केदार शिंदे झाले होते ‘मुख्याध्यापक’
शिक्षक दिन म्हटलं, की शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातल्या अनेक शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. कायम विद्यार्थी दशेत असणाऱ्या आपल्या आयुष्यात देखील अनेक शिक्षक येत असतात. एकाच बागेत विभिन्न रूप आणि रंगांची फुलं सजवणाऱ्या माळ्याप्रमाणे असतो तो शिक्षक! आपल्या व्यक्तिमत्वावर संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती आणि आदर असे पैलू पाडणारा असतो तो शिक्षक! लहानपणापासून आपण कळत-नकळतपणे घडत असतो ते शिक्षकांमुळेच..
हे सांगण्याचं कारण म्हणजे आज ५ सप्टेंबर.. म्हणजेच शिक्षक दिन ! त्यानिमित्ताने कलाकृती मीडियाच्या माध्यमातून मराठीतील प्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे यांच्या शिक्षकांबद्दलच्या आठवणींना दिलेला हा शब्दरूपी उजाळा…
प्रसिद्ध सिने – नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते केदार शिंदे यांनी मराठी भाषेत अनेक नाटके, मालिका व चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. कॉमेडीचा तडका देण्याच्या त्यांच्या शैलीला समस्त चित्रपटप्रेमींनी डोक्यावर घेतले. लहान वयापासून आई-वडिलांसोबतच त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांचा त्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे, असे केदार शिंदे यांचे ठाम मत आहे. यांच्यावर शालेय जीवनातील दोन शिक्षकांचा अधिक प्रभाव होता.
केदार शिंदे यांची शाळा म्हणजे परळ येथील आर. एम. भट. स्कूल. या शाळेत डिमेलो आडनावाचे एक शिक्षक होते. आता डिमेलो आडनाव आणि मराठीचा दूरदूरचा तरी संबंध वाटतो का? पण ख्रिश्चन धर्मीय असूनही अस्खलित मराठीचे धडे त्यांनी केदार शिंदे यांना दिले. ‘डिमेलो सरांमुळे अभिनय क्षेत्रातील माझं मराठी घडवण्याची तयारी झाली. आजही माझ्या प्रत्येक कामाचं कौतुक करण्यासाठी त्यांनी दिलेल्या मराठी शुभेच्छा मला बळ देतात,’ असं केदार सर सांगतात.
शाळेत असताना एनसीसीच्या माध्यमातून केदार शिंदे यांना शिस्तीचे महत्व शिकवणारे सर म्हणजे विकास काटदरे. त्यावेळेस त्यांच्याबद्दल असणारा आदर, भीती यामुळेच आज त्यांची अधिक कमी जाणवते. या शिक्षकाचं अलीकडेच निधन झाल्याची दुःखद बातमी केदार शिंदे यांना मिळाली. परंतु त्यांनी शिकवलेली मूल्ये मात्र केदार सरांना कधीच कमी पडणार नाहीत, इतकी त्या शिक्षकाची महती!
केदार शिंदे यांनी आपल्या शाळेतला एक गमतीशीर, मात्र अभिमानास्पद प्रसंग सांगितला. इयत्ता नववीत असताना शाळेत ‘मंत्रिमंडळाची’ पद्धत होती. सर्व तुकड्यांमधून एकाला ‘मुख्यमंत्री’ केले जायचे. त्या वर्षी केदार शिंदे यांची निवड मुख्यमंत्र्यांच्या पदासाठी केली गेली. ५ सप्टेंबरच्या म्हणजेच शिक्षक दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्याला मुख्याध्यापकाचा पदभार सांभाळावा लागायचा. त्यामुळे शिंदे यांना चक्क मुख्याध्यापक होऊन संपूर्ण शाळा सांभाळायचा मान मिळाला..! अभ्यासात हुशार आणि कलांमध्ये कुशल असणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला अजून काय हवं !
चित्रपट सृष्टीतील यशामुळे केदार शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होताच, परंतु शिक्षकांकडून झालेल्या कौतुकाचा एक महत्त्वाचा प्रसंग इथे नमूद करावा वाटतो. एकदा केदार शिंदे यांना त्यांच्याच शाळेतील स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.. तेव्हा शाळेच्या छताखाली वाढून उभारी घेतलेल्या या डेरेदार वृक्षरुपी दिग्दर्शक आणि अभिनेत्याकडे पाहताना सर्व शिक्षकांचे ऊर भरून आले. केदार शिंदे यांच्यासाठी ही शब्दांविना मिळालेली लाखमोलाची पोचपावती होती!
विद्यार्थी जीवनातील शिक्षकांसोबतच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एक नवीन शिक्षक लाभत असतो. केदार शिंदे यांच्या आयुष्यातील असे सर्वाधिक महत्त्वाचे आणि जवळचे शिक्षक म्हणजे त्यांचे आजोबा माननीय ‘शाहीर साबळे!’ आजोबांनी केलेल्या संस्कारांचे काटेकोरपणे पालन करणारा हा खऱ्या अर्थाने ‘आदर्श नातू’! शाहीर साबळे यांच्या जयंतीनिमित्त केदार शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यामधून आजोबांनी केलेले खरे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘शाहीर’ नावाचा चरित्रपट काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
‘शिक्षकांशी बोलताना आम्ही कधीच नजरेला नजर मिळवायचो नाही. पूर्वीच्या काळी आम्हाला शिक्षकांचा लळा तर होताच, पण त्याचबरोबर आज लुप्त झालेला एक भीतीयुक्त आदर मनात असायचा..’, असे सांगत केदार शिंदे यांनी त्यांच्या मनातील गुरुजनांबद्दल असलेले आदरयुक्त प्रेम व्यक्त केले.
– सोनल सुर्वे