मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
शांतारामबापूंची प्रभात मधील कलात्मक ’चित्रतयी’
सुरूवातीला कोल्हापूर आणि नंतर पुणे इथं ’प्रभात’ या चित्रसंस्थेने भारतीय सिनेमाच्या इतिहासात कलात्मक रत्ने शोभतील अशी कलानिर्मिती केली. मराठीतील पहिला बोलपट ’अयोध्येचा राजा’ (१९३२) हि प्रभातचीच निर्मिती होती. शांतारामबापू प्रभातच्या पाच पांडवांपैकी एक होते. तीसच्या दशकातील प्रभातचा ’संत तुकाराम’ हा अपवाद सोडला तर इतर सर्व लोकप्रिय प्रभात चित्रपटांचे दिग्दर्शन बापूंनीच केले होते.
या काळात बापूंनी सामाजिक चित्रपटांची जी चित्रतयी निर्माण केली ती खरोखरच अजोड आहे.
प्रभात फक्त धार्मिक, ऐतिहासिक,पौराणिक अगर कल्पना रम्य सिनेमे काढते या टिकेला बापूंनी या तीन क्लासिक्स सिनेमातून सणसणीत उत्तर दिले. आज ३० ऑक्टोबर. व्ही शांताराम यांचा ३० वा स्मृती दिन! त्या निमित्ताने त्यांच्या या तीन कलाकृतींची चर्चा करू यात.
त्या काळातील एका मोठ्या सामाजिक समस्येवर (जरठ कुमारी विवाह) त्यांनी भाष्य केले होते. कथा ना ह आपटे यांची ’न पटणारी गोष्ट’ होती. एका कोवळ्या मुलीचे पैशासाठी व खोट्या प्रतिष्ठेसाठी तिच्या वडलांच्या वयाच्या एका वृध्द व्यक्ती सोबत लग्न लावले जाते. तिच्या आयुष्याची होणारी होरपळ आणि त्या विरूढ्द तिने दिलेला निकराचा लढा फार प्रभावीपणे यात दाखविला होता. शांता आपटे व केशवराव दाते प्रमुख भूमिकेत होते. शांताराम बापूंनी केवळ त्रागा न दाखविता या समस्येच्या मूळाशी जावून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता. रूपकांचा प्रतिकात्मक वापर यात फार सुरेख होता. एक अभिनव प्रयोग यात केला होता तो म्हणजे सिनेमाला पार्श्वसंगीत नाही त्या ऐवजी ध्वनीचे खरेखुरे आवाज होते. याची हिंदी आवृती ’दुनिया न माने’ नावाने प्रसिध्द झाली.
(हिंदीत आदमी) या सिनेमाची कथा ’द पोलीस कॉन्स्टेबल’ भास्करराव अमेंबल यांची होती. त्या काळात ’देवदास’ ने तरूणाई नादावली होती. प्रेमभंगाच्या दु:खात झुरत झुरत मरून जाणे भलतेच ’ग्लॅमरस’ वाटत होते. व्ही शांताराम यांना हे पटत नव्हते म्हणून सिनेमाच्याच माध्यमातून याला उत्तर द्यायचे त्यांनी ठरवले. एक पोलीस हवालदार आणि एक वेश्या यांची हि जगावेगळी प्रेमकहानी होती. आयुष्यात प्रेम म्हणजेच सर्वस्व नव्हे ,आलेल्या संकटातून मार्ग काढणे यातच खरा पुरूषार्थ आहे हा संदेश त्यांना युवापिढीला द्यायचा होता. शाहू मोडक आणि शांता हुबळीकर यांच्या यात भूमिका होत्या. दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनातील बारकावे आजही सिनेमाच्या अभ्यासकांना उपयुक्त आहेत. बहुभाषिक गाणे, सिनेमाचा भव्य सेट, जागतिक पातळीवर देखील सिनेमाची दखल घेतले गेली. या पुढच्या चित्रपटासाठी व्ही शांताराम यांनी हिंदु-मुसलमान-ऐक्यावर आधारलेली विश्राम बेडेकर लिखित एक अगदी अपूर्व कथा निवडली. १९४१ साली निवडली.
हा सिनेमा देखील काळानुरूप आशय घन असा होता. प्रभातच्या दामले आणि फत्तेलाल या दोन मित्रांची निरपेक्ष, अकृत्रिम अतूट स्नेह बापूंच्या नजरेसमोर होताच. तोच धागा पकडून त्यांनी विश्राम बेडेकर यांना कथा लिहायला सांगितली. गावात बांधले जाणारे धरण व त्यामुळे होणारे विस्थापन हा आजच्या काळात देखील जिवंत असणारा प्रश्न त्यांनी दाखविला होता. या चित्रपटातील धरणफुटीच्या व जलप्रलयाच्या शहारे आणणाऱ्या दृश्यांची करामत पाहताना आजही बापूंच्या टेकींगचे कौतुक वाटते. सामाजिक सलोख्याचे मनोहारी चित्रण यात होते. ’कुंकू’,’माणूस’ आणि ’शेजारी’ हि शांतारामबापूंची प्रभात मधील चित्रतयी आजही भारतीय सिनेतिहासात अजरामर आहे.