दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सात्विक,सोज्वळ आई : सुलोचनादीदी
नवरात्र म्हणजे नवदुर्गांचा जागर! यानिमित्ताने कलाकृतींमुळे मीडिया आपल्या वाचकांसमोर मांडणार आहे नवतारकांची कथा.. या नवतारकांना मालिका, चित्रपट या माध्यमांतून आपण पाहिलेच आहे. जाणून घेऊया नवतारकांची नवी कहाणी!
मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय सोज्ज्वळ आणि सात्विक आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुलोचना दीदी. ३० जुलै १९२८ हा त्यांचा जन्मदिवस. गेली अनेक दशके त्या या चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत .
तुम्हाला ‘वहिनीच्या बांगड्या’ हा चित्रपट आठवत असेल ,त्यातील शीर्षक भूमिका तुम्हाला आठवेल किंवा ‘एकटी’ चित्रपटात आपल्या मुलाची वाट बघणारी आई आठवेल किंवा ‘मराठा तितुका मेळवावा’ मधील जिजामातेची भूमिका आठवत असेल. या सर्व भूमिकांचे ज्या अभिनेत्रीने सोने केले, त्या आपल्या आदराचे स्थान असणाऱ्या सुलोचना दीदी.
त्यांचा जन्म नागपंचमीचा. त्यांच्या नेत्र सौंदर्यावरून त्यांचे नाव भालजी पेंढारकर यांनी ‘सुलोचना’ असं ठेवलं.
सुलोचना दीदी यांचे बालपण कोल्हापुरात गेले. भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरु. जयप्रभा स्टुडिओ मध्ये चित्रपटांच्या सुद्धा तालमी होत होत्या. भालजी पेंढारकर अतिशय शिस्तप्रिय होते. सकाळी नऊ वाजता स्टुडिओमध्ये प्रार्थनेसाठी सर्व एकत्र जमायचे आणि मग दिवसभराचं कामकाज सुरु व्हायचं. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटासाठी जिजामातेची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यासाठी त्यांनी तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे याचे प्रशिक्षण घेतले होते.
आपली ग्रामीण बोली शहरी किंवा प्रमाण मराठी होण्यासाठी त्यांनी भालजींचे मार्गदर्शन घेतले होते. भालजींनी त्यांना एक संस्कृत मासिक दिले होते. रोज ते मासिक मोठ्या आवाजात पूर्ण वाचायचे, असा उपाय भालजींनी त्यांना सांगितला. अशा प्रकारे उच्चारांवर त्यांनी मेहनत घेतली होती.
भालजींनी सुलोचनादीदींना आणि त्यांच्या सहकारी कलाकारांना चित्रपटाचे चित्रण सुरु असताना कोणत्या कलाकाराने काय पोशाख, काय दागिने परिधान केले आहे ते एका वहीत लिहून ठेवायला सांगितले होते.
ती सवय दीदींना हिंदी चित्रपटात काम करताना उपयोगी पडली.
कारण तिथे एक सीन आज चित्रित झाला आणि दुसऱ्या सीनला कधीकधी दोन महिने पण उलटून जायचे. वहीत ते बारकावे लिहिलेले असल्याने दुसरा सीन शूट होताना त्याचा उपयोग होई.
‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातील त्यांनी साकारलेली जिजामातेची भूमिका पाहून लतादीदींनी त्यांना मोत्याचा कंठा भेट दिला होता. प्रपंच ,धाकटी जाऊ ,एकटी ,साधी माणसं ,मोलकरीण ,मोठी माणसं अशा अनेक चित्रपटातून त्यांनी अनेक उत्तम भूमिका केल्या. ‘मोलकरीण ‘ चित्रपटातील त्यांचे कामही अविस्मरणीय आहे.
राज कपूर ,देवानंद ,अमिताभ ,शत्रुघ्न सिन्हा ,दिलीपकुमार अशा अनेक अभिनेत्यांबरोबर दिदींनी कामे केली,अनेकांची आई त्यांनी साकारली.
दीदींचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सर्व कलाकारांना खरोखरच आईप्रमाणे माया लावली. तो जिव्हाळा इतका होता की दीदी कोल्हापूरला गेल्या की कोणी त्यांना काय काय गोष्टी आणायला सांगायच्या. कोणी त्यांना चकल्या आणायला सांगायचे, तर कोणी कोल्हापुरी चपला. प्रत्येकाशी त्यांनी जिव्हाळ्याचे नातं जोडलं होतं .
दीदींची साधी ,सोज्वळ स्त्रीची इमेज इतकी मनात ठसली होती की ज्यावेळी ‘भाऊबीज ‘ चित्रपट त्यांनी मैनेची भूमिका केली आणि ‘खुलविते मेंदी माझा रंग गोरापान ग’ किंवा ‘चाळ माझ्या पायात’ सारख्या गीतांवर नृत्य केलं, तेव्हा अनेक जणांनी त्यांना सांगितले की तुंम्ही घरंदाज भूमिका करता, तेव्हा अशी लावण्यवतीची भूमिका पुन्हा करू नका. दीदींनी हे पाळलं आणि त्यानंतर असे नृत्याचे सीन्स असलेले चित्रपट त्यांनी स्वीकारले नाहीत .
त्यांच्या जीवनावर ‘सुलोचना ‘ हे पुस्तक देखील लिहिले आहे .
दीदींनी आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त मराठी तर अडीचशे हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या त्यामानकरी आहेत.आजही अनेक चित्रपट सोहळ्यांना त्या तरुण कलाकारांचे कौतुक करायला आवर्जून उपस्थित असतात.