सुन मेरे बंधू रे…
संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या संगीताने १९४६ सालच्या ’भाई भाई’ (मेरा सुंदर सपना बीत गया) पासून १९७५ च्या ’मिली’ पर्यंत (बडी सूनी सूनी है जिंदगी ये जिंदगी) ; या ३० वर्षाच्या कालखंडात आपल्या अप्रतिम संगीताने सिनेमाच्या सुवर्णकाळात मोठे योगदान दिले. पूर्वेकडील लोकसंगीतातील गोडवा त्यांच्या संगीतातून झिरपत असायचा.
किशोरकुमार, रफी, मन्नाडे, आशा, लता यांच्या स्वराचा मुबलक वापर त्यांच्या संगीतातून दिसायचा. त्या मानाने हेमंत, तलत, सुमन, शमशाद, गीता या समकालीन स्वरांचा समयोचित वापर त्यांनी केला, तर मुकेशचा स्वर मात्र अभावानेच (चल री सजनी अब क्या सोचे-बंबई का बाबू) त्यांच्याकडे दिसला.
हे तर वाचायलाच हवे : आर.डी ह्यांच ‘सागर किनारे’ हे गाणं एसडींच्या ह्या गाण्यावरून प्रेरित होऊन तयार झाले आहे.
१९५७ सालच्या ’सितारोंसे आगे’ या सिनेमा नंतर लता पुढची पाच सात वर्षे त्यांच्या सोबत गात नव्हती. त्या काळात आशा त्यांच्या कडे भरपूर गायली. गायकांबाबत चूझी असलेल्या सचिनदा यांच्या दोन आठवणी मजेदार आहेत.
१९५७ साली प्रदर्शित झालेल्या गुरूदत्तच्या ’प्यासा’ चित्रपटातील सर्व गाणी रफीने गायली होती, अपवाद फक्त ’जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार को मिला’ या हेमंतकुमारने गायलेल्या गाण्याचा! हे गीत देखील रफीनेच गावे अशी त्यांची इच्छा होती. पण गुरूदत्तच्या आग्रहाने हे गीत हेमंतकडे आले. असाच प्रकार बिमलदांच्या ’सुजाता’च्या वेळी ‘जलते है जिसके लिये’ या गाण्याच्या वेळी झाला. त्या वेळी देखील ते गाणे रफीने गावे असे त्यांना वाटत होते, पण बिमलदांच्या हट्टाने ते गाणे तलतला मिळाले.
आज पन्नास साठ वर्षे उलटून गेली तरी हि दोन्ही गाणी रसिकांच्या दिलात ताजी आहेत. सचिनदा यांचा स्वत:चा आवाज रूढार्थाने म्हटलं तर गाण्यासाठी नव्हता तरी त्यांनी काही गाणी अतिशय अप्रतिम रीतीने गायली आहेत. त्यांच्या आवाजात एक खर्ज होता, एक आर्तता होती. ठिबकणारं दु:ख होतं. त्यांनी बंगालीत काही गाणी गायली होती.
हे ही वाचा : पंचमचं ‘मॅजिक’
हिंदीत त्यांच पहिलं लोकप्रिय गाणं ठरलं ’सुजाता’(१९६०) मधील ’सुन मेरे बंधू रे सुन मोरे मितवा सुनो मेरे साथी रे’. बिमलदांच्याच ’बंदीनी’(१९६३) मध्ये ’ओ रे मॉंझी..मेरे साजन है उस पार’ त्यांच्या स्वरातील दर्द अगदी काळजाला भिडून जायच. ’मन की किताबसे तुम मेरा नामही मिटा देना…’ गातानाची त्यांच्या आवाजातील आर्तता मनाला आतून गलबलून टाकते. देव आनंद च्या ’गाईड’ मध्ये त्यांनी गायलेली दोन गाणी होती. ’अल्ला मेघ दे पानी दे’ आणि दुसरं होतं ’वहॉं कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां’. नवकेतनच्याच ’प्रेम पुजारी’ मध्ये ’प्रेम के पुजारी हम है रस के भिखारी’ मस्त जमून आलं होतं. १९६९ च्या ’आराधना’त त्यांनी ’सफल होगी तेरी आराधना काहे को रोये’ हे नितांत सुंदर गाणं गायलं होतं. १९७० साली ओ पी रल्हन यांच्या ’तलाश’ मध्ये ’मेरी दुनिया है मॉं तेरे ऑंचल मे’ हे अतिशय भावस्पर्शी गीत गायलं होतं.
सत्तरच्या दशकार आर डी बर्मन यांनी आपल्या पित्याच्या स्वरात ’अमर प्रेम’(१९७१) मध्ये ’डोली मे बिठायके’ गावून घेतलं. सचिनदांची बव्हंशी गाणी हि सिनेमात पार्श्वभूमीवर वाजवली गेली आहेत, पण आजही रसिकांना आठवतात. सचिनदांच्या पदरी सर्व गायक असताना त्यांनी उणीपुरी आठ दहा गाणी गावून आपला वेगळा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. गम्मत म्हणजे यातली गाईड, आराधना, तलाश आणि प्रेम पुजारी मधील सचिन दा यांचे ग्गाने चित्रपटाच्या सुरुवातीला शीर्षक चालू असताना पार्श्वभूमीवर अवतरते हे आणखी वैशिष्ट्य!
गाण्याची लिंक यु ट्यूब च्या सौजन्याने…