जुन्या गाण्यांचा नवा नजराणा
आज पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील चांगल्या गीतकारांची नावे घ्यायची झाल्यास बहुतांशी पुरुषांचेच वर्चस्व असल्याचे जाणवते, परंतु पुरुष गायकांच्या या गर्दीत ठळकपणे आपले वेगळेपण आणि प्रभुत्व सिद्ध करणाऱ्या लता मंगेशकर आणि आशा भोसले या जोडीने गेली अनेक दशके श्रोत्यांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या आवाजाची श्रोत्यांना चढलेली नशा आजतागायत उतरली नाही… आणि उतरणार पण नाही! मंत्रमुग्ध करणाऱ्या पार्श्वगायनाने रसिकप्रेक्षकांमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस.
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. ‘फुलले रे क्षण माझे’ पासून ‘पिया तू अब तो आजा’ पर्यंतची नजाकत, ‘रेशमाच्या रेघांनी’ म्हणत दिलेला लावणीचा ठसका, राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘दिल चीज क्या है’ आणि कृतज्ञता ओसंडून वाहणारे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’… गळा तोच, आवाजही तोच, मात्र प्रत्येक गाण्यातील वैविध्य वाखाणण्याजोगे! त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमधील सुमारे १२००० गाणी गायली आहे!
मराठी हिंदी चित्रपट गीतांसहित नाट्यगीते, उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, गझल, लावण्या, वेस्टर्न गाणी, अन्य भाषिक गाणी गाणाऱ्या आशाताईंच्या आवाजाला कसलेच बंधन नाही. परंतु या चिरतरुण आणि चतुरस्त्र पार्श्वगायिकेच्या आवाजातील प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांतील काही गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलीच नाहीत.
त्यापैकी काही गाणी :
१. ‘तुमने लिखा मुझे जो प्यारा खत,महक उठी मेरी मोहब्बत,छाने लगा नशा नशा,मिली है खुशी… मिली है खुशी..’
१९८३ च्या ‘खुशी’ या चित्रपटातील हे गाणे. अमित कुमार आणि आशा भोसले या गायकांनी या गाण्याला चार चाँद लावले आहेत. चित्रपटासोबत गाणे ही प्रदर्शित व्हायचे रखडले, परंतु त्या गाण्याचे सारे हक्क आजही सारेगमकडे शाबूत आहेत.
२. ‘हा ये जिंदगी, क्या अजीब शेह है…’
अकेली’ या चित्रपटातील हे गाणे. हा चित्रपट कोणत्या वर्षी तयार झाला, याची माहिती उपलब्ध नाही. हे गाणे तयार करताना एक किस्सा घडला. या गाण्याचे संगीत ‘जितू आणि तपन’ या जोडीने आधीच तयार केले होते. म्हणजे झाले उलटेच! आता विनोद पांडे यांच्यावर चालीनुसार गाणे लिहिण्याची जबाबदारी होती. कालांतराने ठरल्याप्रमाणे गाणे तयार झाले आणि आशा भोसले यांच्या आवाजाने गाण्याला वेगळीच उंची मिळवून दिली.
३. ‘ले चल कहीं मुझको ए मेरी तन्हाई,डूबी हुई गम में है जिंदगी मेरी…’
१९८० च्या ‘रेश्मा ओ रेश्मा’ या चित्रपटातील आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे. आशाताईंच्या गोड गळ्यातून जाणवणारे एकाकीपणाचे भावही यात सुरेल भासतात..!
४. ‘मेझान’ हा १९७८ चा काही कारणास्तव प्रदर्शित न झालेला चित्रपट. यात आशा भोसले यांनी ३ गाणी गायली होती. ‘दिल है तेरा घर, गुस्सा हो कर, कोई दिल का हाल ना जाने…’ आज या काव्यपंक्तीव्यतिरिक्त काहीच उपलब्ध नाही, याचा खेद वाटतो. हरीहरन, अमित कुमार आणि आर डी बर्मन यांच्यासोबत आशाताईंनी गायलेली ही गाणी पडद्याआडच राहिली.
५. ‘फिर घटा छायी…’
लता मंगेशकर आणि आशा भोसले या बहिणींच्या आवाजातील, तरतरी देणारं एक सुंदर खेळकर गाणं.. १९६० च्या दशकात हे रेकॉर्ड केलं गेलं. लोकसंगीतातील प्रसिद्ध पहाडी रागातलं हे गीत ‘बहु बेगम’ किंवा ‘दूज का चांद’ या अप्रदर्शित चित्रपटातील असण्याची शक्यता आहे. १९८६ मधील लतादीदींच्या ‘तेरी आरझू’ या अल्बममध्ये ते समाविष्ट करण्यात आले. या गाण्याचे संगीत रोशनलाल नागरथ, तर शब्द साहिर लुधियानवी यांचे आहेत. आज स्पॉटीफाय सारख्या नव्या संगीतमंचावर सुद्धा हे गाणे ऐकायला मिळेल.
असे अनेक चित्रपट प्रदर्शित व्हायचे राहिले.. आणि त्यासोबत आशाताईंची गाणीदेखील! या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते… गिनीज बुकच्या माहितीनुसार आशा भोसले यांच्या नावे सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, फिल्मफेअर लाईफटाईम अवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या गोड गळ्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका ‘आशा भोसले’ यांना कलाकृती मीडियातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- सोनल सुर्वे