शोले (१९५३)
निर्मिती : हिरा फिल्म्स
निर्देशक : बी आर चोप्रा
संगीतकार : धनीराम व नरेश भट्टाचार्य
गीतकार : कायिल रशीद, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, दीपक
कलाकार : अशोक कुमार, बिना राय, पूर्णिमा, जीवन, मनमोहन कृष्ण, नाझ
डॉ. रॉय (अशोक कुमार) स्वप्नांच्या एका वेगळ्याच दुनियेत वावरत असतो. त्याच्या मनोराज्यात सौंदर्य असते, शृंगार असतो. एक दिवस ध्यानीमनी नसताना मरणासन्न पित्याच्या अखेरच्या इच्छेनुसार डॉ. रॉयला शोभाशी (पूर्णीमा) विवाह करावा लागतो. शोभा सुंदर असली तरी डॉ. रॉयच्या स्वप्नातली राजकन्या नसते. तो मनातून खूप अस्वस्थ असतो. आयुष्याशी एक समझोता म्हणून तो नाईलाजाने शोभाशी संसार करत असतो. जास्तीत जास्त वेळ क्लिनिकमध्ये घालवत असतो.
हे ही वाचा : अफसाना (१९५१)
एक दिवस आपला खरचटलेला गुडघा दाखवायला बीना नामक (बीना राय) स्वरूपसुंदर तरुणी डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये प्रवेश करते. स्वप्नातल्या राजकुमारीला समोर प्रत्यक्ष पाहता त्याची विकेट पडते. सारासार विवेक बुद्धी गहाण ठेवून डॉक्टर तिच्या प्रेमात पडतो. आपली पत्नी, संसार, स्टेटस साऱ्याचा त्याला विसर पडतो. त्याच्या आयुष्यात वादळ उभे राहते. एका बाजूला सत्वशील निष्ठावंत पत्नी (पूर्णिमा) तर दुसरीकडे सुस्वरूप प्रेयसी (बीना राय). चोप्रांनी शोले मध्ये एखाद्या सुंदर स्त्रीवर विवाहबाह्य प्रेम करणे सोपे असते, परंतु प्रेम आणि प्रत्यक्ष वैवाहिक आयुष्य या दोघात सांगड घालणे किती कठीण असते, हे दर्शवले आहे.