‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
डिडिएलजे २५ वर्षांचा झाला!
संगीताच्या दुनियेत मन्वंतर घडलं. नव्वदच्या दशकात पुन्हा भारतीय चित्रपट संगीतात पुन्हा मेलडी अवतरली. नव्या दमाच्या युवा शिलेदारांनी सूत्रे हाती घेतली. गाणी जास्त युथफुल होवू लागली. भारतीय सिनेमाची आणि संगीताचा डंका देश विदेशात याच दशकात पोचू लागला.
२५ ऑक्टोबर १९९५ ला प्रदर्शित झलेल्या या सिनेमाने भारतातील सिनेमाचे सर्व रेकॉर्डस मोडून काढले. मुंबईच्या मराठा मंदिर या चित्रपट गृहात तब्बल पंचवीस वर्षे या सिनेमाचा मुक्काम आहे.
मागची सहा महिने लॉक डाऊन मुळे थिएटर बंद आहेत, पण पुन्हा एकदा थिएटर चालु झाली की ‘डी डी एल जे’ पुन्हा हजर होईल. याचा अर्थ जवळपास १३०० आठवडे हा सिनेमा इथे चालु आहे. हा जागतिक विक्रम आहे. रसिकांच्या दोन पिढ्या बदलल्या.
हा सिनेमा समाज माध्यमाच्या सर्व टूल वर सहज उपलब्ध आहे. तरी रसिक थिएटर मध्ये जावून हा सिनेमा बघतात.
१९९५ च्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी मुंबईत मेन थिएटर न्यू एक्सलसियरला दिवसा तीन खेळ याप्रमाणे रिलीज झाला .
पन्नास आठवड्यांचा मुक्काम केल्यावर मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट केला. या सिनेमाच्या मेकींगची कहाणी मजेदार आहे. यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य त्यांना १९९० सालापासून सहायक म्हणून मदत करीतच होता. त्याला एक तरूणाईच्या भावनेला मांडणारी फिल्म बनवायची होती.त्याच वय त्यावेळी २४ वर्षे होतं. सिनेमाचे बव्हंशी चित्रीकरण परदेशात होणार होते. त्या मुळे सिनेमाचा नायक विदेशी असावा असं त्याच्या मनात होतं. टॉम क्रुझ हे नाव त्याच्या मनात होतं. पण वडील यश चोप्रांना भारतीय कलावंतच नायक म्हणून हवा होता.
शाहरूख खान ला याबाबत विचारले असताना त्यावेळी तो निगेटीव्ह शेडच्या भूमिकांच्या प्रेमात असल्याने त्याने प्रथमदर्शनी नकार दिला. मग सैफ अली खान ला विचारण्यात आलं पण त्याच्या व्यस्त शेड्यूलने त्यानेही नकार दिला.पुन्हा गाडी शाहरूख कडे वळली.आदित्यने त्याचा पिच्छाच पुरविला.प्रत्येक तरूणीचा ’ तू ड्रीम बॉय होशील ’ असं सांगून त्याने त्याचा होकार मिळविला.
शाहरूख सोबत काजोल यापूर्वी बाजीगर व करण अर्जुन मध्ये चमकली होतीच. तिने चटकन होकार दिला. पटकथा, संवाद लेखक जावेद सिद्दीक्की आणि गीतकार आनंद बक्षी यांना संवाद व गाणी अधिकाधिक युथ ओरीयंटेड बनवायला सांगितली. चोप्रांच्या सिनेमाला तोवर शिव हरी यांचे संगीत असायचे पण या सिनेमाच्या प्रकृतीला पाहता जतीन -ललित यांच्याकडे हि जवाबदारी सोपविण्यात आली. सिनेमाचे शीर्षक किरण खेर यांनी सुचविले जे ’चोर मचाये शोर’(१९७४) मधील एका गीतातील शब्दावरून घेतले होते.
सिनेमाचे चित्रीकरण स्वित्झर्लंड व इंग्लंड येथे करण्यात आले.’तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्याचे चित्रीकरण गुडगाव येथे झाले.
(शेवटचा रेल्वे स्टेशनवरील फायटींग सीन ’आपटा’ या स्थानकावर चित्रीत झाला.हे स्थानक महाराष्ट्रात पनवेल रोहा या मार्गावर आहे!)
शाहरूख्च्या हातात मेंडोलीन हे वाद्य देण्याची आयडीया आदित्यला राजकपूर वरून सुचली. अरमान कोहली याला कुलवंत सिंगच्या भूमिकेसाठी घ्यायचे आधी ठरले होते, पण नंतर त्याच्या जागी परमीत सेठी आला. आजचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर आणि मंदीरा बेदी या सिनेमात होती हे आठवतं का? या सिनेमाच्या वेळीच शाहरूखचे सुभाष घई यांच्या ’त्रिमूर्ती’ या सिनेमाचे चित्रीकरण देखील चालू होते. त्यामुळे शूटींगला वेळ लागत होता. पण रीलीजची तारीख आधीच ठरल्याने सर्वांनाच घाई करावी लागली.
सलग दहा दिवसात जतीन ललीत यांनी त्याचं बॅक ग्राउंड म्युझिक तयार केलं. आधी सरोज खान कोरीयोग्राफर होती, पण नंतर तिच्या जागी फराह खान आली. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या दोन दिवस आधी ’मेकींग ऑफ डिडिएलजे’ हा माहिती पट दूरदर्शनवर दाखविण्यात आला.
असले प्रमोशनल मार्केटींग पहिल्यांदाच होत हो्ते. आजच्या बरोबर २५ वर्षापूर्वी सिनेमा प्रदर्शित झाला व सुपर डुपर हिट झाला. या सिनेमाच्या यशाची सारी व्यावसायिक गणितं बदलवून टाकली. आज या सिनेमाला वीस वर्षे होवून गेली हे सांगूनही पटत नाही मला वाटतं हेच त्याच्या ताजेपणाचे वैशिष्ट्य आहे.