दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मराठी रसिकांचे भावगंधर्व – पं. हृदयनाथ मंगेशकर
रुळलेल्या वाटेवरुन प्रवास करणारे अनेक असतात पण वेगळी वाट निवडणारे विरळाच! संगीतात अशी अनवट वाट चोखाळणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंडीत हृदयनाथ मंगेशकर. आज २६ ऑक्टोबर त्यांचा जन्मदिन.
मा. दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा घेऊन आलेल्या मंगेशकर भावंडातील वयाने सर्वात लहान पण कर्तृत्वाने तितकंच मोठं असं हे व्यक्तिमत्व आहे. वयाच्या १४व्या वर्षी गीतांना परिपक्व चाल देऊन संगीतसृष्टीत त्यांनी पाऊल टाकलं.वडिलांचा वारसा, लता मंगेशकर नामक संगीतातील महावृक्ष, आशा भोसलेंसारखी संसिद्ध गायिका अशांच्या सावलीत वावरतानासुद्धा स्वत:चं अस्तित्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ठळकपणे अधोरेखित केलं. रक्तातून वाहणा-या संगीताला त्यांनी साधनेची जोड दिली.
संगीतकार म्हणून त्यांची थोरवी आपल्याला ज्ञात आहे. परंतु मा. दीनानाथ यांचे चिरंजीव, भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू या छायेतून स्वअस्तित्व सिद्ध करणारा त्यांचा संघर्ष आपल्याला माहीत नसतो. त्यांच्या लहानपणीचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. ९ वर्षांच्या हृदयनाथांना लहानपणी पायाचं दुखणं होतं. त्यामुळे मैदानी खेळ त्यांना खेळता यायचे नाही. मात्र पतंग उडवायला त्यांना आवडायचं. एकदा पतंग उडवण्यासाठी आईच्या कपाटातील २०००० रुपयातून त्यांनी ५ रु. घेतले. पतंग उडवून घरी आल्यावर आईने त्यांचं पतंग उडवण्याच्या कौशल्याबद्दल कौतुक करत पतंगासाठी पैसे कुठून घेतले असं विचारलं. हृदयनाथांनी सांगितल्यावर आई म्हणाली, “ते पैसे कुणाचे आहेत माहितेय? ते लताचे पैसे आहेत. तिने काम करुन मिळवलेले पैसे आहेत. छान आहे. बहिणीच्या जीवावर पतंग उडवा.”
तो प्रसंग हृदयनाथांच्या इतका जिव्हारी लागला की, नवव्या वर्षी त्यांनी प्रतिज्ञा घेतली की आपण यापुढे हे छंद स्वकमाईने जोपासू. त्यासाठी त्यांनी पडेल ते काम केलं. दिग्गजांच्या मैफिलीत तंबोरे उचलले, सिनेपत्रकारीता केली. एच एम व्ही कंपनी, आकाशवाणीत काम केलं. म्युझिक एडिटर म्हणून काम केलं. मराठी उत्तम असल्याने लोकांना लेख लिहून दिले. आणि चालीही बांधून दिल्या. अर्थात या मेहनतीचे फळ म्हणून संगीताचा समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला आणि गायक, संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द बहरली
अत्यंत वैविध्यपूर्ण संगीत हृदयनाथांनी महाराष्ट्राला दिलं आहे. त्यात ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत. मीरेची सूरदास,कबीर यांची भजने आहेत. गालीबचे शेर आहेत. कर्णमधूर भावसंगीत आहे. अंगावर रोमांच आणणारी देशभक्तीपर गीतं आहेत. जैत रे जैत, उंबरठा, महानंदा, निवडुंग असं लोकप्रिय चित्रपट संगीत आहे. मी डोलकर, राजा सारंगा, वादळ वारं सुटलं गो अशी कोळीगीतं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कवींच्या रचना आहेत. कवी कुसुमाग्रज, कवी गोविंद, कवी विनायक दामोदर सावरकर यांच्या रचना त्यांनी रसिकांसमोर आणल्या. सुरेश भट, आरती प्रभू, कवी ग्रेस, ना.धों.महानोर, शांता शेळके ह्यांच्या अनेक रचना त्यांनी रसिकांसमोर संगीतातून उलगडल्या.
मराठी संगीतासह धनवान, सुबह, मशाल, लेकीन, माया मेमसाब अशा हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलं.
२००९ साली हृदयनाथांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत नेहमीच काळाच्या पुढे राहिले. त्यांना त्यांच्या या जन्मदिनी मराठी रसिकांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा