अंदाज अपना अपना.. फ्लॉप का हिट
कोणता सिनेमा चालणार,कोणता नाही चालणार याची सिनेतज्ज्ञांनी कितीही समीकरणं बांधली तरी प्रत्येक चित्रपट आपलं नशीब घेऊन येतो. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम १० विनोदी चित्रपटात जो सहज स्थान मिळवू शकतो अशा ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाने मात्र सगळ्यांचे अंदाज चुकवले होते. आपल्या मनात विनोदाचा एक्का ठरलेला हा चित्रपट सिनेमागृहात आपली जादू दाखवू शकला नव्हता. त्याच सिनेमाची ही फिल्मी कहाणी.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित, अमीर खान, सलमान खान, रविना टंडन, करिश्मा कपूर,परेश रावल अभिनीत हा चित्रपट ४ नोव्हेंबर १९९४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते विनय सिन्हा यांना आमीर खानला घेऊन चित्रपट करायचा होता.त्याआधी राजकुमार संतोषी यांच्या दोन्ही फिल्म्स ‘दामिनी’ आणि ‘घायल’ चांगल्या चालल्या होत्या पण राजकुमार यांना गंभीर चित्रपट नको होता. विनोदी चित्रपट करतानासुद्धा त्यात टॉम अँड जेरी सारखी पात्रं असतील हे त्यांच्या डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे आमीर खान सोबत चित्रपटात सलमान खानची वर्णी लागली. या चित्रपटाची गंमत अशी की आधी कलाकार ठरले आणि मग चित्रपटाचे लेखन सुरू झाले.
हे वाचलेत का ? किती ते अंदाज..!
‘मैने प्यार किया’ सारखा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सलमानने सुरुवातीला थोडी कटकट केली. आपल्याला जास्त स्पेस आणि स्क्रीन टाईम हवा असा त्याचा आग्रह होता.त्याची समजूत काढल्यानंतर शुटींग परत सुरू झालं.
चित्रपटातील नायकांइतकाच खलनायक गोगा खास होता. सुरुवातीला ही भूमिका अभिनेता टिनु आनंद साकारणार होते पण त्यांच्या तारखा जुळू न शकल्याने तिथे शक्ती कपूरची निवड झाली. हा मोगॅम्बोका भतीजा लोकांना जाम आवडला.
चित्रपटातले अनेक संवाद आजही आपल्याला तोंडपाठ असतात. “दो दोस्त एक कपमें चाय पियेंगे किंवा इधर उधर क्या देखते हो उधर इधर देखो” हे धमाल संवाद लिहिले होते फारशा प्रसिद्ध नसणा-या आदित्य सोहोनी आणि दिलीप शुक्ला या जोडीने!
चित्रपटात दोन्ही नायकांच्या सुपरहिट सिनेमांचा उल्लेख होता. जेलमध्ये रिबीन कापणा-या आमीर खानच्या बॅकग्राऊंडला ‘पापा कहते हैं’ गाणं वाजतं. आणि सलमानचं मैने प्यार किया मधलं ‘प्रेम ‘ हे सुप्रसिद्ध नावच या सिनेमात वापरण्यात आलं होतं.
तगडी स्टारकास्ट, ताजे टवटवीत विनोद, मस्त गाणी असुनही हा चित्रपट तिकीटबारीवर मात्र फ्लॉप ठरला.वास्तविक सिनेमाच्या मुहुर्ताच्या शॉटला सचिन तेंडुलकर याने क्लॅप दिला होता. पण चित्रपट पूर्ण व्हायला ३ वर्षं लागली. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मोहरा, क्रांतीवीर, हम आपके है कौन अशा भारी चित्रपटांची टक्कर होती. शिवाय निर्माता आणि वितरक यांच्यातील विसंवादामुळे प्रदर्शनाची तारीख आणि प्रमोशनचा घोळ झाला. तीन वर्षं शुटींग चालू असल्याने पोस्टर्स वगैरेची हवा तयार झाली नाही. आणि या सगळ्याचा फटका बसून सिनेमा तुरळक शहरातच चालला.
गल्ल्यावर चालला नाही म्हणून सिनेमा फ्लॉप होऊ शकत नाही.तो लोकांच्या मनात सुपरहिट ठरू शकतो याचं अंदाज अपना अपना हे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटतं? हा सिनेमा हिट का फ्लॉप? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. शिवाय चित्रपटातल्या अनेक धमाल प्रसंगातला तुमचा आवडता प्रसंगही अवश्य सांगा.
या चित्रपटाची कहाणी खरंच फिल्मी ठरावी. फ्लॉप होता होता हिट ठरलेल्या या सिनेमाचा अंदाजच वेगळा!!!