‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
आगामी राज्य प्रभासचे….
एखाद्या सुपरहिट चित्रपटानं एका अभिनेत्याचं नशीब बदलून जातं. पुढे त्यानं कितीही सुपरहिट चित्रपट दिले तरी तो एक चित्रपट त्याच्या नावापुढे कायमचा जोडला जातो. किंबहुना या चित्रपटाचं नाव आणि त्या अभिनेत्याचं नाव यांची गोड युती होते. आणि तिच त्याची ओळख होते. प्रभास हा दाक्षिणात्य अभिनेताही याच पंक्तीमधला. 2015 मध्ये प्रभासचा बाहुबली चित्रपट आला. राजमौली यांच्या या चित्रपटानं प्रभासला नवीन ओळख दिली.
पुढे बाहुबलीचा दुसरा भागही आला. या दोन्ही चित्रपटांनी करोडो रुपयांची कमाई केली. अनेक चित्रपटगृहामध्ये सलग शंभर दिवस बाहुबलीचे शो हाऊसफुल बोर्डखाली चालू होते. बाहुबलीनं प्रभासची नव्यानं ओळख झाली. आता हाच बाहुबली प्रभास पुन्हा एकदा आपल्या नावाचा असाच धमाका करण्यासाठी तयारीला लागला आहे. बाहुबली हा सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला. याच पंक्तीच बसतील असे चित्रपट सध्या प्रभास करतोय. आदिपुरुष, राधेश्याम, प्रभास 20, महाभारत अश्या बीग बजेट चित्रपटांमध्ये सध्या प्रभास व्यस्त आहे. हिंदीसह तामिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्येही हे चित्रपट झळकणार असल्यामुळे येणारी हवा ही प्रभासचीच असणार आहे.
बाहुबलीच्या यशानंतर सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून प्रभासची ओळख झाली. चेन्नईमध्ये 23 ऑक्टोबर 1979 रोजी प्रभासचा जन्म झाला. त्याचे वडील यू. सूर्यनारायण राजू उप्पालापाटी चित्रपट निर्माते आहेत. वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपट्टी हे खरं नाव असलेला प्रभास 2002 मध्ये तेलगू चित्रपटात पहिल्यांदा झळकला. ईश्वर हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर मिर्ची चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य नंदी पुरस्कारही मिळाला. वर्षाम, छत्रपती, चक्रम, बिल्ला, डार्लिंग, मिस्टर परफेक्ट अशा एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपटांमुळे दाक्षिणात्य चित्रपटात प्रभास हा हुकमी एक्का ठरला.
प्रभास हा पहिला दक्षिणात्य अभिनेता आहे, की ज्याचा मेणाचा पुतळा मॅडम तुसादच्या मेणाच्या संग्रहालयात आहे. याच प्रभासनं एस. राजामौली यांच्या बाहुबली प्रमुख भूमिका स्विकारली. राजामौली हे नाव दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत बीगबजेट चित्रपट निर्मात्यांमध्ये अग्रेसर आहे. बाहुबली साठी त्यांनी अनेक अटी ठेवल्या होत्या. या चित्रपटादरम्यान अन्य कुठलाही चित्रपट स्विकारता येणार नव्हता. बाहुबलीचे दोन भाग असणार होते. त्यामुळे हा कालावधी मोठा होता. जो अभिनेता बाहुबलीची भूमिका स्विकारणार होता, त्यासाठी डायट आणि जीम हा एक मोठा भाग होता.
प्रभासनं हे चॅलेंज स्विकारलं. राजामौली यांच्या अटी स्विकारुन त्यानं बाहुबलीसाठी होकार दिला आणि त्यानं आपल्या भावी यशावर शिक्कामोर्तब केलं. पुढे बाहुबलीचा दुसरा भाग आला. या दोन्हीही चित्रपटांनी इतिहास घडवला. करोडोंची कमाई केली. प्रभासच्या नावाचा बोलबाला झाला. त्यानंतर प्रभासचा साहो चित्रपट आला. जवळपास 350 करोड एवढ्या बजेटच्या या चित्रपटानंही बॉक्सऑफीसवर चांगलीच कमाई केली.
या यशानं प्रभास सध्या सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. महागड्या गाड्यांचा शौकीन असलेल्या प्रभासची ओळख सर्वाधिक कर भरणारा अभिनेता म्हणूनही आहे. अनेक मान्यवर कंपन्यांचा तो ब्रॅंण्ड अँबेसिटर आहे. आता भावी काळात प्रभासच्या नावावर असलेले प्रोजेक्ट बघता प्रभासच्या यशात नक्कीच भर पडणार आहे.
सध्या प्रभासचा चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे राधेश्याम. रोमॅंटिक-थ्रिलर असलेल्या या चित्रपटाचे शुटींग इटलीत झाले. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे शेड्यूल कोरोनामुळे लांबले गेले. अन्यथा पुजा हेगडे आणि प्रभासचा राधेश्याम डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. आता परदेशात शुटींगची परवानगी मिळाल्यानंतर राधेश्यामचं सर्व युनिट इटलीत दाखल झालं. इथंही प्रभासची लोकप्रियता एवढी आहे की तिथल्या मिडीयानं त्याची दखल घेतली आणि प्रभासची मुलाखत घेतली. राधेश्याममध्ये भाग्यश्री प्रभासच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
याशिवाय जगपती बाबू, सत्यराज, जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, रिध्दी कुमार, प्रियदर्शी पुलिककोंडा, शश्या छत्री हे सहकलाकर राधेश्याममध्ये आहेत. जस्टिन प्रभाकर यांचे संगित लाभलेल्या या चित्रपटाची गाणी अत्यंत सुंदर लोकेशनला शुट केली आहेत. तेलगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत राधेश्याम प्रदर्शित होणार आहे.
प्रभासचा असाच एक बीज बजेट चित्रपट म्हणजे आदिपुरुष. तान्हाजी फेम ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा एक पौराणिक 3 डी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. भूषण कुमार आदिपुरुषचे निर्माते आहेत. हिंदी आणि तेलगू भाषेत या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असून तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत डब केले जाणार आहे. आदिपुरषमध्ये प्रभास रामाच्या भूमिकेत असल्यानं त्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये अधिक उत्सुकता आहे. यात त्याची सहकलाकार कोण असेल याचीही मोठी चर्चा रंगली होती. आता क्रिती सेनॉन या अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे.
याशिवाय आदिपुरुषमध्ये अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्याही भूमिका आहेत. ओम राऊत यांचं नाव तान्हाजीमुळे लोकप्रिय झालं आहे. 400 करोडचे बजेट असलेल्या या चित्रपटात VFX चा वापर करण्यात येणार आहे. तसेच भरपूर ॲक्शनसीनही असणार आहेत. स्वतः ओम राऊत या चित्रपटाबाबत खूप उत्साही आहेत. कोरोना काळात आदिपरुषच्या पटकथेवर चांगले काम केले आहे, तसेच या चित्रपटात आत्तापर्यंत भारतीय चित्रपटात जे तंत्रज्ञान दिसले नाही त्याचा समावेश असेल असे सांगितले आहे. प्रभास राधे्श्याम चित्रपटातून मोकळा झाल्यावर आदिपुरुषच्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. प्रभूरामांची भूमिका साकारण्यासाठी प्रभासही उत्सुक आहे. 2022 मध्ये आदिपुरुष प्रदर्शित होणार आहे.
हे हि वाचा: येतोय ओम राऊतचा आदिपुरुष
वैजयंती मूवीजच्या आणखी एका बीगबजेट चित्रपटातही प्रभास प्रमुख भूमिकेत आहे. नागआश्विन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपटही हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे यात प्रभाससोबत दिपीका पादुकोण आणि बीग बी अमिताभ बच्चनही असल्यामुळे प्रभास 20 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रभासच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. स्वतः अमिताभ यांनीही बाहुबलीसोबत काम करायला मिळाल्यानं आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय प्रभास आणखी एका मोठ्या बीगबजेट चित्रपटासाठी बुक झाला आहे. हा चित्रपट म्हणजे महाभारत. प्रभासला बाहुबली बनवणारे एस. राजामौली यांनी महाभारत या आगामी बीगबजेट चित्रपटाची घोषणा केली आहे. या महाभारत मधून प्रभास भीम म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट बाहुबलीपेक्षाही भव्यदिव्य असल्याचे राजामौली यांनी जाहीर केले आहे.
एकूण काय प्रभासचे आगामी सर्वच चित्रपट हे बिगबजेट आणि भव्यदिव्य असणार आहेत. बाहुबलीमुळे वेगळी ओळख मिळवलेला हा अभिनेता आता भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला स्वतंत्र ठसा उमवण्यासाठी तयार झाला आहे.