मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
बोल्ड आणि बिनधास्त राधिका आपटे
बॉलीवूडसह बंगाली, मराठी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमधून बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. मराठी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्क्रीनवरचा बोल्डनेस हे समीकरण जुळणे जरा कठीणच असते. पण ही तर ठरली पुण्याची मराठमोळी मुलगी! त्यामुळे आपल्याला हवं ते मिळवल्याशिवाय राधिका काही थांबायची नाही.
पुण्यात जन्मलेल्या राधिकाचे वडील चारुदत्त आपटे हे प्रतिष्ठित न्यूरोसर्जन. शिक्षणासाठी वडिलांचा भक्कम पाठिंबा! राधिकाने कंटेम्पररी डान्सचेही व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आहे. थिएटरपासून राधिकाला अभिनयाची आवड लागली. रंगमंचावरचा तिचा अभिनय पाहूनच तिला चित्रपटात काम करण्याची संधी चालून आली. २००५ च्या ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटात ती पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून झळकली. पण २०१५ या वर्षात दोन चित्रपटांमुळे ती चर्चेचा विषय ठरली. यातला पहिला चित्रपट म्हणजे बॉलिवूडचा ‘बदलापूर’, तर दुसरा चित्रपट म्हणजे मराठीतला बोल्ड सिनेमा ‘हंटर’! हंटरमुळे ही अभिनेत्री मराठी चित्रपटप्रेमींना चांगलीच भावली.
राधिका आपटे हिने अनेक मराठी नाटकांत आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये काम केले आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या वेबसीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून ती भविष्यातील सर्वाधिक मोठ्या प्रेक्षकवर्गाची आवडती अभिनेत्री ठरत आहे. ‘लेटेस्ट सेन्सेशन ऑफ बॉलिवूड’, ‘बॉलीवूडची न्यू गो टू गर्ल’, ‘न्यू कॉन्स्टंट इन इंडियन सिनेमा’ अशा अनेक उपमांनी तिला नावाजले जात आहे.
स्क्रीनवर बोल्ड भूमिका साकारणारी ही अभिनेत्री विचारांनी देखील कमालीची बोल्ड आहे. अभिनयासाठी पुण्याहून मुंबईला येताना तिला अनेकांनी विरोध केला. या इंडस्ट्रीमध्ये माझ्यावर बलात्कार होऊ शकतो, त्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये येऊ नये, असे अनेकांना वाटत असल्याचे मत राधिका आपटे हिने तरुणपणीच्या आठवणी सांगताना व्यक्त केले होते. इंडस्ट्रीमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक छळ याविरुद्ध ही अभिनेत्री नेहमी आवाज उठवताना दिसते. #मी टू या चळवळीला तिने जाहीर पाठिंबा दिला होता. आपल्या मनात जे आहे, ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, लोक काय म्हणतील या चौकटीपलीकडे जाऊन विचार करणे, हे गुण खरा बोल्डपणा सिद्ध करतात.
आपल्या बोल्ड आणि बिनधास्त शैलीने व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी तिची ओळख. सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चा रंगत असतात. इंस्टाग्रामवर तिला नेहमी ट्रोल केले जाते. ‘द वेडिंग गेस्ट’ या तिच्या चित्रपटातील व्हायरल झालेल्या एका सीन बद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘द वेडिंग गेस्ट चित्रपटात अनेक उत्तम सीन आहेत. पण या प्रकारचा सीन अश्लीलतेच्या नावाखाली आणि माझ्याच नावावर व्हायरल होणे दाखवून देते, की आपण एका विकृत मानसिकता असलेल्या समाजात राहतो’. अशा मोजक्या योग्य शब्दात तिने आपल्या स्क्रीनवरील अभिनयावर होणाऱ्या चुकीच्या टीकेला नेहमी प्रत्युत्तर दिले आहे.
अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने फार कमी कालावधीत सिनेसृष्टीत महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक चित्रपटांसोबतच ‘अ कॉल टू स्पाय’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात देखील तिने काम केले आहे. ‘नेटफ्लिक्सकरांची’ तर ती लाडकी अभिनेत्री आहे! या उत्तुंग भरारी घेणाऱ्या मराठी अभिनेत्रीचा आज वाढदिवस.
राधिका, भावी वाटचालीसाठी तुला कलाकृती मीडियातर्फे खूप खूप शुभेच्छा..!
-सोनल सुर्वे