‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
“जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नहीं”
हिंदी चित्रपटसृष्टीतला एक अत्यंत महत्वाचा सिनेमा, आजही लोकं हा सिनेमा आणि याच शेवट बघून ढसाढसा रडतात. पडद्यावर राजेश खन्ना जेंव्हा शेवटच्या घटका मोजत असतो तेंव्हा आपल्यातला कुणीतरी सोडून जातंय ही भावना आजही लोकांच्या मनात असते.
हा सिनेमा म्हणजे फक्त कलाकृती नाहीये, कित्येक सिनेरसिकांचं इमोशन आहे.
राजेश खन्ना तेंव्हा अक्षरशः यशाच्या शिखरावर विराजमान होता, तो ज्या प्रोजेक्टला हात लावेल त्याचं सोनं करत होता. आराधना, इत्तेफाक, कटी पतंग, सफर, खामोशी अशा कित्येक सिनेमांमुळे काका त्या काळातल्या तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला होता. त्याच्या स्टारडमचे किस्से आपण सगळ्यांनीच ऐकले असतील.
हेही वाचा : “बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही।”
आणि अशातच ऋषिकेश मुखर्जी ह्यांचा आनंद हा सिनेमा १९७१ ला रिलीज झाला. लोकांनी ह्या सिनेमाला सुद्धा तितकाच उदंड प्रतिसाद दिला, लोकं अक्षरशः रडून सुजलेल्या डोळ्यांनी थेटरच्या बाहेर येत होते, राजेश खन्ना हे नाव पुन्हा लोकांच्या तोंडी होतं. पण ह्या वेळेस आणखीन एक नाव लोकांच्या तोंडून ऐकू येत होतं, ते म्हणजे अमिताभ बच्चन.
बच्चन एराची पायाभरणी आनंद सिनेमाने केली असं म्हंटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
आनंद मध्ये मुख्य भूमिका राजेश खन्ना यांची असली तरी ऋषीदा ह्यांनी लिहिलेली भास्कर बॅनर्जी ही भूमिका सुद्धा चांगलीच ताकदीची होती. अमिताभ बच्चन उर्फ त्या वेळचे लंबू ह्यांची ओळख ही फक्त सात हिंदुस्तानी पुरती मर्यादित. परवाना, बॉम्बे टू गोवा किंवा बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही इमेज सेट करणारा जंजिरची सुरुवात आनंद पासूनच झाली!
ह्या सिनेमाची सुरुवात भास्कर बॅनर्जीच्या फ्रेम वर शेवट सुद्धा त्याच्याच फ्रेम वर. आणि हे सेकंड लीड असून सुद्धा तितकंच महत्वाचं पात्र लिहिण्यात ऋषिकेश मुखर्जी ह्यांचं हातखंडाच. ह्या सिनेमात आनंद जितका हळवा आणि लाघवी आहे, तितकाच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्त हळवा आणि लाघवी भास्कर बॅनर्जी. फक्त त्याला आनंद सारखं मनमोकळे पणाने एक्स्प्रेस होता येत नाही इतकाच काय तो फरक. त्याचा एकटेपणा आणि त्याचा डॉक्टरी पेशा यामुळे त्याच्या जीवनात आलेली उदासीनता हीच त्यामागची कारणं. पण जेंव्हा आनंद नावाचं वादळ आपल्या आयुष्यात येतं तेंव्हा मात्र भास्कर हे पात्र आणखीन खुलायला लागतं.
पण हेच खऱ्या आयुष्यात पचवायला लागतं ते भास्कर बॅनर्जीला. डॉक्टर असल्यामुळे त्याला कधी तुम्ही देवासमोर हात जोडलेला पाहणार नाही पण जेव्हा आनंदची वेळ जस जशी जवळ येते तेंव्हा त्याच्या स्वभावात होणारे बदल, त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी एक भीती आपल्याला स्पष्टपणे जाणवते. स्वतःच्या इतक्या जवळच्या माणसाचा मृत्यू ठाऊक असून सुद्धा त्याला वाचवता येण्यात अपयशी होणं हे दुःख भास्कर बॅनर्जीच समजू शकतो.
त्यातला तो शेवटचा सिन जेंव्हा हतबल झालेला भास्कर आनंदच्या उशाशी बसून त्याला धीर देत असतो आणि मग तो ते टेपरेकॉर्डर लावतो, त्यावर त्यांचं केलेलं एक छोटंसं रेकॉर्डिंग त्यानंतर आनंदचं शेवटचा श्वास घेणं, आणि ह्या सगळ्या दुःखातून आनंद कडून मोलाचा धडा शिकलेला भास्कर बॅनर्जी जेंव्हा गेलेल्या आनंदला उठून हसायला सांगतो, तिथे आपल्याला त्या भास्कर बॅनर्जीची अवस्था समजते. याच रोल साठी बच्चन यांना सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कार सुद्धा मिळाला.
तिथून बच्चन पर्व जे चालू झालं ते अजूनही चालूच आहे. सहाय्यक अभिनेता ते बिग बी हा प्रवास खरंच वाखाणण्याजोगा आहे. नंतर काका आणि बच्चन ह्यांनी एकत्र कामं केली, पण नमक हराम बघताना राजेश खन्ना यांच्या तोंडून जेंव्हा निघालं की “यार दुसरा सुपरस्टार पैदा हो गया!” तेंव्हापासून आजवर अमिताभ बच्चन हे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे आणि सदैव राहील.
जसा आनंद विसरता येत नाही, तसाच भास्कर बॅनर्जी सुद्धा विसरून चालणार नाही!