच ऋषिकेश आणि नेहा राजपाल यांच्या स्वरात झाले. यशराज स्टुडिओत गाण्याचे मिक्सिंग झाले. या गाण्यात उमेश कामत, प्रिया बापट, वंदना गुप्ते, सिद्धार्थ जाधव आदी कलाकारांवर चित्रित झालेली चित्रपटातील दृश्ये (मोंटाचेस) आहेत. या गाण्यासाठी देखील ऋषिकेशला संगीतकार आणि गायक या नात्याने खूप लोकप्रियता मिळाली.