दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अभिनेत्री उमा यांचे नामकरण
उमा भेंडे म्हटले की आपल्याला आठवतात ते ‘थोरातांची कमळा’ , ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, मधुचंद्र, भालू , दैव जाणिले कुणी,अंतरीचा दिवा ,स्वयंवर झाले सीतेचे ,शेवटचा मालुसरा ,मल्हारी मार्तंड, काका मला वाचवा असे अनेक चित्रपट. या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या.
अभिनेत्री उमा यांचे खरे नाव अनुसूया साक्रीकर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे नाव ‘उमा कसे झाले? त्याचेही उत्तर तुम्हाला मिळेलच.
उमा म्हणजे अनुसूया यांच्या आईचे नाव रमाबाई. त्या ‘प्रभात’ सिनेमा कंपनीत छोट्या भूमिका करत होत्या, तर वडील श्रीकृष्ण साक्रीकर हे प्रसिद्ध नाट्यलेखक होते. ही अनुसूया कोल्हापूरच्या मेळ्यात नृत्य करायची. तिने अभिनेत्री व्हावे, ही तिच्या आई वडिलांची इच्छा होती. त्यांच्या आईने त्यांना भालजी पेंढारकर यांच्याकडे नेले आणि आपल्या मुलीने चित्रपटात काम करावे ही इच्छा व्यक्त केली.
‘आकाशगंगा’ नावाच्या चित्रपटात या अनुसूयेने सीतेची छोटीशी भूमिका केली, तेव्हा ही अनुसूया इयत्ता सातवीत होती.
‘अंतरीचा दिवा ‘ नावाच्या चित्रपटात अनुसूया साक्रीकर यांची भूमिका होती, चित्रपटाची जाहिरात झाली, पण या चित्रपटाच्या जाहिरातीत त्यांचे नावच नव्हते, त्या निराश झाल्या. तेव्हा त्यांनी निर्माते भालजी पेंढारकर यांना आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
भालजींनी त्या प्रसंगाचा उलगडा केला. या चित्रपटात ‘नवतारका उमा’ अशी जी जाहिरात केली होती, ती उमा म्हणजेच अनुसूया साक्रीकर… आणि हे नाव दिले होते लता मंगेशकर यांनी.
लतादीदींना अनुसूया हे नाव जुने वाटले होते आणि मग त्यांनीं काही नवे चिट्ठीत लिहून नावे त्यांचे दैवत ‘श्री मंगेशासमोर’ ठेवले. ती चिट्ठी भालजी यांच्या भाचीने उचलली आणि मग अनुसूया साक्रीकर ‘उमा’ झाली.
‘थोरातांची कमळा’ मधील उमा यांनी साकारलेली भूमिका खूप गाजली आणि मग त्यांना एकामागोमाग एक खूप कामे मिळाली. ऐतिहासिक चित्रपटांकरिता त्या ढाल, तलवार शिकल्या होत्या. भालजी पेंढारकर आणि राजा परांजपे हे त्यांचे गुरुस्थान होते.
‘भालू ‘ चित्रपट देखील खूप गाजला होता. त्यातील ‘गंध फुलांचा गेला सांगून’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गीत खूप लोकप्रिय झाले.
त्यांनी याच क्षेत्रातील प्रसिद्ध आणि टेक्स्टाईल डिझायनर असणारे प्रकाश भेंडे यांच्याशी विवाह केला.
१९७५ साली ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ मधील भूमिकेकरिता त्यांना राज्य शासनाचे अवॉर्ड मिळाले. त्यांनी ‘श्रीप्रसाद चित्र’ या बॅनरखाली ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आपण यांना पाहिलेत का?’, ‘आई थोर तुझे उपकार’ अशा चित्रपटांची निर्मिती केली.
आई थोर तुझे उपकार यात त्यांची शीर्षक भूमिका होती. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
त्यांचे व्यक्तिमत्व नावाप्रमाणे अगदी साधे होते. आजही त्यांनी काम केलेले चित्रपट आपल्याला त्यांची आठवण करून देत राहतील!