दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
नाती जपणारी थोरली जाऊ
त्यांचे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते. ते ज्योतिष सुद्धा पाहायचे. आपली मुलगी अभिनेत्री होणार हे जणू वडिलांनी जाणले होते. आशा काळे यांनी कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. ‘शिवसंभव’ नाटकात देखील त्यांनी नृत्य सादर केले होते.
आशा भोसले यांनी गायलेल्या ठुमरीवर ते नृत्य होते. आशा काळे यांची गाजलेली भूमिका म्हणजे बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ मध्ये ताईची भूमिका केली. या नाटकाचे आठशे पन्नासहुन अधिक प्रयोगात आशा काळे यांनी काम केले होते.
‘महाराष्ट्राची ताई’ म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या.
या नाटकात तालमींच्या वेळी देखील आशा काळे यांनी नऊवारी साडी नेसत असत. ‘सीमेवरून परत जा’ मध्ये देखील त्यांची भूमिका होती. ‘गुंतता हृद्य हे’ मध्ये त्यांची महानंदेची भूमिका होती. ‘गुंतता हृद्य हे’ या नाटकाचे त्यांनी आठशे पंचाहत्तर प्रयोग केले. महाराणी पद्मिनी, घर श्रीमंतांचं. ‘फक्त एकच कारण’, ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकातही त्यांच्या भूमिका केल्या. तांबडी माती या भालजी पेंढारकर चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची भूमिका होती. भालजी प्रत्येक दृश्याची तालीम घ्यायचे.
‘हा खेळ सावल्यांचा’ चित्रपटात त्यांची भूमिका नेहमीच्या पठडीपेक्षा खूप वेगळी होती. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘हा खेळ सावल्यांचा’ मधील भूमिकेला खूप कंगोरे होते. त्याचे दिग्दर्शन वसंत जोगळेकर यांनी केले होते. ‘सतीची पुण्याई’ च्या निमित्ताने सुलोचनादीदी यांच्याबरोबर देखील त्यांनी काम केले होते. सासुरवाशीण, सतीचं वाण, नशीबवान हे त्यांचे आणखी काही गाजलेले चित्रपट.
आशा काळे यांच्याविषयी लिहिताना ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ मधील ‘निंबोणीच्या झाडामागे’ या अंगाई गीताला आपण विसरू शकत नाही. मराठी लघुपट निर्माते आणि दिग्दर्शक माधव पांडुरंग नाईक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आशा काळे यांनी ‘चांदणे शिंपीत जा ‘या चित्रपटाच्या निर्मितीत देखील योगदान दिले आहे..
त्यांच्या बाबतीत एक विलक्षण योगायोग आहे आणि तो म्हणजे ‘थोरली जाऊ’ चित्रपटासाठी त्यांच्यावर ‘आदिमाया अंबाबाई’ हे गीत चित्रित झाले आहे. त्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रातील देवीची तीर्थक्षेत्राची यात्रा करता आली. ‘आई पाहिजे’ मध्ये ‘अलौकिक दत्तात्रय अवतार’ गाण्याच्या निमित्ताने श्री दत्तगुरूंची स्थानांची यात्रा केली.
‘माहेरची माणसं’ मध्ये त्यांनी ‘तिथे नांदे शंभू कैलासाचा पती’ या गाण्याच्या निमित्ताने भारतातील बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करता आली. आशा काळे यांनी झी मराठीवरील ‘इंद्रधनुष्य’ मालिकेत सुद्धा भूमिका केलीहोती.
त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. आजही त्यांच्याकडे पुस्तकांचा खजिना आहे. सर्व प्रकारचे वाचन त्या करत असतात .
राज्य शासनाच्या व्ही शांताराम पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सव साजरे केले आहेत. अष्टविनायक, पुत्रवती, कुलस्वामिनी अंबाबाई, ज्योतिबाचा नवस, कुंकवाचा करंडा या चित्रपटात सुद्धा त्यांच्या भूमिका आहेत.
आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत, आपण नम्र असले पाहिजे असे सांगणाऱ्या आशाताई काळे – नाईक या अनेकदा शाळा कॉलेजातील पारितोषिक वितरण समारंभासाठी जेव्हा प्रमुख पाहुण्या म्हणून जातात, तेव्हा त्या वाचनाचे महत्व आवर्जून सांगतात.