‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अशी मी ‘मानिनी’
नवरात्र म्हणजे नवदुर्गांचा जागर! यानिमित्ताने कलाकृतींमुळे मीडिया आपल्या वाचकांसमोर मांडणार आहे नवतारकांची कथा.. या नवतारकांना मालिका, चित्रपट या माध्यमांतून आपण पाहिलेच आहे. जाणून घेऊया नवतारकांची नवी कहाणी!
२१ मार्च १९४२ रोजी कर्नाटक येथील कणसगिरी या ठिकाणी जयश्री यांचा जन्म झाला. निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेले. पण नंतर वडिलांनी गाव सोडले आणि ते सर्व मुंबईत राहायला आले. लहानपणापासून जयश्री गडकर यांनी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. तेव्हा व्ही शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका नृत्यात त्या समूहात दिसल्या होत्या.
एखादे नृत्य तुमच्या जीवनात कसे टर्निंग पॉईंट घेऊन येते, या संदर्भात जयश्री गडकर यांच्या आयुष्यातील एक किस्सा आहे.
रशियन नेते जेव्हा भारत भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात जयश्री गडकर यांनी ‘लटपट लटपट तुझं चालणं’ आणि ‘घनःश्याम सुंदरा’ या ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील गीतांवर नृत्य केले होते. पुण्यातील एका छायाचित्रकाराने जयश्रीबाईंचे फोटो स्टुडिओत लावले होते. हे फोटो दिनकर पाटील यांनी पाहिले . त्यांनतर त्यांना ‘दिसतं तसं नसतं’ चित्रपटात नृत्य करण्याची संधी मिळाली. मग नंतर या चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवास सुरु झाला, तरी हा प्रवास सोपा नव्हता.
‘आलीया भोगासी’ चित्रपटाच्या वेळचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. या चित्रपटातील भूमिकेसाठी जेव्हा त्यांची निवड झाली, तेव्हा काही जणांच्या मते या नावाला विरोध होता. पण मधुसूदन कालेलकर आणि दत्ता धर्माधिकारी यांनी ठामपणे सांगितलं की ही अभिनेत्रीच या भूमिकेसाठी योग्य आहे. या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वांना खूप आवडली.
‘सांगत्ये ऐका ‘ हा मराठी चित्रपट आणि त्यातील ‘बुगडी माझी सांडली ग’ या लावणीवरचा त्यांचा नृत्याविष्कार हा रसिकांच्या मनात घर करणारा होता.
तमाशा प्रधान चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते. त्यामुळे ‘मानिनी’ चित्रपटासाठी जेव्हा त्यांनी काम करावे, असे अनंत माने यांनी ठरवले, तेव्हा सुद्धा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तमाशा प्रधान चित्रपटातील ही अभिनेत्री ‘मानिनी’ तील भूमिकेला न्याय देईल का, अशी शंका काहींनी व्यक्त केली, पण ‘मानिनी ‘ मधील भूमिकेत उत्तम अभिनय करून जयश्रीबाईंनी आपण कोणतीही भूमिका समर्थपणे पेलू शकतो, हे सिद्ध केले. या चित्रपटाने अनेक रेकॉर्डस् केले. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला.
हेही वाचा : सात्विक ,सोज्वळ आई : सुलोचनादीदी
जयश्री गडकर यांनी नागकन्या, संपूर्ण महाभारत, अभिमन्यू विवाह, महासती अनुसूया अशा अनेक हिंदी पौराणिक चित्रपटात कामे केली. मराठी चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी गाजवला. वैजयंता, साधीमाणसं, मोहित्यांची मंजुळा, सून लाडकी या घरची, सवाल माझा एक, सुगंधी कट्टा अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. मानिनी, वैजयंता, सवाल माझा ऐका, सांगत्ये ऐका या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाले. सुप्रसिद्ध अभिनेते बाळ धुरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
‘रामायण’ मालिकेसाठी जेव्हा रामानंद सागर यांनी त्यांना बोलावले होते, तेव्हा त्यांनी सांगितले की मला कैकयीची भूमिका करायची आहे.
पण रामानंदजी म्हणाले की मी तुम्हाला एका अटीवर ही भूमिका देईन आणि ती अट म्हणजे तुम्ही मला कौसल्येची भूमिका करणारी अभिनेत्री सांगा. जयश्रीबाई म्हणाल्या,” मी कसे सांगू? ” त्यावर रामानंद सागर म्हणाले की अहो, तुमच्याशिवाय कौसल्येची भूमिका दुसरी कोणती अभिनेत्री करू शकेल असे मला वाटत नाही.
जयश्री गडकर यांनी ‘रामायण’ मध्ये कौसल्या साकारली. ‘अशी मी जयश्री’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. ‘अशी असावी सासू’ या चित्रपटाची निर्मिती देखील जयश्रीबाईंनी केली आहे. जयश्रीबाईनी आपल्या कुटुंबालाही कायम महत्व दिलं. मराठी नाटक आणि ते दौरे या गोष्टी त्यांनी टाळल्या. कोणी सुवासिनी त्यांच्या घरी गेली की निघताना त्या स्त्री ला निरोप देताना कायम कुंकू लावून निरोप द्यायच्या. यातून आपल्याला जाणवतात ते घरच्या रितीरिवाजाचे संस्कार.
हे वाचलेत का ? अभिनेत्री उमा यांचे नामकरण
खरोखर जयश्रीबाई खऱ्या अर्थाने ‘मानिनी’ आहेत.